Tuesday, February 10, 2026

श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ची जोरदार तयारी; खारघर येथील कार्यक्रमाची रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’

Share

नवी मुंबई | ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील खारघर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाची ‘आरम्भता की अरदास’

खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या आयोजनाची सुरुवात आज (४ डिसेंबर) रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ‘आरम्भता की अरदास’ (कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना) करून करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, “या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी रायगड जिल्ह्याला मिळाली आहे, हे आमचे भाग्य आहे. या कार्यक्रमात शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, वाल्मिकी, भगत नामदेव परंपरा आणि सिंधी समाजातील प्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे.” प्रशासनाच्या संपूर्ण समन्वयाने हा कार्यक्रम नियोजनबद्धपणे पार पाडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, “या कार्यक्रमामुळे समाजाच्या गौरवशाली, पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे बळ मिळणार असून बंधुत्वाचा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.”

युवा पिढीपर्यंत पोहोचणार शौर्य

महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष मिल्कित सिंग बल यांनी सांगितले की, युवा पिढीपर्यंत श्री गुरु तेग बहादूर यांचे कार्य पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सहकार्याने राज्यात नांदेड, नागपूर आणि नवी मुंबईतील खारघर येथे हे मोठे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

‘आरम्भता की अरदास’ सोहळ्यावेळी क्षेत्रिय आयोजन समितीचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, सुप्रीम कौन्सिलचे अध्यक्ष जसपाल सिंग सिद्धू, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, चरणदीप सिंग (हॅप्पी सिंग) आणि उपजिल्हाधिकारी रविंद्र राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख