Tuesday, March 17, 2026

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त गंगाखेडमध्ये उद्या ‘मूक पदयात्रा’

Share

गंगाखेड (परभाणी) : ‘देव, देश आणि धर्म’ यांच्या रक्षणासाठी अमानवीय छळ सोसूनही स्वराज्य आणि स्वधर्माशी प्रतारणा न करणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा उद्या ३३७ वा बलिदान दिन आहे. या निमित्ताने बुधवार, १८ मार्च २०२६ रोजी गंगाखेड शहरात भव्य ‘मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गंगाखेड विभाग आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने महिनाभर सुरू असलेल्या ‘धर्मवीर बलिदान मासाची’ सांगता या पदयात्रेने होणार आहे.

मूक पदयात्रेचा मार्ग आणि वेळ

ही पदयात्रा सायंकाळी ठीक ६:०० वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून सुरू होईल. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, श्रीराम चौक, भगवती माता मंदिर मार्गे ही यात्रा मार्गक्रमण करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक (उड्डाणपूल) येथे पोहोचेल. या ठिकाणी शंभूराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदयात्रेचा समारोप होईल.

बलिदानाचा स्मृती जागर

औरंगजेबाच्या कैदेत असताना शंभूराजांनी सोसलेल्या ३२ दिवसांच्या बलिदानाची स्मृती म्हणून दरवर्षी हिंदू समाजातर्फे हा बलिदान मास पाळला जातो. उद्या या मासाचा शेवटचा दिवस असून, मूक पदयात्रेच्या माध्यमातून शंभूराजांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. “हे आपल्या प्रत्येकाचे आद्य धर्मकर्तव्य आहे.”

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गंगाखेड विभागाच्या वतीने सर्व हिंदू बांधवांना, माता-भगिनींना आणि शिव-शंभू भक्तांना आपल्या मित्रपरिवारासह या मूक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख