Monday, June 24, 2024

देवेंद्र फडणवीस यांचे खुले पत्र; “…यामुळे मतदाराची भाजपला साथ”

Share

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या व महाराष्ट्रातील (Maharashtra) अंतिम टप्प्याचे मतदान सोमवारी (ता.२०) पार पडले. मतदान झाल्यानंतर आता सहावा टप्पा २५ मे तर सातवा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. त्यानंतर निकाल ४ जूनला लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तसंच एक खुलं पत्रही पोस्ट केलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचे पत्र…

सप्रेम नमस्कार

लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारांनी लोकशाहीतील या सर्वोच्च महोत्सवात, निवडणूक प्रक्रियेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मतदारांच्या मनामनात मोदी होते. त्यामुळे त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाजपाला साथ दिली. मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचा अतिशय मनापासून आभारी आहे.

16 मार्च 2024 रोजी निवडणुका जाहीर झाल्या आणि तेव्हापासून आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. भाजपात आपण कायमच निवडणुकीसाठी सज्ज असतो. संघटनात्मक कार्य ही आपली सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे नव्याने तयारी करावी लागत नाही. पण, तरीही 16 मार्चपासून आपला प्रत्येक कार्यकर्ता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी अहोरात्र झटला. राज्यातील पाचही टप्प्यात प्रचंड परिश्रम करणाऱ्या तुम्हा सर्वांना मी सलाम करतो, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही भक्कम साथ दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरेजी हेही महायुतीच्या बाजूने उभे राहिले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवलेजी, रासपाचे महादेव जानकरजी, रयतक्रांतीचे सदाभाऊ खोत, पिरिपाचे प्रा. जोगेंद्र कवाडेजी, जनसुराज्यचे विनय कोरेजी आणि इतरही सहयोगी पक्षांनी (विस्ताराअभावी सारीच नावे येथे घेतली नाही) सुद्धा प्रचंड परिश्रम घेतले, या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा जी, केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांच्या मार्गदर्शनात, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात या निवडणूक प्रचारमोहीमेचे यशस्वी संचालन झाले. आमचे प्रभारी डॉ. दिनेशजी शर्मा, सहप्रभारी निर्मलकुमार सुराना जी, जयभानसिंग पवैय्या यांचे मार्गदर्शन संपूर्ण निवडणूक प्रचार प्रक्रियेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना लाभले. मी त्यांचाही अतिशय मनःपूर्वक आभारी आहे.

आपल्या सर्वांच्या परिश्रमाने आपण महाराष्ट्रात चांगले यश संपादन करु आणि निश्चितच 4 जूननंतर पुन्हा एकदा आपले लाडके नेते, भारताचे वैश्विक नेतृत्त्व मा. नरेंद्र मोदीजी हे पुन्हा एकदा भारतमातेच्या सेवेसाठी प्रधानसेवक म्हणून जबाबदारी स्वीकारतील, यात शंका नाही.

पुनश्चः एकदा सर्वांचे मनापासून आभार !

अन्य लेख

संबंधित लेख