लातूर : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ या विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १६ मार्च २०२६ रोजी लातूर येथे संपन्न होणार आहे.
ज्ञानेश्वर माउलींनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जगाला अध्यात्मिक ज्ञानाचा आणि भक्तीपरंपरेचा मार्ग दाखवला. त्यांच्या याच दैवी विचारांचा, आध्यात्मिक ज्ञानाचा आणि प्रदीर्घ भक्तीपरंपरेचा अनुभव नव्या पिढीला मिळावा, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रसिद्ध व्याख्याते आणि स्वास्थ्य व समाजविषयक प्रबोधनकार गणेश शिंदे हे या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.
हा भव्य सोहळा सोमवार, १६ मार्च रोजी सायंकाळी ६:०० वाजता, दगडोजीराव देशमुख स्मृती भवन, मार्केट यार्ड, मोती नगर, लातूर येथे पार पडेल.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, सर्व भक्तांसाठी आणि रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. लातूरमधील नागरिक, वारकरी संप्रदाय आणि विद्यार्थ्यांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, लातूरमधील हा सोहळा आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.