Monday, March 23, 2026

संपूर्ण देशात गोवंश हत्याबंदी आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करा; ‘हिंदु राष्ट्र अधिवेशनात’ मागणी

Share

पाटलीपुत्र (बिहार) : “भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावा आणि हिंदूंच्या न्याय्य हक्कांचे रक्षण व्हावे,” या उद्देशाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात केंद्र सरकारने संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदा लागू करावा, अशा प्रमुख मागण्यांसह अनेक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले.

अधिवेशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी माहिती दिली की, भारताच्या राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ (Secular) हा शब्द काढून टाकावा, ही या अधिवेशनाची प्रमुख मागणी आहे. तसेच, भारतातील सर्व मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत, या ठरावालाही उपस्थितांनी एकमताने संमती दिली.

‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे अ‍ॅड. प्रभाष ठाकूर यांनी सांगितले की, भारतविरोधी विचारसरणीच्या षड्यंत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ व राष्ट्रभक्त वकिलांचे संघटन उभे केले जाईल. बिहारमधील विविध जिल्ह्यांत अधिवक्ता संमेलने घेऊन हिंदु संघटनांना आवश्यक ते कायदेशीर प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते धर्मकार्यासाठी सक्षम होतील.

हिंदु जनजागृती समितीचे उत्तर प्रदेश व बिहार राज्य समन्वयक विश्वनाथ कुलकर्णी यांनी आगामी मोहिमेची घोषणा केली. बिहारमध्ये ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवून ‘हलालमुक्त बिहार’ अभियानाला गती दिली जाईल. तसेच, येणाऱ्या हनुमान जयंतीच्या दिवशी राज्यभर ‘गदापूजन’ आयोजित करून या जनजागृती अभियानाचा प्रारंभ केला जाणार आहे.

या अधिवेशनाला बिहारमधील अनेक जिल्ह्यांतील हिंदु संघटनांचे पदाधिकारी, संत, मंदिर विश्वस्त, उद्योगपती, पत्रकार आणि संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी आयोजनामुळे बिहारमध्ये हिंदुत्वाच्या कार्याला नवी दिशा मिळाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख