Wednesday, February 4, 2026

नाशिक महाकुंभ २०२६ : आखाड्यांमधील विकासकामांचा श्रीगणेशा; साधू-संतांच्या सुविधांसाठी शासन कटिबद्ध – गिरीश महाजन

Share

त्र्यंबकेश्वर : आगामी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६’ च्या तयारीने आता वेग घेतला आहे. या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर येथील विविध आखाड्यांमध्ये करण्यात येणाऱ्या विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. महाकुंभासाठी येणाऱ्या लाखो साधू-महंतांना उत्तम सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाला कडक निर्देश दिले. ते म्हणाले की, “महाकुंभाच्या यशस्वी आयोजनात आखाडे आणि साधू-संतांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. त्यांच्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा केवळ तात्पुरत्या न राहता दर्जेदार आणि टिकाऊ असाव्यात. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”

कुंभमेळ्याचे नियोजन करताना सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले. महंत, साधू-संत, आखाडा परिषदेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन यांच्या सहकार्याने नाशिक–त्र्यंबकेश्वर महाकुंभ २०२६ निश्चितच भव्य, सुव्यवस्थित व जागतिक दर्जाचा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरीजी (निरंजनी आखाडा), अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज, कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या अध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्यासह सर्व आखाड्यांचे महंत, साधू, संत व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.”

अन्य लेख

संबंधित लेख