अखंड हिंदुस्तानच्या पंजाब प्रांतात वसंत ऋतुच्या आगमनाची साधारण ४० दिवस आधी वर्दी देणारा आपल्याकडच्या पंचांगाप्रमाणे माघ कृष्ण पंचमीला लाहोरला साजरा केला जाणारा “वसंत महोत्सव” म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असाच माहोल शेकडो वर्षांची परंपरा… म्हणजे किमान १३ व्या शतकापासून लाहोरचा संस्कृती जोपासणारा हा सण DNA एकच असल्यामुळे लाहोरचे हिंदू आणि मुसलमान अगदी सारख्याच उत्साहाने वसंतोत्सव साजरा करतात. (पंजाबी उच्चार बसंत)
वसंत महोत्सवात प्रामुख्याने “पिवळे” कपडे परिधान करणे आणि पारंपारिक खाद्यपदार्थांचा आनंद घेणे तर समाविष्ट आहेच. पण याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लाहोरचे आभाळ वसंत महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते. पतंग कापल्यावर “बो काटा” च्या (मुंबईत मकर संक्रांतीला ऐकू येणाऱ्या “कायप्यो छे”चा हा पंजाबी अनुवाद) आरोळ्यांनी लाहोरचे आसमान दुमदुमत जाते. आपल्या क्षात्रतेजाच्या परंपरेनुसार वसंत महोत्सवात आत्यानंदाने हवेत गोळीबार करणे ही तर अगदी सामान्य बाब आहे. वसंत महोत्सव म्हणजे लाहोरवासीयांचा “जल्लोष”.
वसंत महोत्सवात पतंग मांजा फिरकी, हॉटेल, रेस्टॉरंट, नवीन कपडे यांच्यामुळे लाहोरला अक्षरशः कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. महाराजा रणजित सिंग यांच्या काळात लाहोरमध्ये मोठ्या प्रमाणावर वसंत दरबार भरवला जात असे.
१९५० च्या दशकात बसंत हा सण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्साहात साजरा केला जात होता आणि तो सरकारी पातळीवर सुट्टी म्हणून देखील घोषित होत होता. अर्थात सरकारने सुट्टी दिली काय आणि नाही दिली काय लाहोरवासीयांसाठी वसंत महोत्सव म्हणजे सुट्टीचाच माहोल.

१४ ऑगस्ट १९४७ इतिहासात पहिल्यांदा धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन झाले. या विभाजनाच्या शोकांतिकेत सगळ्यात गाफील राहिला आणि त्यामुळे पस्तावला तो लाहोरचा हिंदू. १४ ऑगस्टला लाहोरवर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा झेंडा फडके पर्यंत तो विश्वासच ठेवायला तयार नव्हता की, ज्या रावी नदीच्या किनाऱ्यावरील कोट लखपत तुरुंगात भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले ते लाहोर हिंदुस्थानात नसेल. पण घात झाला आणि लाहोर रावी पार राहिले.
लाहोर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये गेले खरे पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याला “हिंदुस्तान”शी या वसंत महोत्सवाने घट्ट बांधून ठेवले होते. निर्हिंदू झालेले लाहोर वसंत महोत्सव मात्र त्याच धुमधडाक्यात साजरे करत होते. तेच ते नवीन पिवळे कपडे खाण्यापिण्याची रेलचेल आणि इंद्रधनुष्यासारखे रंगीबेरंगी पतंगांनी रंगलेले आस्मान तोच “बो काटा”चा कलकलाट आणि आनंदाच्या भरात केलेल्या हवेतल्या गोळीबारांचे कानठळ्या बसवणारे धडाके.
पण लाहोरवासीयांचा हा सगळा आनंद इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मुल्ला मौलवींना पसंत पडेना. त्यांनी वसंत महोत्सवाला ‘बिगर-इस्लामी’ मानून विरोध करायला सुरुवात केली. या कुरबुरी तक्रारी वाढतच गेल्या आणि पुढे पुढे तर मुल्ला मौलवींनी वसंत महोत्सव साजरा न करण्याबाबत धमक्याही दिल्या.
