Friday, September 20, 2024

भारताचे संविधान जगात सर्वश्रेष्ठ असून संविधान बदल हा अपप्रचार आहे – अंबादास सकट

Share

छत्रपती संभाजीनगर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला.

या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायच्या संदर्भात चर्चा – संवाद झाला. मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक विषयांवर मते व्यक्त केली.

यावेळी मंचावर उपस्थित जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास सकट यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारताचे संविधान जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ आहे, एकता व अखंडता निर्माण करणारे आहे. संविधान कोणीही बदलू शकत नाही, संविधानाच्या गाभा बदलता येत नाही. संविधानात दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. अनुसूचित जाती – जमातीचे आरक्षण बंद करता येत नाही. याबाबत होणारा खोटा प्रचार हाणून पाडला पाहिजे.

यावेळी उपस्थित असलेले विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे यांनी मत व्यक्त केले की, भारतीय संविधान हे आपल्या एकतेचे सूत्र असून त्यात बदल होणे शक्य नाही. सामाजिक न्याय शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे सर्वांचीच जबाबदारी आहे. संविधान बदल होणार, आरक्षण जाणार या निव्वळ अफवा असून राजकीय लाभासाठी हेतुपुरस्सर पसरवलेल्या जात आहेत. अन्याय अत्याचारांच्या घटनांवर न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी अवाज उठवला पाहीजे, भारतीय संविधानाला खरा धोका कम्युनिस्ट माओवादी, कट्टर धर्मांध व फुटीरतावादी गटांकडून व त्यांना पोसणाऱ्या राजकीय पक्षांकडून आहे. तुषार साळुंखे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ.संजय राऊत यांनी आभार व्यक्त केले.

या मेळाव्यास डॉ.निखिल आठवले, डाॅ.दिवाकर कुलकर्णी, किशोर जगताप, अविनाश गायकवाड, संजय भालेराव, डॉ.संजय राऊत, सुनिल भोकरे, रामनाथ केदारे व किशोर दिवेकर तसेच जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

अन्य लेख

संबंधित लेख