नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जात आहे. प्रगतीच्या या प्रवासात डिजिटल इकॉनॉमिचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण व लोकार्पण प्रसंगी केली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) हस्ते अनावरण व लोकार्पण करण्यात आले.
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभार्थ्यांना दिला जाणारा लाभ हा याच डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही मध्यस्थाविना सरळ त्याच्या खात्यात जमा होत आहे. जगाच्या तुलनेत आपण साध्य केलेल्या लक्षणीय प्रगतीकडे सर्व देश आश्चर्याने पाहात असल्याचे ते म्हणाले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे नवे प्रवेशद्वार खुले झाले आहे. यात अनेक संधी दडलेल्या आहेत. खेड्यापाड्यात हे तंत्रज्ञान आता रुजले असून आपल्याला आता कुशल मनुष्यबळाची गरज आहे. यासाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. रामदेवबाबांसारख्या त्यागावर उभारलेल्या संस्थेतून येणारी विद्यार्थी हे देशाच्या प्रगतीला मोलाचा हातभार लावतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.