Wednesday, November 13, 2024

भाषा माझी साजिरी….मराठी असे

Share

शास्त्र, तत्वज्ञान, कला, विद्या, शौर्य, चातुर्य अशा विविध गुणांनी संपन्न अशा या महान राज्याला ‘महाराष्ट्र’ असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीच्या शिखरांनी वेढलेला हा महाराष्ट्र नदी, सरोवरे, लेणी, दुर्ग अशा विविधतेने नटलेला असा हा सुंदर महाराष्ट्र. यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत आणि पुण्यवंत अशा जाणत्या राजांचा हा महाराष्ट्र. अशा या महाराष्ट्राची प्रतिष्ठा अखंड भारतभर निनादली,. महाराष्ट्राची मायबोली मराठी प्रतिभावंतांच्या लेखणीमधून ओसंडत वाहत होती. विद्येची देवता सरस्वती चारही हाताची ओंजळ करून ज्ञान ओतीत होती. अशी ही आपली मराठी ज्ञानेश्वरांच्या काळात अमृतात न्हाली. “माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविण” एका प्रतिभासंपन्न कवीने मराठी वाङमयाला अमृता प्रमाणे गोडवा प्राप्त करून दिला. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की या भाषेला लिहिण्यासाठी देखील दोन लिपी अस्तित्वात आहेत, एक म्हणजे देवनागरी आणि दुसरी मोडी लिपी. महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळख ही येथील मराठी भाषेमुळे आहे. दर बारा मैलावर बदलणारी ही मराठी भाषा वेगवेगळ्या स्वरूपात ऐकायला मिळते. वेगवेगळ्या प्रदेशातील ही बोलीभाषा त्या भागातील भाषिक, संस्कृतिक आणि भौगोलिक वैशिष्टांचा अंश असते.

विविध आक्रमकानी महाराष्ट्रावर राज्य करताना येथील मूळ संस्कृती बदलण्याचा विविध प्रकारे प्रयत्न केला. त्यातील एक भाग म्हणजे भाषा, संस्कृती बदलण्यासाठी भाषा देखील तितकीच महत्त्वाची होती यासाठी वेगवेगळ्या कालखंडात आपल्या भाषेवर वेगवेगळे संस्कार झाले. शासकीय यंत्रणेमध्ये मराठी या भाषेचा वापर वेगवेगळ्या स्तरावर होत असे अशावेळी इस्लामिक आक्रमकानी फारसी शब्दांचा प्रभाव पाडण्यासाठी मोडी लिपी ऐवजीफारसी लिपीचा वापर सुरू केला. महाराष्ट्राच्या तळागाळात पोहोचलेली या मराठी भाषेमध्ये कालांतराने फारसी भाषेचा प्रभाव देखील दिसू लागला.  महाराष्ट्राची संस्कृती टिकावी ती अबाधित राहावी यासाठी अनेक कालखंडामध्ये प्रयत्न करण्यात आले. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू” असे मांडताना संत तुकोबारायांनी मराठी भाषेचे शब्द शस्त्राप्रमाणे देखील वापरले. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर राज्यव्यवहारकोश या ग्रंथाची निर्मिती केली. फारसी शब्दांचा प्रभाव कमी करून संस्कृत प्रचुर मराठी शब्द व्यवहारात सुरू व्हावेत यासाठी १३८० शब्द बदलण्यात आले. धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांच्याकडून या ग्रंथाची रचना करण्यात आली. राज्य व्यवहारातील जुने मराठी भाषेतील शब्द लुप्त होऊन त्यांच्या स्थळी फारसी {यावनी) प्रचलित झाले होते त्याचे निष्कासन होऊन पूर्वीचे मराठी शब्द पुन्हा व्यवहारात यावे अशासाठी हा कोश रचण्याचा हेतू होता असे या राजव्यवहारकोषात दिलेले आहे –

कृते म्लेंच्छोच्छेदे भुवि निरवशेष रविकुला
वतसेनात्यर्थ्य यवनवचनैलुप्त सरणीम

स्वराज्याबरोबर स्वत्वाची जाणीव प्रत्येकात यावी यासाठी शिवरायांनी विविध ग्रंथ रचवून घेतले. मराठी भाषा श्द्धीकारणाचा जो क्रांतिकारी द्रष्टा विचार कार्यरत झाला होता तीच परंपरा शिवभक्त स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांनी पुढे चालवली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात परकीय उर्दू आणि इंग्रजी शब्द आपल्या ढिलाईमुळे मराठी भाषेत घुसले होते. त्यांना हुडकून काढून हद्दपार करावे व त्यांच्या जागी आपल्या मराठी भाषेतील शब्द योजावे असे ठरवून एक भाषाशुद्धीचा प्रयत्न इतक्या वर्षा नंतर पुन्हा सावरकरां मार्फत केला गेला. महाराष्ट्रावर जशी आक्रमणे झाली त्याच वेळे पासून मराठी भाषेवर फारसी, उर्दू आणि इंग्रजी भाषांचे सुद्धा आक्रमण झाले. भाषा हि संस्कृतीचा आणि राष्ट्राचा एक अमोलिक ठेवा असतो. तो अमोलिक वारसा जपायला हवा. त्याची शुद्धता जपायला हवी. तरच संस्कृती आणि राष्ट्र शास्वत राहील. अशा प्रकारचे प्रगल्भ विचार आणि भाषाशुद्धीची चळवळ लोकांच्या पचनी हळूहळू पडू लागले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारने सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मराठी भाषा संपूर्ण जगभर प्रभावीपणे पोहोचेल यात काही शंका नाही.संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेचा सुगंध संपूर्ण जगात दरवळत राहो.

जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी……कि परिमळ माझी कस्तुरी
तैसी भाषा माझी साजिरी…..मराठी असे

अन्य लेख

संबंधित लेख