Thursday, March 26, 2026

“हमें तुमसे प्यार कितना”… काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम

Share

राजस्थानमधील अनेक मुस्लिम संघटनांनी २०२० मधील दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद याला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करण्याची मागणी केली आहे. या संघटनांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना संयुक्त निवेदन देत आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी खालिद याच्या उमेदवारीवर विचार करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, जून महिन्यात राज्यसभेच्या ३ जागा रिक्त होणार आहेत. या मुस्लिम संघटनांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधून मुस्लिम समाजाचे पुरेसे प्रतिनिधित्व नाही आणि खालिद याची उमेदवारी ही कमतरता भरून काढू शकते. तसेच, हा निर्णय नागरी हक्कांप्रती काँग्रेस पक्षाची बांधिलकी दर्शवेल, असे त्यांचे मत आहे. राजस्थान मुस्लिम अलायन्सचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस कार्यकर्ते मोहसिन रशीद यांनी सांगितले, “२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुस्लिम समाजाकडून मोठा पाठिंबा मिळाला होता, जो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणखी वाढला.” मोहसिन रशीद यांनी दावा केला की, राज्याच्या लोकसंख्येत ९ ते १०% वाटा असूनही मुस्लिम समाजाला संसदेत प्रतिनिधित्व मिळालेले नाही.

मात्र, या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे, कारण उमर खालिद याच्यावर फेब्रुवारी २०२० मधील दिल्ली दंगलीप्रकरणी आरोप आहेत. त्याला सप्टेंबर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता. तपास यंत्रणांनी खालिद याच्यावर दंगलीची कटकारस्थान रचणे, जमावाला भडकवणे आणि हिंसा पसरवणे असे आरोप केले आहेत. तसेच, दंगलीदरम्यान PFI मधील संपर्कांच्या माध्यमातून लॉजिस्टिक मदत देण्याचे आश्वासन देण्यासाठी त्याने आपचे माजी नगरसेवक ताहिर हुसेन आणि आणखी एक आरोपी खालिद सैफी यांच्याशी भेट घेतल्याचा आरोप आहे.

अहवालांनुसार, तपास यंत्रणा माओवादी गटांशी संभाव्य संबंधांवर लक्ष ठेवून होत्या आणि इशारा देत होत्या की खालिद काही अशा फ्रंट संघटनांशी संबंधित होते ज्यांचे संबंध कट्टर इस्लामवादी संघटना जमात-ए-इस्लामी हिंद, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया आणि बंदी घातलेल्या SIMI शी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, खालिद यांनी काश्मीर संदर्भातही पाकिस्तानच्या प्रचाराची पुनरावृत्ती करत भारतीय केंद्रशासित प्रदेशावर भारतीय सैन्याचा कब्जा असल्याचा दावा केल्याचे म्हटले जाते.

काँग्रेसचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान प्रेम – गौरव गोगोई

गौरव गोगोई हे आसामच्या जोरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार आहेत. लोकसभेत ते काँग्रेसचे उपनेते होते. सध्या ते आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आसामचे मुख्यमंत्री स्व. तरुण गोगोई यांचे ते पुत्र आहेत. त्यांची पत्नी एलिझाबेथ कोलबर्न ही मूळची ब्रिटीश नागरीक आहे.

एलिझाबेथ कोलबर्न यांनी मार्च २०११ ते मार्च २०१२ या काळात पाकिस्तानमधील ‘लीड पाकिस्तान’ (LEAD Pakistan) या संस्थेत काम केले. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी काही ई-मेल आणि SIT च्या हवाल्याने आरोप केला आहे की, त्यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधून पगार मिळत होता आणि भारतात आल्यानंतरही त्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्या संपर्कात होत्या. तसेच एलिझाबेथ कोलबर्न यांनी भारतातील काही संवेदनशील माहिती (उदा. हवामान बदल किंवा आयबी इनपुटशी संबंधित) इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला पाठवली.

गौरव गोगोई यांनी स्वतः मान्य केले आहे की, २०१३ मध्ये त्यांच्या लग्नानंतर ते पत्नीसोबत १० दिवसांच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या पत्नी एका आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेत कार्यरत होत्या आणि त्यांच्या कामासाठी त्यांना तिथे राहणे आवश्यक होते. त्यांनी लाहोर, इस्लामाबाद आणि तक्षशिला या ठिकाणांना भेट दिली होती. आसाम मंत्रिमंडळाने हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने अधिक तपासासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तरीही अजूनही गौरव गोगोई काँग्रेसमध्येच आहेत. काँग्रेसचे खासदार आहेत. आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत आणि विशेष म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने गौरव गोगोई यांना जोरहाट विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील दिलेली आहे.

काँग्रेसच्या या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विषयी असलेल्या जिव्हाळ्यामुळे भारतातील मुसलमानांना देखील मुस्लिम लांगुलचालन करणाऱ्या अन्य कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेस आपलीशी वाटते आणि म्हणूनच ते तुकडे तुकडे गँगचा विद्यार्थी नेता, हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हान वाणी याचा उल्लेख ‘क्रांतिकारी’ असा करणारा आणि दिल्लीतील हिंदू नरसंहाराच्या दंगलीतील आरोपी उमर खालीद याला काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी द्यावी असे वाटते. आणि यदाकदाचित काँग्रेसने उमर खालीदला राज्यसभेची उमेदवारी दिली तर आश्चर्य वाटून घेण्यात अर्थ नाही.

