भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत आघाडीचे स्थान मिळवून देणे आणि पृथ्वीला एक हरित व स्वच्छ ग्रह बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुण्यात भारतातील पहिल्या बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन केले
भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत एक आघाडीचा देश बनविणे आणि एक स्वच्छ, हरित ग्रह सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री (स्वतंत्र प्रभार),भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणु ऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज दिल्लीहून दूरदृश्य प्रणालीद्वारे पुण्यातील जेजुरी येथे भारतातील पहिल्या बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधेचे उद्घाटन केले. ही सुविधा प्राज इंडस्ट्रीजने तयार केली आहे.
“भारतासाठी ही ‘अशा -प्रकारची पहिलीच बायोपॉलिमर डेमोन्स्ट्रेशन सुविधा’ असून पॉलिलॅक्टिक ऍसिड बायोप्लास्टिकच्या उत्पादनामध्ये स्वदेशी एकीकृत तंत्रज्ञान विकसित करण्याचा एक अग्रणी प्रयत्न आहे. यातून शाश्वत उपाय विकसित करण्याप्रति भारताची वचनबद्धता दिसून येते. यावरून जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी जीवाश्म-आधारित प्लास्टिककडून पर्यावरण-स्नेही पर्यायाकडे वळण्याचा भारताचा दृढ निश्चय अधोरेखित होतो.”
“2023 मध्ये आपल्या जैवअर्थव्यवस्थेने 150 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक वाढ नोंदवली असून 2030 पर्यंत ती 300 अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.”