Wednesday, May 15, 2024

मास्टर दीनानाथ मंगेशकर – एक अलौकिक स्वर-सूर्य

Share

थोर संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारा हा लेख. आपल्या अलौकिक, स्वतंत्र प्रतिभेने जवळपास २४ वर्षे त्यांनी संगीत रंगभूमी गाजवून सोडली. त्यांच्या पुण्यतिथीदिनी (२४ एप्रिल) त्यांना विनम्र अभिवादन.

मराठी नाटक विशेषतः संगीत नाटक हे मराठी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिले आहे. मराठी नाटकांचा उगम विविध लोककलांमधून झाला. १८४३ साली सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पाठबळावर विष्णुदास भावे यांनी “संगीत सीता स्वयंवर” हे मराठीतील पहिले संगीत नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील मोठ्या ‘दरबार हॉल’मध्ये दि. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. जरी या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली असली, तरी किर्लोस्कर संगीत मंडळी या कंपनीने आपल्या “संगीत शाकुंतल” या नाटकाचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्यात केला तेव्हापासून खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा काळ सुरु झाला. हे नाटक लिहिले होते ते बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी. त्यानंतर १८८३ साली आलेल्या “संगीत सौभद्र” या नाटकाने तर लोकप्रियतेचे शिखर गाठले. अण्णासाहेबांनंतर संगीत नाटकांची परंपरा पुढे वाढवली ती गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी इ. मान्यवरांनी. देवलांची मृच्छकटिक (१८८७), शारदा (१८९९), संशयकल्लोळ (१९१६), खाडिलकरांची स्वयंवर (१९१६), मानापमान (१९११) तर गडकऱ्यांची प्रेमसंन्यास (१९१३), पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) आणि राजसंन्यास (१९२२) अशा एकापेक्षा एक श्रेष्ठ संगीत नाटकांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध झाली. या रंगभूमीवर अनेक गायक-नट गाजत होते तरी नटसम्राट बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी आपल्या स्वतंत्र, अनोख्या गायन प्रतिभेने अनेक वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केले.

संगीत रंगभूमीवर पदार्पण
या पार्श्वभूमीवर १९१४ साली म्हणजे वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी मा. दीनानाथांचे किर्लोस्कर संगीत मंडळींमार्फत संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले आणि त्यांनी आपल्या अलौकिक, स्वतंत्र प्रतिभेने पुढील जवळपास २४ वर्षे म्हणजे १९३८ पर्यंत संगीत रंगभूमी गाजवून सोडली.

मा. दीनानाथ यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० रोजी गोव्यातील मंगेशी या गावी गणेश भट आणि येसूबाई राणे या दाम्पत्याच्या पोटी झाला. अद्वितीय गळा आणि तल्लख बुद्धी हे गुण उपजतच बाल दीनानाथाच्या अंगी होते. पक्की स्वरस्थाने, चढा पण सुरेल, भिंगरीसारखी फिरत असलेला आवाज ही ईश्वराने दिलेली देणगी होती. ते एकपाठी होते. मंगेशीच्या उत्सवात तेथील मंदिरातील प्रांगणात उभारलेल्या रंगमंचावर बाल दीनानाथाने अनेक भूमिका केल्या होत्या. त्यांच्या आईच्या इच्छेखातर दीनानाथांनी आधी सारंगी आणि नंतर तबला वाजवण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण काही काळ घेतले होते. पण अखेरीस गायन हेच त्यांचे क्षेत्र झाले. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे दीनानाथांचे पहिले गानगुरू. त्यानंतर रामकृष्णबुवा वझे, गणपतीबुवा भिलवडीकर, भाटेबुवा आदींकडून त्यांनी गाणं मिळवले. त्या काळात सुमारे पाच हजार दुर्मिळ रागरागिण्यांचा, चिजांचा संग्रह त्यांच्याकडे होता.