२००७ साली “मोहाजीर” असलेले जनरल परवेज मुशर्रफ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे सर्वासर्वे होते. खऱ्यापेक्षा बाटगा मोठ्याने बांग देतो म्हणतात तसे जनरल परवेज मुशर्रफ आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा काचेचा लेप असलेला किंवा धातूचा मांजा अत्यंत घातक ठरत असून यामुळे अनेक दुचाकीस्वारांचे गळे कापले जाऊन मृत्यू झाले. पतंग पकडण्याच्या नादात घरांच्या छतावरून पडून किंवा रस्ते अपघातात अनेक मुले आणि तरुण जखमी झाले. धातूच्या तारांचा वापर केल्यामुळे विजेच्या तारांमध्ये शॉर्ट-सर्किट होऊन मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे ग्रीडचेही नुकसान होत होते. उत्सवादरम्यान आनंदाच्या भरात केल्या जाणाऱ्या हवेतील गोळीबारामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी जातात. अशी विविध कारणे देऊन लाहोरच्या वसंत महोत्सवावर बंदी घातली.
मात्र सत्ताधाऱ्यांचा आणि न्यायालयाचा अंतस्थ हेतू हा वसंत महोत्सव बिगर इस्लामी असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालावी असा असल्याची लाहोरवासीयांची मनोमन खात्री पटली होती.
त्यानंतर गेली १८ वर्षे लाहोरच्या वसंत महोत्सवाचा “जल्लोष” कमी झाला असला तरी कमी अधिक प्रमाणात लाहोरवासीयांनी आपला सांस्कृतिक वारसा टिकून ठेवला होता. कोणीही पतंग उडवू नये म्हणून लाहोर पोलीस लाहोरवासीयांना आधी सज्जड दम देत असत आणि वसंत महोत्सवाच्या आगे मागे दोन-चार दिवस पोलिसांच्या गाड्या लाहोरच्या गल्लीबोळात गस्त घालत असत. हे सगळे निर्बंध शक्य तेवढे झुगारून लाहोरवासीयांनी चोरीछुपे का होईना पण वसंत महोत्सवाचा वारसा जपला.

मात्र यावर्षी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी सुमारे १८ वर्षांच्या बंदीनंतर वसंत महोत्सवावर (पतंगबाजी) लावलेली बंदी उठवली आहे. नव्हे वसंतोत्सवाला म्हणजे गुरुवार, ६ फेब्रुवारी आणि दुसऱ्या दिवशी देखील संपूर्ण पंजाब प्रांतात सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
सांस्कृतिक वारसा पुनरुज्जीवित करणे पर्यटन वाढवणे आणि या उत्सवाशी संबंधित पतंग मांजा फिरकी बनवणे. हॉटेल्स आणि कापड खरेदीसाठी (आणि हवेतल्या गोळीबारासाठी लागणाऱ्या बंदुकीच्या गोळ्यांच्या खरेदीसाठी) होणाऱ्या आर्थिक उलाढालीला चालना देणे हे या निर्णयामागील मुख्य कारण सांगितले जात आहे. भीक लागलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या बुडीत अर्थव्यवस्थेला तेवढाच वसंत महोत्सवाच्या काडीचा आधार. मात्र त्याचबरोबर कलाकारांच्या आणि जनतेच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे ही वस्तुस्थिती आहे.
मात्र जिवीतहानी आणि अपघात होऊ नयेत म्हणून. सुरक्षिततेसाठी केवळ प्रमाणित मांजा (QR कोड) वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. काय असेल ते असेल पण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने वसंत महोत्सवावर घातलेली बंदी उठवून. संस्कृती सब की एक चिरंतन खून रगों में हिंदू है… याची प्रचिती दिली आहे.
थोडक्यात सांगायचे तर तुम्ही तुमचा उपासना पंथ बदलू शकता पण तुमचे DNA, पूर्वज आणि संस्कृती मात्र तुम्हाला बदलता येणार नाहीत.
– पराग नेरूरकर