Thursday, October 10, 2024

मराठा उत्कर्षाचे शिल्पकार अण्णासाहेब पाटील

Share

आर्थिक मागासवर्गीय, दुर्बल घटकातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांना न्याय मिळवुन देण्यासाठी तसेच त्यांच्या विकासासाठी आयुष्यभर झुंजार लढा देणारे अण्णासाहेब पाटील.

अण्णासाहेब पांडुरंग पाटील यांनी मुंबई मधील विखुरलेल्या कामगारांना हक्काची जाणीव करुन दिली आणि कामगारांचा लढा उभा केला. म्हणून अण्णासाहेब पाटील यांना महाराष्ट्रात मराठा व माथाडी कामगारांच्या उत्कर्षाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. अण्णासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा असलेला व महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस मराठा आहे अशी विशाल व साधी सोपी मराठ्यांची व्याख्या करून माथाडी कामगार संघटना तथा अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापन केली होती. आण्णासाहेब पाटील त्यांच मूळ गावं असलेल्या पाटण तालुक्यातील मंद्रूळकोळे गांवा मधुन मुंबईत आले तेव्हा कामगार म्हणूनच आपल्या जीवन कार्याला सुरुवात केली होती. त्यावेळेस मुंबईतील कामगारांची अवस्था अत्यंत बिकट होती तसेच मुंबई मधील बहुतांश कामगारवर्ग मराठा होता. कामगारांचा आर्थिक आणि सामाजिक उत्कर्ष झाला पाहिजे अशी त्यांची धडपड होती. कामगारांचे प्रश्न व त्यांच्या समस्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी कामगारांना संघटीत करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यशही येत होते. कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी सखोल अभ्यास करून संघटीत प्रयत्न करण्यासाठी माथाडी कामगार संघटना स्थापना केली. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) अशी कष्टकरी कामगारांची मोठी संघटना उभी केली. त्यावेळी कामगार क्षेत्रात केवळ कम्युनिस्ट संघटना होत्या परंतू त्यांनी कम्युनिस्ट विचाराला मूठमाती दिली आणि महाराष्ट्रातील मातीतील सर्वंकश विचार मांडून कामगार संघटना स्थापना केली होती. कामगार हितासाठी मोर्चे, आंदोलन करण्यात आली. तत्कालीन राज्य सरकारकडे त्यांनी कामगारांच्या मागण्या मांडल्या. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने या मागण्यांचा सरकार दरबारी सकारात्मक विचार होऊ लागला होता. सोबतच आण्णासाहेब पाटील यांचे नेतृत्व उदयास येऊन ते कामगारांचे आराध्या दैवत ठरले आहे.

कम्युनिस्ट नव्हे तर माती मधील विचार मान्य
अण्णासाहेब पाटील यांनी जेव्हा माथाडी कामगार संघटना उभी केली तेव्हा कामगारांच्या अनेक समस्या होत्या श्रममुल्य,पुरेस वेतनाचा अभाव,आरोग्य सुविधा आणि हक्क अशा समस्या होत्या कामगारांची प्रचंड शोषण व पिळवणूक होत होते तसेच महाराष्ट्रात कम्युनिस्टाच्या लाल बावटा युनियनचा बोलबाला होता परंतू अण्णासाहेब पाटील यांनी कम्युनिस्टाच्या लाल बावटा युनियन ची मदत न घेता प्रचंड मेहनत घेऊन या माती सोबत इमान राखणाऱ्या मराठी माणसांची कामगार संघटना उभी केली होती त्यासाठी त्यांनी कामगारांच्या समस्या आणि हक्क याचा अभ्यास करून कामगारांच्या न्याय हक्का साठी लढा उभारला माथाडी कामगार संघटनेची मुहूर्तमेढ रोवली सरकार दरबारी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडून त्यांच्या हक्का साठी जीवाचे रान केले आण्णासाहेब पाटील यांचा जन रेटा इतका प्रभावी होता की तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण करून माथाडी संघटनेला शासकीय दर्जा प्राप्त करून दिला होता दि ५जुन१९६९ रोजी महाराष्ट्रामध्ये माथाडी कामगार कायदा अस्तित्वात आला त्यामुळे माथाडी कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण येऊ लागले माथाडी कामगार कायदामुळे नवी मुंबई मध्ये माथाडी हॉस्पिटल, माथाडी ग्राहक सोसायटी,सिडको मार्फत घरे,उच्च शिक्षण,वैद्यकीय सेवा,पतपेढी अशा विविध सुविधामुळे कामगार व त्यांच्या परिवारांचे जीवनमान उंचावले गेले आहे माथाडी कामगारांच्या कल्याण मध्ये अण्णासाहेब पाटील यांचे योगदान महत्वाचे होते.

मराठा आरक्षण मोर्चाचे जनक अण्णासाहेब
आज महाराष्ट्रात मराठा आरक्षण विषय मोठ्या प्रमाणात सुरू आहे काही ठिकाणी मनोज जरांगे सारखे नेते आरक्षणाच्या नावा खाली अवास्तव मागण्या करून समाजात जातीभेद निर्माण करीत सामाजिक वीण विस्कळीत करण्याचा प्रयत्न सुध्दा करीत आहेत परंतू मराठा आरक्षणाचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी करतांना अवास्तव मागण्या किंवा सामाजिक वीण विस्कळीत होऊ दिली नव्हती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात आदरास प्राप्त आहेत तसेच त्यांनी बहुतांश मराठा कामगार असलेल्या माथाडी कामगारांच्या कल्याणसाठी प्रचंड कष्ट घेतले होते त्यांची प्रतिमा उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली होती तसेच त्यांनी बारा बलुतेदार व अठरा पगड जातींना एकत्र करून मराठ्यांचे संघटन उभे राहावे म्हणून त्यांनी अनेक संस्था संघटना,मंडळ यांना एकत्र आणल्या आणि अ.भा.मराठा महासंघाची स्थापना केली होती अण्णासाहेब यांचे नेतृत्व लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने त्यांना दि ८ जुलै १९८० रोजी विधान परिषदेचे सदस्य केले होते त्यावेळेस मराठा समाजाला आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळावे ही मागणी जोर धरू लागली तेव्हा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करू मराठा आरक्षण,आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे म्हणून विधान सभेवर मोर्चा काढण्याचा निश्चय केला कांग्रेस सरकार मध्ये आमदार असताना आण्णासाहेब पाटील व ऍड.शशिकांत पवार यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथून शिवरायांचा भगवा हातामध्ये घेऊन दि २२ मार्च १९८२ रोजी मोर्चा विधान सभेवर धडकला विराट मोर्चाचा जनसमुदाय मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होता अण्णासाहेब पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांना नऊ मागण्याचे निवेदन सादर केले आरक्षण मागणीचा विचार होणार नाही हे लक्षात येताच मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास आपण उद्याचा सूर्योदय पाहणार नाही असे ठणकावून सांगितले आपल्या प्रतिज्ञा नुसार त्यांनी दि.२३ मार्च १९८२ रोजी जीवन यात्रा संपवून या जगाचा कायमचा निरोप घेतला होता.

मराठा उत्कर्षाचे शिल्पकार
अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या उत्कर्ष साठी प्रचंड मेहनत घेतली होती त्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडून कामगारांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण केले होते तसेच मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे म्हणून त्यांच्या समस्यावर सरकार तथा सामान्य माणसाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला, मोर्चा सुद्धा काढला होता अण्णासाहेब पाटील यांच्या जीवन कार्याचा विचार केल्यास किंवा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजा साठी संघर्ष करण्यात खर्ची झालेल असून खऱ्या अर्थाने ते मराठा आरक्षणाचे जनक तथा मराठ्यांच्या उत्कर्षाचे शिल्पकार ठरतात आज अण्णासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन.

निरंजन डावखरे
मुंबई
(विधान परिषद सदस्य महाराष्ट्र)

अन्य लेख

संबंधित लेख