दीनानाथांच्या नावामागे “मास्टर” उपाधी
१९१५ मध्ये ‘ताज-ए-वफा’ या उर्दूनाटकात कमलेची पहिली स्वतंत्र भूमिका त्यांनी केली. किर्लोस्कर संगीत मंडळींनी १९१६ साली “संगीत सुंदोपसुंद” हे नाटक रंगभूमीवर आणले त्यात दीनानाथांनी सुविभ्रमाची भूमिका केली होती. या नाटकातील “रमणी मुदित ठाकली” हे दीनानाथांचे पद फार लोकप्रिय झाले. या नाटकाच्या जाहिरातीत ‘संदेश’ कार अच्युतराव कोल्हटकर यांच्या सांगण्यावरून प्रथम दीनानाथांच्या नावामागे “मास्टर” ही उपाधी झळकली. पुढे ते मास्टर दीनानाथ याच नावाने प्रसिद्ध झाले. १९१६ साली आलेल्या “संगीत पुण्यप्रभाव” या नाटकातील मा. दीनानाथांची किंकिणीची भूमिका आणि पदे अतिशय गाजली. याच नाटकातील गायनाने दीनानाथांची वैशिष्ट्यपूर्ण गायकी आकाराला आली जी पुढे दीनानाथी ढंग म्हणून प्रसिद्ध झाली.

१९१८ साली मा. दीनानाथांनी किर्लोस्कर संगीत मंडळी सोडून तात्यासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या बलवंत संगीत मंडळीत प्रवेश केला. त्यांच्यातर्फे आलेले पहिले नाटक होते संगीत शाकुंतल – तारीख २९ मार्च १९१८, आणि शकुंतलेच्या प्रमुख भूमिकेत होते मा. दीनानाथ! पुढील २ वर्षांच्या काळात बलवंतने किर्लोस्कर मंडळीत पूर्वी केलेली नाटके नव्याने सादर केली. “संगीत सौभद्र”, “संगीत मृच्छकटिक”, “संगीत विद्याहरण” या नाटकातील पूर्वीच्या गायक-नटांनी लोकप्रिय केलेल्या पदांना आपल्या खास शैलीत गाऊन मा. दीनानाथांनी “दीनानाथी ढंग” प्राप्त करून दिला.

“संगीतरत्न” पदवी बहाल
२३ जानेवारी १९१९ रोजी राम गणेश गडकरी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी बलवंतसाठी लिहिलेले “संगीत भावबंधन” हे नाटक १८ ऑक्टोबर १९१९ रोजी सादर झाले, त्यात मा. दीनानाथांनी लतिकेची गाजलेली भूमिका केली. तसेच त्यांची “संगीत एकच प्याला” मधील सिंधूची भूमिका आणि पदेही खूप गाजली. “संगीत उग्रमंगल” या नाटकातील मा. दीनानाथांची राणी पद्मावतीदेवीची भूमिका पाहून श्रीमतजगद्गुरू श्री शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी मा. दीनानाथांना “संगीतरत्न” ही पदवी बहाल केली.

निर्भयी वृत्ती, प्रखर राष्ट्रभक्ती
१९२६ मध्ये मा. दीनानाथ हे पंडित रामकृष्णबुवा वझे यांचा विधिपूर्वक गंडाबंध शागीर्द झाले. त्यानंतर १९२७ रोजी “संगीत रणदुंदुभी” नाटकात मा. दीनानाथांनी तेजस्विनीची भूमिका केली, त्यामुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यांची “परवशता पाश दैवे”, “आपदा राज्यपदा भयदा”, “वितरी प्रखर तेजोबल” (ज्यावरून “गगन सदन तेजोमय” हे गाणे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी बांधले) आणि “दिव्य स्वातंत्र्य रवि” ही पदे अजरामर झाली. सिमला येथे तेथील ब्रिटिश गव्हर्नरासाठी आयोजित कार्यक्रमात मा. दीनानाथांनी अतिशय निर्भयपणे परकीय सत्ता ही या देशावरचा कलंक कसा आहे हे विशद करणारे “परवशता पाश दैवे” हे पद मोठ्या तडफदारपणे गायले होते. यातून त्यांची निर्भयी वृत्ती आणि प्रखर राष्ट्रभक्ती दिसून आली.

याच वर्षी म्हणजे १९२७ साली बलवंतने रंगभूमीवर आणलेले “संगीत मानापमान” हा मा. दीनानाथांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू ठरला. यातील धैर्यधराची त्यांनी केलेली भूमिका पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या नाटकातील “शूरा मी वंदिले”, “चंद्रिका ही जणू”, “प्रेम सेवा शरण”, “रवि मी हा चंद्र कसा” या पदांच्या चाली मा. दीनानाथांनी बदलल्या आणि तरीही त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या.

१९३० साली बलवंत संगीत मंडळींचा मुक्काम रत्नागिरी येथे असताना स्वा. सावरकर यांच्याबरोबर झालेल्या भेटीत चिंतामणराव कोल्हटकर आणि मा. दीनानाथांनी केलेल्या विनंतीवरून सावरकरांनी “संगीत संन्यस्त खड्ग” हे नाटक लिहून दिले. त्यातील पदांना मा. दीनानाथांनी लावलेल्या चाली व विशेषतः “शतजन्म शोधिताना”, “सुकतातचि जगी या”, “मर्मबंधातली ठेव ही” ही पदे रसिकांच्या पसंतीस उतरली.

१९३४ साली मा. दीनानाथ व चिंतामणराव कोल्हटकर यांनी “बलवंत पिक्चर्स” ही संस्था सुरु केली. स्वतःजवळचे सर्व पैसे घालून त्यांनी “कृष्णार्जुन युद्ध” हा चित्रपट काढला. पण तो चालला नाही. त्यातील “सुहास्य तुझे” हे मा. दीनानाथांनी संगीत दिलेले व गायलेले गाणे खूप गाजले. यानंतर मा. दीनानाथांनी काही चित्रपटांना संगीत दिले, तेही गाजले. पण १९३४-३७ या चार वर्षात चित्रपटाच्या धंद्यात बलवंत पिक्चर्सना प्रचंड अपयश आले. १९३८ साली मा. दीनानाथांनी “बलवंत संगीत मंडळी” पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातर्फे “संगीत रणदुंदुभी”, “संगीत मानापमान”, “संगीत संन्यस्त खड्ग”, “संगीत भावबंधन” इ. नाटकांचे प्रयोग अनेक ठिकाणी केले, पण चित्रपटांच्या रेट्यापुढे नाटकांना गर्दी झाली नाही. परिणामतः १९४० मध्ये “बलवंत संगीत मंडळी” कायमची बंद करावी लागली. अंतिमतः आजार वाढत जाऊन २४ एप्रिल १९४२ रोजी पुणे येथे मा. दीनानाथांचे दुःखद निधन झाले. अलौकिक संगीत सूर्य मावळला.

मा. दीनानाथांच्या संगीताचा वारसा त्यांच्या पुढच्या पिढीने म्हणजे लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या मंगेशकर कुटुंबीयांनी चित्रपट आणि सुगम संगीताच्या रूपात नुसताच पुढे चालविला नाही तर स्वतःचे असे “मंगेशकरी घराणे” निर्माण केले.

अशा या थोर संगीत कलाकाराला त्यांच्या पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.

धनंजय सप्रे
(लेखक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ असून ते ब्लॉगर आहेत.)

संदर्भ:
१) ब्रीद तुझे जगी दीनानाथ (द्वितीय आवृत्ती) – लेखिका वंदना रवींद्र घांगुर्डे – प्रकाशक अनुबंध प्रकाशन
२) बहुरूपी (चौथी आवृत्ती) – लेखक चिंतामण गणेश कोल्हटकर – प्रकाशक मौज प्रकाशन
३) छायाचित्रे – इंटरनेट वरून साभार

अन्य लेख

संबंधित लेख