Monday, February 2, 2026

शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाने विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह? भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा धारदार सवाल

Share

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापर करून शरद पवार गट ‘राजकीय अगतिकता’ दाखवत असल्याची बोचरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या ‘इकोसिस्टिम’च्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शरद पवारांच्या समर्थकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “शरद पवार बोलतात आणि त्यांच्या एचएमव्ही – His Master’s Voice – इकोसिस्टीमकडून तेच शब्द कोणताही विचार न करता, प्रश्न न विचारता, अक्षरशः सत्य म्हणून पाजळले जातात. हा आता अपवाद राहिलेला नाही; तो पायंडाच बनला आहे.”

अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर पवार गटाकडून जे राजकारण सुरू झाले, ते पाहता खरे तर शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला हवे होते. मात्र तसे न होता, सोयीस्करपणे सुनेत्रा पवार आणि भाजपावर टीकेचे बाण सोडले गेले. हा राजकीय प्रामाणिकपणा नव्हे, तर जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी नमूद केले.

केशव उपाध्ये पुढे म्हणाले कि,
या निमित्ताने काही साधे, पण अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित होतात.

ज्या दिवशी अपघात घडला, त्याच दिवशी पवार गटाकडून विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेला खुद्द शरद पवार यांनी सहमती दर्शवली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणीही अशा चर्चेची मागणी केलेली नव्हती. मग हा विषय इतक्या घाईने पुढे आणण्याची गरज नेमकी काय होती?

विलिनीकरणाची चर्चा ही पवार गटाची राजकीय हतबलता होती का?
कारण अजित पवार हे रालोआ आणि महायुतीतच राहणार, हे त्या क्षणी स्पष्ट होते.

जर विलिनीकरण होणारच होते, तर मग शरद पवारांची तथाकथित धर्मनिरपेक्ष भूमिका कुठे गेली?
ज्या भूमिकेचे कौतुक करताना माध्यमे कधीच थकत नव्हती, ती भूमिका अचानक गुंडाळून ठेवण्यात आली का?

विलिनीकरणाचा विचार सुरू होता, तर मग केंद्रातील युपीए आणि राज्यातील मविआ यांचे पुढे काय, हा प्रश्न एकाही माध्यमकर्मीला पडला नाही, संजय राऊत यांनाही हा प्रश्न पडू नये?

आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न…

दस्तुरखुद्द शरद पवार यांनी अशी स्पष्ट भूमिका का घेतली नाही की—
“सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नको. मी कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्या जे निर्णय घेतील ते मला मान्य आहेत. दुखवटा संपल्यानंतरच राजकीय चर्चा करू.”

संयम, परिपक्वता आणि नैतिक उंची दर्शवणारी ही भूमिका शरद पवार घेऊ शकले नाहीत—यामागे नेमकं कारण काय? असे मत उपाध्ये यांनी व्यक्त केले.

पवार गटाच्या अगतिकेवर टीका
अजित पवारांच्या कुटुंबावर टीका करण्यापेक्षा शरद पवारांनी ज्येष्ठ म्हणून नैतिक आधार देणे अपेक्षित होते, असे मत उपाध्ये यांनी व्यक्त केले. मात्र, ज्या पद्धतीने विलिनीकरणाचे राजकारण खेळले गेले, त्यावरून पवार गटाची सत्ता मिळवण्यासाठीची अगतिकता स्पष्टपणे दिसून येते, असा टोलाही त्यांनी लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख