Thursday, November 21, 2024

लोकसभा २०२४ आणि नंतर… : महाराष्ट्र निवडणुक – भाग १

Share

२०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात अनपेक्षित निकाल लागले. उत्तर प्रदेश , प.बंगाल ,राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या चार राज्यात असे अनपेक्षित निकाल प्रामुख्याने लागले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या राजकीय  वाटचाली चा आलेख किंचितसा खाली आला. 

अर्थात निवडणुकी पूर्वी  काही विमर्श निर्माण केले गेले होतेच. जसे की संविधान बदलणार आणि आरक्षण रद्द करणार हे दोन प्रामुख्याने त्यात होते. त्या नंतरही जणू काही नरेंद्र मोदी यांचा , राष्ट्रवादी विचाराचा , हिंदुत्वाचा खूप मोठा पराभव झाला असा विमर्श प्रस्थापित करण्यात काही मंडळी यशस्वी झाले .ज्यातून काही प्रमाणात समाजात आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यात नैराश्य पसरले. त्यामुळे ओरिसा मध्ये झालेले सत्तांतर , तेथील लोकसभेचे एकतर्फी भाजप बाजूने लागलेले निकाल आणि आंध्र प्रदेश विधानसभा लोकसभा निकाल दुर्लक्षित झाले.

ह्या पार्श्व भूमीवर पुढे होणारे जम्मू काश्मीर ,महाराष्ट्र , झारखंड आणि हरियाणा विधानसभा निकाल महत्वाचे होते. त्यातील हरियाणा , जम्मू ,काश्मीर राज्यातील निवडणुका झाल्या आणि तसे दोन्ही कडे अनपेक्षित निकाल लागले. 

हरियाणात हिंदू समाजाने लोकसभेत झालेली चूक दुरुस्त केली आणि लोकशाहीतील एकात्म हिंदू मतदानाची शक्ती दाखवून दिली आणि परिणामी तेथे पुन्हा भाजप सत्तेवर आली. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली खलिस्तानी , डाव्या आणि योगेंद्र यादव नामक मर्कट शास्त्राच्या तर्कट आंदोलनाला रोखण्या साठी हरियाणा राज्याने आपली योग्य भूमिका बजावली आणि देशहिताच्या दृष्टीने निकालाची परिणीती झाली.

जम्मू काश्मीर राज्यातील निवडणुकीत काश्मीर मध्ये ३७० कलम रद्द झाल्यावर तेथे झालेल्या व्यवसायिक स्थिरते मुळे आणि शांतता प्रस्थापित झाल्यामुळे मुस्लिम समाज काही प्रमाणात भाजप बरोबर येईल असे वाटत होते पण मुस्लिम समाजाने कुठल्याही भावना आणि व्यवहार यापेक्षा धार्मिक आवाहनालाच प्रतिसाद दिला.

 त्यानंतर नुकत्याच चालू असलेल्या तेथील अधिवेशनात राष्ट्रीय विचाराची जी गळचेपी चालू आहे आणि त्यातील काँग्रेस नावाच्या पक्षाची नव्हे एका विशिष्ट विचारसरणीची जी भूमिका आहे ती देशाच्या भविष्याचा विचार करताना खूप चिंताजनक आहे. ३७० कलम पुन्हा प्रस्थापित करण्याचा घटनाद्रोही निर्णय , भाजप खासदारांना थेट शारीरिक हल्ला करत त्यांची केली जाणारी मुस्कटदाबी आणि मुख्य म्हणजे अतिरेक्यांनी पुन्हा वर काढलेली मान हे सारेच चिंताजनक आहे 

ह्या देशांतर्गत घडामोडी व्यतिरिक्त काही महत्वपूर्ण घटनाक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत आहेत . बांगला देशात हिंदूंनी संघटित शक्ती दाखवल्यानंतर सरकार पुरस्कृत कट्टर पांथियांची हिंदूंवर होणारे अत्याचार, कॅनडातील तेथील सरकारने पुरस्कृत केलेल्या खलिस्तानी संघटनेने केलेले हिंदू मंदिरावरील हल्ले आणि अमेरिकेत सर्व जगभरातील डावे आणि जॉर्ज सोरस प्रणित गँग यांच्या नाकावर टिच्चून ट्रम्प यांचा झालेला विजय ! हा तो घटनाक्रम आहे.

 याची नोंद महाराष्ट्रातील निवडणुकीला सामोरे जाताना हिंदू समाजाने विचारात घेण्याची आत्यंतिक गरज आहे. मी येथे जाणीवपूर्वक हिंदू समाज हा शब्द प्रयोग वापरत आहे . कारण लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेतील मतदानाचे आमच्या अस्तित्वाशी नेमके काय नाते आहे ? हे न समजल्याने २०१४ पर्यंत ह्या सगळ्या प्रक्रियेकडे गंभीर पणे हिंदू समाजाने बघितलेच नाही त्यामुळे बहुसंख्यांक ८०/८५  टक्के असणारा हिंदू समाज आपल्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित करणारे सरकार सत्तेवर आणू शकला नाही.

याचे खूप दीर्घकालीन परिणाम देशाच्या सामाजिक , आर्थिक जीवनात तर घडलेच पण आंतरराष्ट्रीय राजकारणात हिंदू समाजाचे ज्यांनी प्रतीनीधित्व करून आपल्या देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा मजबूत करणे अपेक्षित होते ते बिलकुल झाले नाही.  परिणामस्वरूप २०१४ साली मोदीजी सत्तेवर येई पर्यंत एकूण ६७ वर्षात ( अपवाद काहीं प्रमाणात अटलजी सरकार )हिंदू हित , देशहित , राष्ट्रहित ह्या पेक्षा देशाच्या ध्येय धोरणात काँग्रेस नावाच्या पक्ष नव्हे एका विचारसरणीच्या (Thought Process) हिताचाच विचार केला गेला असे आपल्याला लक्षात येते.

भारतीय किंवा हिंदू समाजाच्या मानगुटीवर बसलेली ही काँग्रेस नावाची Thought Process नीट समजावून घेतली तरच ह्या आपण स्वीकारलेल्या लोकशाहीतील पुढील वाटचालीत समाज म्हणून आपण योग्य प्रकारे निर्णय करू शकू आणि त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटवू शकू. ह्या दृष्टीने महाराष्ट्रातील येणारी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 

ह्या सगळ्या प्रक्रियेत एक व्यक्तिगत जबाबदारी जशी आहे तशी आपली संस्था म्हणून पण काही जबाबदारी महत्वाची ठरते . संस्था म्हंटल्यावर केवळ सामाजिक नाही तर आर्थिक , व्यवसायिक , औद्योगिक , पारिवारिक अशा सर्वांनी व्यक्तिगत आणि सामूहिक जबाबदारी ओळखून विचार केला तर महाराष्ट्राची निवडणूक देशाला दिशा देवून जाईल. 

रवींद्र मुळे, अहिल्या नगर.

भ्रमणध्वनी : ९४२२२२१५७०.

अन्य लेख

संबंधित लेख