Tuesday, December 3, 2024

मणिशंकर अय्यर यांना पुन्हा पाक प्रेमाचा पान्हा

Share

मणिशंकर अय्यर हे काॅंग्रेसच्या हिंदूद्रोही मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात. अय्यर यांना पुन्हा एकदा पाक आणि मुस्लिम प्रेमाचा पान्हा फुटला आहे. अय्यर हे अडगळीत पडलेले नेते असले तरी काॅंग्रेस पक्ष कसा विचार करतो, याचे ते निदर्शक आहेत. भारतीय सैनिक आणि निष्पाप नागरिक यांची कोणतीही तमा काॅंग्रेसला नाही. काॅंग्रेसच्या पाक विषयक धोरणामुळे देशाला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. या धोरणाची मुळे पुन्हा एकदा मुस्लिम अनुयय, स्वप्रतिमा आणि तथाकथित दडपणांमधे आहेत. `राष्ट्रीय हितसंबंध’ हे परराष्ट्र धोरणाचे मूलभूत सूत्र राहिले आहे. काँग्रेसने राष्ट्रीय हितसंबंधात वर्षानुवर्षे तडजोड केली. त्यांची किंमत अवघा देश मोजत आहे.

काॅंग्रेसचे हिंदूद्रोही नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा फुत्कार सोडला आहे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि भारताने पाकचा सन्मान करून बातचीत चालू ठेवावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. अय्यर यांचे मत हे केवळ बालिशच नव्हे तर मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे.

मणिशंकर अय्यर यांचा इतिहास बघितला तर ते पाकचे नागरिक आहेत का भारताचे, हा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. अय्यर यांचे पाक प्रेम पाहून पाकिस्तानात सुद्धा शरमेने मान खाली घालीत असेल. अय्यर यांचे पाक प्रेम ‘विकृत’ या प्रकारात मोडणारे आहे.

अय्यर यांनी पाकची भलामण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख अप्रत्यक्षपणे ‘mad’ असा केला आहे. मोदी यांच्याविषयीचा त्यांचा द्वेष फार फार जुना आहे. २०१४ साली याच अय्यर यांनी मोदींचा उल्लेख `चायवाला’ असा केला होता. त्याची फार मोठीं किंमत काॅंग्रेसला मोजावी लागली होती. काॅंग्रेसला त्याच्या नेत्याच्या उद्दामपणाची जबरदस्त शिक्षा मतदारांनी दिली. परंतु काॅंग्रेस पक्ष अय्यर यांची खुशामत करीतच राहीला. काॅंग्रेस पक्ष जणू काही अय्यर यांच्यापुढे गुलामासारखी नांगी टाकून उभा राहतो. अय्यर यांच्याविषयीचा विशेष प्रेमाचा काॅंग्रेसने देशाला खुलासा केला पाहिजे. अय्यर बराच काळ पाकिस्तानमधे निवास करीत असतात. पाक वृत्तपत्रे आणि चॅनेल यांचे ते भलतेच लाडके आहेत. कारण भारतविरोधी गरळ ओकण्यासाठी त्यांना एक माणूस विनासायास उपलब्ध असतो. परंतु अय्यर वारंवार पाकमधे करतात काय, यांचे संशोधन आवश्यक आहे. त्यांचा खर्च आणि देखभाल कोण करते, याचाही खुलासा जनतेसमोर होणे गरजेचे आहे.

अय्यर यांचा हिंदुद्वेष खूप जुना आहे. २००४ मधे केंद्रीय मंत्री असताना ते अंदमान येथे गेले होते. तेथे त्यांनी सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. अय्यर यांचा उद्दामपणा एवढा वाढला होता की त्यांनी सावरकरांची तुलना थेट जिना यांच्याबरोबर केली होती. याही पुढे जाऊन त्यांनी सावरकर स्मारकावरील सावरकरांच्या नावाचा फलकसुद्धा काढला होता. सावरकरांसारख्या प्रखर राष्ट्रभक्ताबाबतचे वर्तन बघून देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. मणिशंकर अय्यर यांच्या कृती आणि वाणीमुळे कॉंग्रेस हिंदुद्रोही असल्याच्या वास्तवावर पुन्हा एकदा शिकामोर्तब झाले होते.

मात्र, अय्यर बेलगाम बोलतच राहिले. विशेषतः त्यांचे मुस्लिम प्रेम कायम उफाळून येत असते. हिदूद्वेशाचा उगम त्यांच्या मुस्लिम आणि पाक प्रेमातच दिसून येतो. अय्यर हे एके काळी राजनैतिक अधिकारी होते. Colonial Mind Set चे अत्यंत चपखल उदाहरण आहेत. भारताचा द्वेष करणे हाच त्यांचा नैसर्गिक गुणधर्म आहे. याच भावनेपोटी त्यांनी नरेंद्र मोदी यांचा एकदा ‘नीच’ असा उल्लेख केला होता. काॅंग्रेस ने त्यांच्यावर केलेली कारवाई नाममात्र होती. प्रत्यक्षात ते काॅंग्रेसचे नेते म्हणून वावरत राहिले.

अय्यर यांची कन्या सुनयना यांनीही वडिलांप्रमाणे हिंदुद्रोहाची परंपरा चालू ठेवली आहे. अयोध्या प्राणप्रतिष्ठा समारंभापूर्वी त्यांनी तीन दिवस उपोषण केले होते. उपोषणाचे कारण लक्षात ठेवण्यासारखे आहे. या बाईने मुस्लिम समाजाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण केले होते. पराकोटीचा हिंदूद्वेष अय्यर खानदानात किती ठासून भरला आहे, याचे हे उदाहरण आहे.

वास्तविक, मणिशंकर अय्यर यांची मते किती गंभीरपणे घ्यावी याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अय्यर यांच्यासारख्या नेत्याला इंग्रजीमध्ये `out of sync’ असा एक उत्तम शब्द आहे. पाककडे अणुबॉम्ब असल्याची माहिती अय्यर नव्याने देत आहेत का? ते एक जगाला माहीत असलेले सत्य आहे. कदाचित, अय्यर भारताला घाबरवू इच्छित असावेत. परंतु राजनैतिक अधिकारी राहिलेल्या अय्यर यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचे प्राथमिक ज्ञानसुद्धा नाही. पाकसमवेत चर्चा करण्याचा आग्रह अय्यर कशाच्या आधारावर करतात? १९४७ नंतर भारताने मुस्लिम लांगूलचालनापोटी, स्वप्रतिमेच्या प्रेमापोटी, अंतर्गत आणि बाह्य दडपणापोटी, पाक बरोबर बोटचेपी भूमिका घेतली होती. दस्तुरखुद्द कॉंग्रेस पक्ष म्हणत आला आहे की पाकने भारताबरोबर proxy war सुरू ठेवले आहे. तरी पण काॅंग्रेसने पाक बरोबर वाटाघाटी चालू ठेवल्या. परिणामी भारताला दोन युद्धे आणि असंख्य अतिरेकी हल्ले सहन करावे लागले. काॅंग्रेस याची जबाबदारी घेणार आहे का? सैनिक आणि निष्पाप नागरिक यांच्या मरणाला काॅंग्रेसच जबाबदार आहे. याशिवाय देशाची फार मोठी ऊर्जा आणि साधनसंपत्ती खर्च झाली. काॅंग्रेस ने याचा हिशेब द्यायला पाहिजे. या उलट मोदी सरकारने zero tolerance चे धोरण स्वीकारल्यानंतर पाक सुतासारखा सरळ झाला आहे. हे वास्तव जसे काॅंग्रेसच्या धोरणाचेच अपयश आहे तसेच मोदी सरकारच्या धोरणाचे यश आहे. पाकला ज्या भाषेत समजते त्याच भाषेत सांगायला मोदी सरकारने कोणतीही हयगय ठेवली नाही. परिणाम देशलाच नव्हे तर साऱ्या जगाला दिसत आहेत.

अय्यर यांनी किमान पाकमधील अंतर्गत परिस्थितीचा तरी विचार करायला पाहिजे. पाकची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमाडून गेली आहे. लोकांना जीवनावश्यक वस्तु मिळत नाही. राजकीय अस्थिरतेमुळे पाकमध्ये निर्नायकी माजली आहे. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधे बंडाळी चालू आहे. अशा वातावरणात पाक अणुबॉम्बचा वापर करणे पूर्णपणे अशक्य आहे. पाकने तसे धाडस केलेच तर त्याची फार मोठी किंमत त्याला मोजावी लागेल.

२०१४ नंतर भारत बदलला आहे, याची जाणीव पाकला आहे परंतु अय्यर यांना नाही. मोदी सरकार पाकच्या अणुबॉम्बच्या धमकीला घाबरेल, हा अय्यर यांचा एक भ्रम आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, अय्यर कोणाच्या आदेशावरून असे मत व्यक्त करीत आहेत? त्यांचा बोलविता धनी कोण आहे?

सावरकरांच्या विष्यावरून अय्यर यांच्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली भूमिका आता स्पष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचे सावरकर प्रेम निवडणूक आणि सत्तेच्या मोहापोटी वाहून गेल्याचे मानावे लागेल.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख