गंगाखेड : देशी गायींना राज्यमाता दर्जा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आला होता. परंतू, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड (Gangakhed) तालुक्यात आणि परिसरात भटक्या गाय चोरणाऱ्यांची (Cow Stealer) मोठी टोळी सक्रिय झाली आहे. रात्रीच्या वेळी गायीला बेशुध्द करुन त्यांना चोरण्याचे प्रमाण वाढले आहे. या गायी चोरुन त्यांच्या मांसाची विक्री करण्यात येत आहे अशी चर्चा सध्या परिसरात आहे. या गाय चोरांकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. मागील 15-20 दिवसात जवळपास 80-90 गायी गायब झाल्या आल्याची गंभीर व संवेदनशील बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाय चोरण्याचा प्रकार लक्षात आल्यावर जागरूक तरुणांनी गाय चोरांच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे. या तरुणांनी पैसे गोळा करून नरवाडे कॉर्नर येथे सीसीटीव्ही बसवले होते. त्याचा परिणाम असा झाला कि, दि २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मध्यरात्री गंगाखेड शहरातील जनाबाई मंदिर रोडवरील नरवाडे कॉर्नर येथून गायीला फोर व्हीलर मधून चोरून नेल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. हाच व्हिडिओ व्हिडिओ घेऊन सर्व जागरूक तरुण व व्यापारांनी मिळून गंगाखेड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्याकरिता एकत्र जमले होते. परंतु, कोणताही गुन्हा न नोंदवता, भटक्या गाईचे दाखले द्या असे प्रतिप्रश्न करण्यात आला व कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. दरम्यान, मागील 15-20 दिवसात जवळपास 80-90 गायी गायब आहेत. 2 गायी मृत अवस्थेत आढळून आल्या. नुकतेच राज्यमाता चा दर्जा मिळालेल्या गायी सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, दिवसभर चरल्यानंतर रात्री ह्या गायी विसाव्यासाठी मोकळ्या मैदानांवर बसतात. या गायींच्या कळपातील किमान एका गायीला चोरुन नेण्याचा सपाटा काही समाजकटंकांनी सुरु केला आहे. चोरलेल्या गायीची विक्री थेट मास विक्रेत्यांकडे करण्यात येत आहे. तर काही मास विक्रेत्यांनीच स्वतःची स्वतंत्र यंत्रणा गाय चोरण्यासाठी उभारली आहे? काही दिवसापूर्वी गंगाखेड शहरातील संत जनाबाई रोड वरील नरवाडे कॉर्नर येथे रात्री २-३ च्या दरम्यान, एक इनोवा गाडी आली त्यामधुन चार अनोळखी इसम उतरले व रस्त्यावर एक गाय व एक वासरु बसलेले होते, त्या चार अनोळखी इसमांनी त्या गाय व वासरु चोरी करण्याचे उद्देशाने गायीच्या तोंडाला, डोक्याला व तिच्या पायाला दोरीने बांधुन इंजेक्शन दिले व वासराला पण इंजेक्शन देतांना शहरातील तरुणांनी पहिले. त्यानंतर तरुणांच्या तत्परता दाखवल्यामुळे ते चारही अनोळखी इसम हे त्या इनोवा गाडी मध्ये बसुन तेथुन पळून गेले. जागरूक तरुणांनी लगेच जनावराच्या डॉक्टरांना फोन करून त्या गायवर व तिच्या वासरावर प्राथमीक उपचार सुरु केले. गाईवर उपचार सुरु असतांना ती गाय मरण पावली आहे व त्याचे गायचे वासरु जिवंत असुन त्याचेवर उपचार सुरु होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु अजूनही कोणावरही करावी झालेली नसल्याची माहिती आहे.
या परिसरातील भटक्या गायी चोरण्यासाठी ही टोळी रात्रीच्यावेळी सक्रिय असते. या टोळीतील गायींच्या कळपांची पाहणी करतात. एकांत मिळताच त्यातील चोर या गायींपैकी एखाद दुसऱ्या गायीला बेशुध्द करणारे औषध असलेले पाव देऊन बेशुध्द करतात. चार चाकी गाडीतून काही चोरटे गायीजवळ आल्यावर काही क्षणात या गायींचे पाय बांधून त्यांना अवघ्या मिनिटभरातच गाडीत कोंबतात. चोरलेल्या गायी याच परिसरातील मास विक्रेत्यांकडे पाठविण्यात येतात.