हमें तुमसे प्यार कितना…

JNU मधील तुकडे तुकडे गँगचा दुसरा कम्युनिस्ट नेता कन्हैय्या कुमार… फेब्रुवारी २०१६ मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अफझल गुरूच्या फाशीच्या विरोधात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी आणि पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचा आरोप कन्हैया कुमारवर आहे. या कार्यक्रमात “भारत तेरे टुकडे होंगे” आणि “पाकिस्तान झिंदाबाद” अशा घोषणा दिल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा कन्हैया कुमार २८ सप्टेंबर २०२१ रोजी काँग्रेस पक्षात आला आणि देशद्रोहाचे आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या प्रेमाचे आरोप असलेल्या कन्हैया कुमारला काँग्रेसने २०२४ ला सुमारे २१% मुस्लिम मतदार असलेल्या ईशान्य दिल्लीतून मुस्लिम मतदारांच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाच्या मनोज तिवारी यांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. कन्हैया कुमार निवडणूक हरला ही बाब वेगळी पण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विषयी प्रेम असलेल्या कन्हैया कुमार बाबत काँग्रेसला इतके प्रेम का असावे? यह रिश्ता क्या कहलाता है?

काँग्रेसचा पाक प्रेमी मणिहार…

२०१५ मध्ये पाकिस्तानमधील एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी म्हटले होते की, “जर भारत आणि पाकिस्तानमधील संवाद पुन्हा सुरू करायचा असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून दूर करणे आवश्यक आहे.” २०१८ मध्ये कराची येथील एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले होते की, “माझे भारतावर जेवढे प्रेम आहे, तेवढेच प्रेम पाकिस्तानवरही आहे.” तसेच त्यांनी पाकिस्तानच्या संवाद प्रक्रियेतील प्रयत्नांचे कौतुक केले होते.

फेब्रुवारी २०२४ मध्ये लाहोरमधील एका महोत्सवात त्यांनी विधान केले की, “पाकिस्तानी जनता ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, कारण त्यांना भारताशी शांतता हवी आहे.” नुकतेच त्यांनी हिंदू आणि शीख यांच्यामध्ये “२ पत्नी” ठेवण्याचे प्रमाण मुसलमानांपेक्षा खूपच अधिक आहे असे अकलेचे तारे तोडले आहेत.

मणिशंकर अय्यर हे भारताचे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये वाणिज्य दूत  होते. १९८९ मध्ये राजीव गांधींच्या काळात काँग्रेसमध्ये सामील झाले. एक ४ वेळा काँग्रेसचे खासदार झाले. त्यांनी यूपीए सरकारमध्ये पेट्रोलियम आणि पंचायती राज यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवले आहे. आजही ते काँग्रेसमध्ये आहेत आणि प्रचंड सोनिया भक्त म्हणून ओळखले जातात.

आमच्या देशाच्या पंतप्रधानाला पदावरून दूर करणे आवश्यक आहे असे शत्रुराष्ट्राच्या भूमीवरून सांगणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याची काँग्रेसची का इच्छा नाही? बहुदा मणिशंकर अय्यर यांना इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विषयी असलेल्या ममत्वामुळे काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करावीशी वाटत नसावे.

मान ना मान, मैं तेरा मेहमान… इमरान प्रतापगढ़ी…

राजकारणात येण्यापूर्वी मोहम्मद इमरान प्रतापगढ़ी ‘शायर’ म्हणून लोकप्रिय झाला होता. त्याच्या कविता आणि नज्म (उदा. ‘मदरसा’, ‘हाँ मैं काश्मीर हूँ’)  मुशायऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. २०१६ मध्ये त्याला उत्तर प्रदेश सरकारचा सर्वोच्च ‘यश भारती’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. २०२२ मध्ये महाराष्ट्राशी काडीचाही संबंध नसताना काँग्रेसने त्याला महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली आणि महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले. काँग्रेसचे उतू जाणारे हे मुस्लिम प्रेम बघूनच राजस्थानच्या मुसलमानांनी काँग्रेसकडे उमर खालिद याला राजस्थान विधानसभेतून राज्यसभेची खासदारकी द्यावी म्हणून हट्ट धरला आहे.

राजस्थानच्या लोकसंख्येत ९ ते १०% वाटा असूनही मुस्लिम समाजाला संसदेत प्रतिनिधित्व मिळालेले नाही. मुळात २०२४ ला राजस्थानातून काँग्रेसचे आठ खासदार निवडून गेले. त्यात मुमताज मसीह या जयपूर ग्रामीण मतदार संघातून निवडून गेलेल्या मुस्लिम खासदार आहेत. लोकसंख्येच्या गुणोत्तरात हे अगदी योग्य असे प्रतिनिधित्व आहे.

तर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानातील १६ व्या विधानसभेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (INC) ६९ आमदार आहेत. त्यात १५ मुस्लिम उमेदवारांपैकी ५ आमदार निवडून आले आहेत. मोदी लाटेत देशभर काँग्रेसची पुरती वाताहात होत असताना देखील मुसलमान आपल्या काँग्रेस निष्ठेची पुरेपूर किंमत काँग्रेसकडून वसूल करताहेत. आणि ह्याला जबाबदार देखील काँग्रेसच आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी, “काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस” थेट समीकरणच मांडले आहे.

सकल हिंदू समाज मुस्लिमांचे अपरिमितच्या लांगुलचालन करणाऱ्या आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विषयी जिव्हाळा ठेवणाऱ्या काँग्रेसला मतपेटीतून नेस्तनाबूत करेल. याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नाही.

अन्य लेख

संबंधित लेख