Thursday, November 7, 2024

ऋणानुबंध साखरेच्या गाठीशी

Share

गुढीपाडव्यासाठी गाठीची खरेदी आवर्जून केली जाते. गुढीसाठी गाठी हवीच. गाठींच्या निर्मितीची प्रक्रिया कशी असते, त्याची ही माहिती.

‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ या पं. कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या स्वरांतील नाट्यगीताची मोहिनी सर्वांना आहे. तसाच बाळगोपाळांपासून सर्वांचा साखरेच्या गाठीशी ऋणानुबंध जुळलेला आहे. नव्या आशा-आकांक्षा आणि नव संकल्पांची गुढी उभारून मोठ्या दिमाखात हिंदू नववर्षांची सुरुवात केली जाते. या गुढीच्या उभारणीमध्ये साखरेच्या गाठीचे अनन्यसाधारण महत्त्व असते. यंदाही विविध आकारातील पदकांनी सुशोभित गाठ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गाठ्यांच्या किमतीमध्ये फारशी वाढ झालेली नाही.

‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’, अशी आपल्याकडे म्हण आहे. त्या धर्तीवर प्रत्येकालाच साखर खायला आवडते. साखरेची गाठी हीदेखील त्याला अपवाद नाही. मराठी नववर्षारंभ हा या साखरेच्या गाठीशी जोडला गेला आहे. महापराक्रमी रावणाचा वध करून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येला परतले तेव्हा घरोघरी गुढी उभारून त्यांचे स्वागत करण्यात आले. तेव्हापासून आपल्याकडे गुढी उभारण्याची प्रथा आहे. बांबूला उलट करून लावलेला चंबू (गडू), त्याला जोडलेले भगवे किंवा पांढरे रेशमी वस्त्र, फुलांचा हार आणि साखरेची गाठी लावून गुढी उभारली जाते. सूर्योदयानंतर स्नान करून उभारलेली गुढी सूर्यास्तापूर्वी पूजा करून उतरवली जाते. कडुनिंबाचे पंचामृत नैवेद्य म्हणून दाखविल्यानंतर घरातील सर्वजण ते तीर्थ म्हणून घेतात. घरातील बाळगोपाळांना गाठी घातली जाते. गाठीमध्ये असलेली पदके तोडून खाण्यामध्ये मुलांना आनंद असतो. अगदी त्या गाठीतील पदकांना जोडणाऱ्या दोऱ्याला असलेली साखरही आवडीने तोंडामध्ये विरघळेपर्यंत मुले गाठी खाण्याची पर्वणी अनुभवतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या खरेदीमध्ये गुढीसाठी गाठी खरेदी केली जातेच. पण, त्याबरोबरच मुलांसाठीही आवर्जून गाठीची खरेदी केली जाते.

धूलिवंदन आणि रंगपंचमीला रंग आणि पिचकाऱ्यांचे जसे महत्त्व आहे तितकेच गुढीपाडवा या सणाला साखरेच्या गाठीचे महत्त्व आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर गाठ्यांची आठवण होते. शहरातील विविध भागात गाठ्या तयार करण्याचे कारखाने असून त्या ठिकाणी चार ते पाच महिन्यांपासून गाठ्या तयार करण्याचे काम सुरू असते. गाठ्या तयार करण्याच्या साच्यात साखरेचा पाक ओतून तीन ते चार तास ठेवतात. नंतर साचे उघडले की वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक अशा गाठ्या तयार होत असतात. आधुनिक साच्यामध्ये लवकर आणि अधिकाधिक गाठ्या तयार होत असतात. साखरेच्या पाकापासून तयार केल्या जाणाऱ्या गाठ्यांची किंमत साखरेच्या किमतीवर अवलंबून असते. साधारणपणे शंभर किलो साखरेत १२५ किलो वजनाच्या गाठ्या तयार होतात. एका गाठीत दहा ते बारा पदके असतात. आकारानुसार एका किलोमध्ये कधी पाच सहा गाठ्या तर कधी एकच गाठी बसते. देवस्थांनाकडून २५ किलो वजनाच्या एका गाठीची मागणी होत असते. ग्रामदैवत श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, सारसबाग येथील तळ्यातील गणपती, चतुशृंगी माता यांसह विविध मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीला साखरेची गाठी परिधान केली जाते.

उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना गाठी खाऊन निघाले की ऊन लागत नाही, असे घरची वडीलधारी मंडळी सांगतात. त्यामुळे कैरीचे पन्हे तयार करताना साखरेऐवजी गाठीचाही उपयोग करण्यात येतो. गुढी उभारताना पूजन करण्यात आलेली गाठी काढून ठेवल्यानंतर ही गाठी रामनवमीच्या दिवशी रामाला अर्पण करण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. त्यामुळे रामनवमीला तुळशीबाग मंदिरासह शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या हातामध्ये रामाला अर्पण करण्यासाठीच्या गाठी दिसतात.

लाल, पिवळ्या, नारंगी आणि रंगांच्या साखरेच्या गाठींबरोबरच सुकामेवा (ड्रायफ्रुट) लावलेल्या साखरेच्या गाठींनी बाजारपेठ सजली आहे. गुढीपाडव्याचा सण मंगळवारी (९ एप्रिल) साजरा होत असून साखरेच्या गाठी खरेदीसाठी रविवार पेठ, मंडईसह इतर बाजारपेठांमध्ये लगबग पाहावयास मिळत आहे. वैविध्यपूर्ण रंगातील गाठींसह ड्रायफ्रुट असलेल्या साखर गाठींना मागणी आहे. घराच्या अंगणात तसेच सदनिकेच्या खिडकीमध्ये उभारण्यात येणाऱ्या गुढीसाठी साखरेच्या गाठीला मागणी आहे. विविध रंगांतील गाठी सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी असे गाठींचे नानाविध रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. छोट्या आकारातील पारंपरिक साखरेची गाठी अगदी २० रुपयांपासून मिळत आहे. गाठीच्या आकारमानानुसार गाठीच्या किमती ठरलेल्या असतात. सध्या साखरेच्या गाठी बनविण्याच्या कारखान्यातील लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळेच सणाचा गोडवा वाढविण्यासाठी साखरेच्या गाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. कारखान्यांमध्ये तयार करून या गाठी घाऊक भावात दुकानांमधून विकल्या जात आहेत.

……………………..

महाशिवरात्रीच्या दिवशी साखरेचा पाक बनविण्यासाठीची मोठ्या आकारातील कढई, गाठी बनविण्याचे साचे या साधनांची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशीपासून साखरेच्या गाठी बनविण्यास सुरुवात केली जाते. दररोज पाचशे किलो साखरेच्या गाठींची निर्मिती करून त्याची घाऊक भावामध्ये विक्री करीत आहोत. छोट्या आकारातील गाठींची किंमत २० रुपयांपासून आहे. तर, मोठ्या आकारातील गाठी शंभर रुपयांपासून पुढे आहे. गाठींच्या किमती वाढलेल्या नाहीत.
अमर अगरवाल, गाठी बनविणारे कारखानदार व्यावसायिक

कारखान्यांमधून गाठी आणून आम्ही किरकोळ भावात विकतो. गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांमधील गाठींना मागणी आहे. लहान मुलांच्या गळ्यात गाठी घालण्यासाठी आणि गुढीच्या उभारणीसाठीसाठी साखरेच्या गाठी विकत घेतल्या जात आहेत.
मनीष काची, गाठी विक्रेते व्यावसायिक

अन्य लेख

संबंधित लेख