Tuesday, September 17, 2024

शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Share

ठाणे : हे शासन गोविंदा पथकांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. “लाडक्या बहिणी” प्रमाणेच “सुरक्षित बहीण” ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे बालपण आठवते. आम्हीही आमच्या लहानपणी या खेळात उत्साहाने सहभागी होवून दहीहंड्या फोडत असू. आता हा उत्सव सातासमुद्रापलीकडे पोहोचलाय. “प्रो-कबड्डी” प्रमाणे हा “प्रो-गोविंदा” खेळ झाला. शासनाने या खेळाला साहसी खेळ म्हणून मान्यताही दिली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घालून या खेळाला लोकप्रिय बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांनी या खेळाची व्यापकता वाढविली आहे. त्यातला साहसीपणा व धोका लक्षात घेऊन सर्व गोविंदांचा विमा काढण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. शासनाने ही मागणी तात्काळ मान्य केली. सर्व गोविंदांचा विमा काढण्यात आला.

ते पुढे म्हणाले, असे असले तरी हा उत्सव सुरक्षितपणे साजरा करणे, ही आपली जबाबदारी आहे. आपले कुटुंबीय आपली वाट पाहत असतात. 2011 या वर्षी नऊ थरांचा विक्रम या दहीहंडी उत्सवात झाला होता. “जय जवान” या मित्रमंडळाने हा विक्रम केला होता आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली होती. आपल्याकडे एकापेक्षा एक मित्रमंडळे, दहीहंडी पथके आहेत, जे या खेळामधील विक्रम दरवर्षी मोडताना दिसत आहेत. परंतु ही सोपी गोष्ट नव्हे. यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते, कसून सराव करावा लागतो. एकाग्रपणे सांघिक भावनेने या खेळाचे प्राविण्य मिळवावे लागते. या गोविंदाची मेहनत बघून हे शासन आपल्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहील. जे जे शक्य आहे ते सर्व काही गोविंदांसाठी करण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला गोविंदा पथकांचेही विशेष अभिनंदन केले.

अन्य लेख

संबंधित लेख