Saturday, July 27, 2024

काॅंग्रेसचा डीएनए हिंदू विरोधी

Share

हिंदूद्वेष आणि राम भक्तांचा अपमान, ही काॅंग्रेसची नीती आहे. किंबहुना हाच काॅंग्रेसचा डीएनए आहे. `हिंदू’ म्हणजे जणू काही ‘काफिर’ अशीच काॅंग्रेसची भूमिका होती, आहे आणि राहील.

काॅंग्रेसचा पराकोटीचा हिंदूद्वेष नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरून दिसून आला. हा हिंदू द्वेष एवढ्या नीच थराला गेला आहे की, पक्षाला सामाजिक सभ्यता आणि महिला सन्मान याचे सुद्धा भान राहिलेले नाही. दोन्ही घटना लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आला असताना घडल्या आहेत. आपल्या वर्तनाचा मतदारांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, याचे भानसुद्धा काॅंग्रेसला राहिलेले नाही. विशेषतः, अयोध्या राम मंदिर हा विषय काॅंग्रेससाठी न भरून येणारी ठसठसती जखम आहे. काँग्रेसच्या दृष्टीने हा विषय लज्जास्पद आहे. काँग्रेसला हा विषय अप्रिय आहे कारण त्यांची अशी धरणा आहे कि, अयोध्या राम मंदिरामुळे पक्षाला दुरवस्था प्राप्त झाली आहे. हिंदू आस्थेची कायम टिंगलटवाळी करणाऱ्या काॅंग्रेसला मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. परंतु, सुधारतील ते काँग्रेसवाले कसले ?

काॅंग्रेसच्या हिंदू द्वेषाचा विषय पुन्हा निर्माण होण्याची दोन कारणे आहेत.

पहिली घटना काॅंग्रेसचे बंडखोर नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांच्याबाबत आहे. आचार्यांनी एका मुलाखतीत सणसणीत आरोप केला आहे की, काॅंग्रेस सत्तेवर आला तर सर्वोच्च न्यायालयाचा अयोध्या राम मंदिराबाबतचा निर्णय फिरवण्यासाठी राहुल गांधी विचार करीत होते. आचार्य प्रमोद यांनी म्हटले आहे की, काॅंग्रेस वेळप्रसंगी अयोध्येतील मंदिर निर्माणामागे शास्त्र परंपरा यांचा आधार घेऊन, प्रसंगी एखाद्या शंकरचार्यांना उभे करून मंदिर पाडण्याची शक्यता आहे.

आचार्य प्रमोद यांचे आरोप गंभीर आहेत. ते तीस वर्षांपेक्षा अधिक काळ काॅंग्रेस पक्षाशी संबंधित होते. मात्र त्यांनी पक्षाच्या अनेक भूमिकांशी सहमत नव्हते. कलम ३७० आणि अयोध्येतेतील राम मंदिर या विषयावर त्यांनी पक्षाला जाहीरपणे चार शब्द सुनावले होते. परिणामी त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा झाली होती. आचार्य प्रमोद यांचा सल्ला ऐकण्याऐवजी काॅंग्रेसने त्यांना हाकलून देणे पसंत केले.

आचार्य प्रमोद यांच्यामुळे दोन प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न भारतीय घटनेशी संबंधित आहे. दुसरा प्रश्न पुनः काॅंग्रेसच्या परंपरागत हिंदूद्वेष आणि मुस्लिम प्रेमाशी संबंधित आहे. अयोध्येतील राम मंदिर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बांधण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय ही घटनात्मक संस्था आहे. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायालय या तीन संस्थांचा घटनेमधे व्यवस्थित उल्लेख आहे. तिन्ही संस्थांचे कार्यक्षेत्र आणि मर्यादा यांचा स्पष्ट खुलासा घटनेमधे आहे. काॅंग्रेसला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवणे घटनाबाह्य वाटत नाही का ?

काॅंग्रेसचे घटनेचे प्रेम धादांत नकली आणि खोटे आहे. आजपर्यंत झालेल्या सर्वात जास्त घटनादुरुस्त्या काॅंग्रेसने केल्या आहेत. समाजवादी’ आणिधर्मनिरपेक्ष’ या शब्दांचा समावेश घटनेच्या सरनाम्यामधे आणीबाणीच्या काळात झाला. या वेळी विरोधी पक्षांचे सर्व नेते राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी तुरुंगात टाकले होते. घटनेची पहिली दुरुस्ती १९५२ मधे जवाहरलाल नेहरू यांनी आणली होती. ही घटनादुरुस्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्या विषयी होती.

काॅंग्रेसचे खरे घटनाप्रेम शाहबानो प्रकराणात दिसून आले. मुस्लिम प्रेम आणि राजकारण यांनी घटनाप्रेमावर मात केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राजीव गांधी यांच्या काॅंग्रेसने कायदे मंडळाद्वारे बदलून मुस्लिम लांगूलचालनचा अभूतपूर्व पुरावा दिला होता. या पार्श्वभूमीवर आचार्य प्रमोद यांची भीती निराधार वाटत नाही. मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी कॉँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते, हा इतिहास आहे.

दुसरी घटना तितकीच चिंताजनक आहे. काॅंग्रेसच्या छत्तीसगढमधील नेत्या राधिका खेरा यांनी काही गंभीर आरोप करीत पक्षाचा राजीनामा दिला आहे. राधिका यांनी आपल्या आईसमवेत काही दिवसांपूर्वी अयोध्या राम मंदिराला भेट दिली होती. त्यांनी आपल्या घरावर अयोध्येतील ध्वज लावला आणि त्यांच्या छळास प्रारंभ झाला. पक्षनेत्यांनी त्याना कार्यालयात बोलावून घेतले आणि गैरप्रकार केले. राधिका यांनी तक्रार केली की, पक्ष नेत्यांनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. अपशब्द वापरले. हा सर्व प्रकार पक्ष कार्यालयात घडला. राधिका यांनी मदतीसाठी आरडाओरड केली परंतु कोणीही त्यांच्या मदतीला आले नाही.

राधिका यांच्याबाबत घडलेली घटना अधिक गंभीर आहे. कारण या विषयाला पक्षाच्या भूमिके शीवाय अजून एक पैलू आहे. एका महिलेशी पक्ष कार्यालयात झालेले वर्तन अत्यंत आक्षेपार्ह आहे. आपल्याच पक्षातील एका महिला सहकाऱ्यासोबाबत कसे वर्तन करावे याचेही भान हिंदू द्वेषी काॅंग्रेस नेत्यांना राहिलेले दिसत नाही.
या दोन्ही घटना काॅंग्रेसची मानसिकता दर्शविणाऱ्या आहेत. हिंदूद्वेष हाच काॅंग्रेसचा डीएनए आहे. हिंदू समाजासमवेत काॅंग्रेसची वागणूक जणू काही ते ‘काफिर’ असल्यासारखीच आहे. तथाकथित धर्मनिरपेक्षता सिद्ध करण्यासाठी काॅंग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते. प्रसंगी बाबरी मशिदीचे नव्याने बांधकाम सुद्धा करायला काॅंग्रेस मागेपुढे बघणार नाही. याच पक्षाच्या नेत्यांनी पूर्वी रामाला काल्पनिक संबोधले होते.

काॅंग्रेस हिंदू आस्थेबाबत टोकाची अतिरेकी भूमिका का घेत आहे, हा खरा प्रश्न आहे. या मधे राजकरणापेक्षा अन्य काही हेतु आहे का? काॅंग्रेस कोणत्यातरी परकीय शक्तीची हस्तक बनली आहे का? अखंड आणि विकसित भारतावर काॅंग्रेसचा विश्वास आहे का? मतदारांनी काॅंग्रेसला हे प्रश्न विचारले पाहिजे.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख