Saturday, September 7, 2024

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान: कसे जाल? काय पाहाल?

Share

‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील सर्वाधिक पसंती असलेले अभयारण्य आहे. १९ एप्रिल या जिम कॉर्बेट यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉर्बेट यांचे निसर्गप्रेम, त्यांनी केलेले संशोधन आणि सोबतच जिम कॉर्बेट अभयारण्यात कसे जाल? काय पाहाल? याची माहिती.

उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील ‘जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान’ हे भारतातील काही सर्वोत्तम राष्ट्रीय उद्यानांपैकी एक मानले जाते. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान असून हा सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प आहे. ज्यांच्या नावे या उद्यानाचे नामकरण झाले आहे ते जिम कॉर्बेट हे आयरिश वंशाचे भारतीय शिकारी, संशोधक, लेखक होते. राष्ट्रीय उद्यानाला एका शिकारी व्यक्तीच्या नावावरून का नाव दिले गेले असावे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यासाठी कॉर्बेट यांचे निसर्ग – जंगलप्रेम आणि संशोधन जाणून घेण्यासारखे आहे.

एडवर्ड जेम्स ‘जिम’  कॉर्बेट यांचा जन्म २५ जुलै १८७५ रोजी हिमालयाच्या कुमाऊॅं पर्वतरांगांच्या खोऱ्यात वसलेल्या नैनिताल (सध्याचे उत्तराखंड राज्य) येथे झाला. क्रिस्तोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे हे आठवे अपत्य होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबीय त्यांच्या कालाधुंगी येथील घरी जात असत. लहानपणापासून जिम यांना वन्यजीवांविषयी आकर्षण होते. पुढे त्यांनी रेल्वेमध्ये नोकरीही केली. त्यांचे जंगलाविषयीचे ज्ञान आणि अनुभव पाहून रेल्वे अधिकारी व इतर सगळे लोक त्यांना निसर्गवादी/निसर्गवैज्ञानिक म्हणूनच ओळखत. तेव्हाचे डेप्युटी कमिशनर (नैनिताल) बर्थोऊंड यांच्या विनंतीवरून १९०७ मध्ये कॉर्बेट यांनी पहिल्यांदा नरभक्षक वाघाची शिकार केली. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली. त्याबद्दलचे अनुभव त्यांच्या पुस्तकात लिहिताना त्यांनी त्या शिकारींमागची कारणेही लिहिली आहेत. त्यांनी फक्त नरभक्षक वाघ आणि बिबटे यांचीच शिकार केली. परंतु जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील वाघांची आणि इतर मोठ्या वन्यजीवांची संख्या कमी होत आहे. म्हणून त्यांनी बंदुकीऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्यजीव टिपले. लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली राष्ट्रीय उद्यान घोषित करण्याचा मान जिमना मिळाला. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ मध्ये कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान असे नामांतरण करण्यात आले. जिम कॉर्बेट यांचा मृत्यू १९ एप्रिल १९५५ रोजी केनियामध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ मध्ये वाघाच्या एका उपजातीला (Indo Chinese Tiger) Panthera tigris corbetti (Corbett’s Tiger)  असे त्यांचे नाव देण्यात आले.

रॉयल बेंगॉल टायगर, या नामशेष होणाऱ्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे हा जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता. त्यामुळे या अभयारण्यातील प्रमुख प्राणी वाघ आहे. आजमितीला या अभयारण्यात २६० वाघ (२०२२ व्याघ्रगणना) आहेत. ७०० च्या आसपास हत्ती, बिबटे, स्लोथ व हिमालयन अस्वल, इतर ५० प्रकारचे सस्तन प्राणी, ५८० (२०२३ मधील गणनेनुसार) प्रकारचे पक्षी, ३३ प्रकारचे सरपटणारे जीव व ६१७ विविध झाडांच्या प्रजाती पाहायला मिळतात.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्य हे वन्यजीव पर्यटनाकरीता सर्वांसाठी खुले आहे. तिथे जाण्यासाठी दिल्ली ते रामनगर ट्रेन असून बस किंवा गाडीनेदेखील (२६० किमी) हा प्रवास करता येतो. रामनगरपासून जवळ असलेले जिम कॉर्बेट अभयारण्य हे सुमारे १४०० चौरस किमी असून ५२० चौरस किमी कोर तर इतर बफर भाग आहे.

जिम कॉर्बेट अभयारण्यात कसे जाल? काय पाहाल?

  • उद्यान सुरू असण्याचे महिने व वेळा.
  • जिम कॉर्बेट अभयारण्यामधील बिजरानी झिरना, धेला, गर्जिया, सोनानदी, पखरो आणि दुर्गादेवी या सफारी अंदाजे १-१५ ऑक्टोबर दरम्यान आणि ढिकाला भागातील सफारी १५ नोव्हेंबरपासून सुरू होतात.
  • या सफारी अंदाजे १५-३० जूनपर्यंत सुरू असतात. १५ जून ते १५ नोव्हेंबर या काळात पर्यटकांना जंगलात प्रवेश नसतो.
  • सफारीच्या वेळा ऋतूप्रमाणे बदलतात. उदा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळची सफारी ५-५.३० तर दुपारची सफारी ३-३.३० वाजता असते. हिवाळ्यात सकाळी ६.३० आणि दुपारी १.३० याप्रमाणे वेळा बदलतात.
  • दिवसाच्या सफारीबरोबरच रात्रीचे जंगल अनुभवायचे असल्यास रात्रीच्या सफारीसाठीही बुकिंग करता येते. बुकिंगसाठी ‘जिम कॉर्बेट नॅशनल पार्क’च्या अधिकृत वेबसाईटवरून बुकिंग करता येते.
  • वेगवेगळ्या झोन्ससाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे आहेत. ढिकाला झोन सर्वांत लोकप्रिय असून त्या खालोखाल बिजरानी झोनला पर्यटकांची पसंती असते.
  • ढिकालामधील विश्रांतीगृह जंगलाच्या आतील भागात आहे. तिथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो.
  • जिम कॉर्बेट उद्यानाच्या बाहेरील भागात अनेक हॉटेले आहेत. बुकिंग करताना सर्वप्रथम सफारी बुकिंग करून मगच हॉटेल निवडावे. असे केल्याने सफारी प्रवेशद्वारापासून जवळचे हॉटेल निवडता येते व सफारी प्रवेशद्वारापर्यंतचा ये-जा करण्याचा वेळ वाचवता येतो. 
  • जीप सफारीप्रमाणेच कॅन्टर सफारीचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. एका जीपमध्ये सहा मोठी माणसे व दोन लहान मुले (५ वर्षांखालील) बसू शकतात. तर कॅन्टरमध्ये २०-२२ जण बसण्याची व्यवस्था असते.

प्रत्येक ठिकाणचे काही नियम असतात, त्याप्रमाणेच जंगलाचेही नियम असतात. हे नियम ठरवायचे काम वनविभाग करते. जिम कॉर्बेट उद्यानात, तसेच भारतातील इतर उद्यानात घालून दिलेले नियम पाळणे अनिवार्य असते.

  • सफारी सुरू असताना जीपमधून खाली उतरण्यास बंदी आहे.
  • जोरात बोलणे, गाणी वाजवणे, वन्यजीवांना त्रास होईल असे कुठलेही वर्तन न करणे हे कटाक्षाने पाळावे लागते अथवा सफारी रद्द करण्याचे अधिकार वन अधिकाऱ्याला असतात.
  • उद्यानात कचरा न टाकणे,  वन्यजीवांना खायला न देणे या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.
  • आपल्याबरोबर असणारे ड्रायव्हर आणि गाईड्स हे त्यांच्या कामात निष्णात असल्याने त्यांचे ऐकणे व त्यांच्यावर विश्वास ठेवणे फायद्याचे असते. तसेच त्यांचा मान ठेवणेही तेवढेच आवश्यक आहे.

जिम कॉर्बेट हे अतिशय सुंदर आणि विविधता असलेले जंगल आहे. त्याचा इतिहास मोठा आहे. वन्यजीव संवर्धन हे वनविभागाचे उद्दिष्ट आहे, त्यात आपणही खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे. शेवटी निसर्ग वाचला तरच आपण वाचू… नाही का!

मैथिली जोशी
(लेखिका निसर्गप्रेमी आहेत. ‘जंगल राऊट्स’ ही त्यांची संस्था असून त्यांची निसर्ग भ्रमंती सतत सुरू असते.)

अन्य लेख

संबंधित लेख