Saturday, September 7, 2024

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त रा. स्व. संघातर्फे स्वदेशी खेळांचा महाकुंभ

Share

आपले स्वदेशी आणि मातीतले खेळ मुलांना शिकवून ते खेळण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं पिंपरी-चिंचवडजवळ असलेल्या चिखली येथे स्वदेशी खेळांच्या महाकुंभाचं आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी करण्यात आलं होतं. या उपक्रमाला मुलांचा आणि पालकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला.

आई मला खेळायला जायचंय ! जाऊ दे न वं,
नदीमधे पवायला जायचंय जाऊ दे न वं…
मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या या गाण्याप्रमाणे प्रत्येक मुलाच्या मनात अशा काही कल्पना असताताच. तशी काही इच्छा असतेच. पूर्वी सुटीचे दिवस म्हणजे मामाच्या गावाला जाणं, खेडे-गावात जाऊन खेळ खेळणं,‌ नवे मित्र जमवणं, त्यांच्यासोबत दिवसभर भटकत चिंचा, कैऱ्या अशा फळांची, रानमेव्याची मजा लुटणं असा काही उन्हाळी सुट्टीचा नित्यक्रम असायचा… पण, कालांतरानं माणसांच्या कामकाजी व्यापामुळं खेडे-गावाकडे जाणं-येणं कमी होत गेलं. लहानमुलांच्या मनातला मामाचा गाव हळूहळू लोप पावत गेला आणि त्याबरोबरच मुलांची मातीतल्या खेळांशी असलेली नाळसुद्धा तुटत गेली. हे खेळच मुलं विसरत गेली.

कृती शिवाय पर्याय नाही
हल्लीच्या टीव्ही, मोबाईल आणि त्यावरच्या आभासी खेळांचं वाढत प्रमाण पहाता मोकळंपणानं खेळणं लहान मुलं विसरत चालली आहेत. त्यांचा एकलकोंडेपणा वाढत चालला आहे. त्यामुळे कदाचित चिडचिडेपणा, हट्टीपणा किंवा रागावर नियंत्रण नसणं असंही आजूबाजूला घडणाऱ्या घटनांतून दिसतंय. हे मोकळं खेळण्याचं प्रमाण पूर्णपणे बंद झालंय असं नाही, पण हळूहळू ते कमी होतंय हे मात्र नक्की. शहरांत याची जास्त काळजी वाटत होती पण आता हीच लाट खेडे-गावांतही जाईल का ? अशी शंका येतेयं… यावर चिंतन कितीही केलं तरी कृती शिवाय पर्याय नाही.

याच पार्श्वभूमीवर, सहजच चर्चा करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चिखली या नगरातील कार्यकर्त्यांना एक कल्पना सुचली आणि ती राबवण्याचंही त्यांनी ठरवलं. ही कल्पना म्हणजे स्वदेशी खेळांच्या महाकुंभाची आणि निमित्त होतं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं.

अर्थात, स्वदेशी खेळांची माहिती आजच्या संस्कारक्षम वयातील मुलांना, नव्या पिढीला करून देणं, तसंच जुन्या पिढीला त्याची उजळणी करायला लावणं, असा या उपक्रमाच्या आयोजनामागील हेतू होता. मग दोन आठवड्यांत सर्व जुन्या खेळांची यादी तयार करण्यात आली आणि त्यातली निवडक ३२ खेळांची निश्चिती झाली.

साधनांची जमवा-जमव
आता फक्त खेळ निवडून जमणार नव्हते. मग, त्यांच्या साधनांची जमवा-जमव कार्यकर्त्यांनी सुरू केली. ते खेळ कसे खेळतात याची माहिती गोळा करण्यात आली. अशी सारी तयारी सुरू होती. यात प्रत्यक्ष १०-१२ कार्यकर्त्यांनी सहभाग घेत नगरकार्यवाह श्रीकृष्ण काशिद आणि सहकार्यवाह कौस्तुभ रामदासी यांच्या मार्गदर्शनाने या महाकुंभाची संपूर्ण आखणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी वेगळं काहीतरी करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आणि आखणी केली. ज्या म्हेत्रे उद्यान येथे हा महाकुंभ होणार होता, त्याच्या जवळ असणाऱ्या असणाऱ्या सेवा वस्ती‌तील मुले महाकुंभाच्या निमित्तानं या उपक्रमात सहभागी होऊन खेळांचा आनंद लुटतील. तसेच यातूनच डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं समरसतेचं दर्शन घडेल आणि हीच त्यांच्यासाठी योग्य मानवंदना ठरेल, असाही विचार या निमित्तानं संघस्वयंसेवकांनी केला.

हा विचार सार्थकी ठरला, कारण सर्व समाजाचा मिळालेला प्रतिसाद. १४ एप्रिल सकाळी ७ वा. शाखा लावून प्रार्थना झाली आणि ठीक. ७.३० वा. बुद्धवंदनेनी महाकुंभाची सुरुवात झाली. भीमशक्ती संस्थेच्या कविता म्हस्के, रत्नमाला सावंत तसेच संघाच्या अन्य अधिकारी मंडळींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शारीरिक शिक्षण प्रमुख निलेश भंडारी, जिल्हा सहकार्यवाह जयंत जाधव यांचीही प्रमुख उपस्थिती या उपक्रमात होती. उद्घाटन कार्यक्रमानंतर दोन सत्रातील (सकाळ – संध्याकाळ) हा महाकुंभ लहान-मोठ्या मुलांच्या उपस्थितीनं रंगला. रणरणत्या उन्हाचा विसर पडत साधारण ८ ते १५ वयोगटातील मुलं-मुली स्वदेशी खेळांचा आनंद लुटत होती. दुपारच्या मध्यंतरात कलिंगडांच्या फोडींचा आस्वाद घेऊन मुलं घरी विश्रांतीसाठी गेली ती पुन्हा संध्याकाळच्या दुसऱ्या सत्राची उर्जा घेण्यासाठी. दुसरं सत्र तेवढ्याच उत्साहानं आणि दुप्पट प्रतिसादानं सुरू झालं. या सत्रात मोठ्यांनी देखील सहभाग नोंदवत संगीत खुर्चीसह अनेक खेळ खेळले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लगोरी, लंगडी, विटीदांडू, काची गोट्या, चकारी, रस्सीखेच, अंधारी कोशिंबीर, मामाचं पत्र, गजगे, चिंचोके, भोवरा, कांदा फोडी, कोया, साखळी, कागदाचा चेंडू, कागदाचं विमान उडवणं, काचकवड्या, नौका युद्ध, लड्डू फोड, चिर-चिरघोडा, कुलूप किल्ली, सापाची झोप, गाव गुंड, तीन पायांची शर्यत, वारे भोंदू, चीपरी – टिपऱ्या अशा अनेक खेळांचा आनंद उपस्थितांनी घेतला. याच खेळांच्या बरोबरीनं इतरही अनेक मैदानी खेळांचाही आनंद मुलांनी लुटला.

या खेळांमध्ये विशेष करून वयोवृद्ध मंडळींनीसुद्धा काही खेळ खेळून दाखवले ते मुलांना समजावून सांगितले. एका ८० वर्षांच्या आजोबांनी विटी-दांडू खेळून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. सहभागी झालेला प्रत्येकजण बालपणीच्या आठवणींत हरवून गेला होता आणि या उपक्रमात आल्यामुळे आनंद झाल्याचे सांगत होता. सोबतच मर्दानी खेळांची (दांडपट्टा, नानचाकू, तलवारबाजी) प्रात्यक्षिकेही झाली.

कार्यक्रमाची तयारी म्हणून परिसरात छापील पत्रके वाटून संपर्क करण्यात आला होता. त्याला प्रतिसाद देत या महाकुंभाला दिवसभरात लहान, मोठे, वयोवृद्ध अशा आठशे ते साडेआठशे जणांनी भेट दिली. तेथील उत्साही वातावरण आणि खेळांची आवाड यामुळे कुणी घरी जाण्याच्या मनस्थिती नव्हते. पण अखेर उद्यानाची वेळ रात्री ८.३० असल्याने शांती मंत्राने या महाकुंभाची सांगता झाली.

मेहनत सत्कारणी लागली
या उपक्रमाच्या आयोजनासाठी कार्यकर्त्यांनी दोन आठवडे भरपूर मेहनत केली. पण महाकुंभाची यशस्वीता पहाता ती मेहनत सत्कारणी लागली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या या वेगळ्या मानवंदनेचे समाधानही यात सहभागी झालेल्यांच्या चेह-यावर आणि मनात होते आणि ते कायमस्वरूपी राहील यात शंका नाही.

चिरंतन कुलकर्णी
(लेखक ग्राफिक डिझायनर आहेत. ते रा. स्व. संघाच्या चिखली नगराचे बौद्धिक प्रमुख म्हणून काम करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख