Sunday, February 16, 2025

वनबंधू चैत्राम पवार यांच्या कार्याचा सन्मान

Share

गावकऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या सहकार्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे लक्षणीय काम चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांनी सुरू केले त्याला आता तीस-पस्तीस वर्षे झाली आहेत. वनवासी बंधूंच्या सहभागातून आणि श्रमदानातून बारीपाडा या वनवासी पाड्याचा आणि परिसराचा सर्वांगीण विकास चैत्राम पवार यांनी करून दाखवला. त्यांच्या कार्याची दखल गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानेही घेतली. पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या ‘महाराष्ट्र वनभूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आणि बारीपाडा हे गाव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नकाशावर झळकले.

केंद्र शासनाकडून प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. ज्यांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत त्यामधील एक आहेत धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या ओसाड झालेल्या पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार. त्यांची ओळख वनबंधू किंवा बारीपाड्याचे वनभूषण अशीच आहे. वनसंवर्धनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा जो गौरव झाला आहे, तो हजारो कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदादायी ठरला आहे. 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम भागात बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. ओसाड असलेल्या या पाड्याचे नंदनवन करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे चैत्राम पवार. वनवासी बांधवांनी नेहमीच जंगलांचे रक्षणच केले आहे आणि सेवाही केली आहे. याच शृंखलेत बारीपाड्याचे वृक्षमित्र चैत्राम पवार यांची वृक्ष सेवा जोडली गेली.  बारीपाड्याच्या विकासाची ही लोकचळवळ १९९० मध्ये सुरू झाली. या भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती, उजाड माळरान सर्वत्र होते, शेतात पीक नाही, गावात अशिक्षित आणि निरक्षर लोकांचीच संख्या अधिक. झाडांची संख्या देखील कमी अशा परिस्थितीत बारीपाडा गाव होते. ही परिस्थिती चैत्राम पवार यांच्या लक्षात आली आणि त्यांनी गावकऱ्यांच्या सहकार्यातून परिवर्तनाला प्रारंभ केला. आपल्याच गावात मोठ्या जिद्दीने त्यांनी परिवतर्नाचा प्रवास सुरू केला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला.

प्रगतीची वाटचाल

त्यानंतर सुरू झाला प्रगतीचा प्रवास. गावात महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम सुरू झाले. व्यसनमुक्ती, सकस आहार, स्वच्छता, पाण्याच्या वापराबाबत जनजागृती, शौचालयाचा वापर, आरोग्य संवर्धन यासाठी अनेक कार्यक्रम करण्यात आले. जागृतीचे उपक्रम राबवण्यात आले. गावाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. पर्यावरण संवधर्नाच्या क्षेत्रातही लक्षणीय काम झाले. त्यानंतर संयुक्त वनव्यवस्थापनातून चारशे हेक्टर क्षेत्रावरील जंगलाचे जतन झाले. चैत्राम पवार यांनी पाच हजारांहून अधिक झाडे स्वप्रयत्नातून जोपासली. वनवासी कल्याण आश्रमाचीही साथ या साऱ्या कार्याला मिळाली. बारीपाड्याची ओळखच सांगायची तर समग्र आदर्श ग्राम विकास अशी सांगता येईल आणि ही ओळख निर्माण झाली ती ध्येयनिष्ठ वनबंधू चैत्राम पवार यांच्यामुळे.

सदैव कार्यकर्ता म्हणूनच काम करणाऱ्या चैत्राम पवार यांनी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि सक्षमीकरण याचबरोबरीने वनहक्क कायदा, कृषी विकास आणि शाश्वत विकास या विषयांवर वनवासी क्षेत्रात काम केले आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील १०० गावांमध्ये या सामाजिक कार्याचा विस्तार केला आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या विविध जबाबदाऱ्याही ते समर्थपणे सांभाळतात.

आवश्यक असलेल्या पाण्याच्या साठ्याचा सिंचनासाठी काटकसरीने वापर करणे, मृद आणि जलसंधारणाची कामे करणे, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे, अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबतचे महत्त्व पटवून देणे, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, सार्वजनिक आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक करणे अशी अनेक कामे गावांमध्ये झाली आहेत.

चैत्राम पवार यांची भावना

चैत्राम पवार यांना यापूर्वी अनेक विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी- २०२३, भारत जैवविविधता पुरस्कार – २०१४, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा निधी कार्य पुरस्कार, संत तुकाराम वनग्राम पुरस्कार, वसुंधरा पुरस्कार, आदिवासी अस्मिता पुरस्कार, नातू फाउंडेशनकडून दिला जाणारा ‘सेवाव्रत कार्यकर्ता पुरस्कार’, पु. भा. भावे स्मृती पुरस्कार, संस्कार कवच पुरस्कार, गो. नी. दांडेकर स्मृती नीरा गोपाल पुरस्कार आणि राज्य शासनाचा जलनायक पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान झाले असले तरी चैत्राम पवार कार्यकर्ता म्हणूनच गावांच्या परिवर्तनाचे काम सातत्याने करत आहेत.

‘‘गावकरी, वनवासी कल्याण आश्रम आणि पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या खान्देशातील सर्वच व्यक्ती, संस्थांचा हा सन्मान आहे. वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्यातून, मार्गदर्शनातून हे काम झाले. तसेच या कार्याची व्याप्तीही वनवासी कल्याण आश्रमामुळे वाढत गेली,” अशी भावना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांची ही भावना निश्चितच बोलकी आहे. ही खरोखऱच एका कार्यकर्त्याची विनम्र भावना आहे.

प्रतिनिधी : नबी मराठी

अन्य लेख

संबंधित लेख