Wednesday, May 15, 2024

सामर्थ्य आहे इच्छाशक्तीचे

Share

आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. ही ध्येये साध्य करण्यासाठी काय करायचे, हे सुद्धा त्यांना माहिती असते. पण प्रत्यक्षात येत नाही. प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर असे कदापिही होत नाही, असे मानले जाते. पण ही इच्छाशक्ती किंवा ‘विल पॉवर’ प्राप्त कशी करायची?

दैनंदिन आरोग्य सुधारण्यासाठी, एखादा चांगला उपक्रम करण्याची अनेकांची इच्छा असते. कुणाला लवकर उठायचे असते, कुणाला नियमितपणे व्यायामाला जायचे असते, कुणाला चहा- सिगारेटचे व्यसन सोडायचे असते, तर कुणाला क्रोधावर ताबा मिळवायचा असतो. ही ध्येये साध्य करण्यासाठी काय करायचे, हे सुद्धा त्यांना पक्के माहिती असते. पण काही केल्या ते जमत नाही. कारण इच्छा असते, पण ती दुर्बळ असते. इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर असे कदापिही होत नाही, असे मानले जाते. पण ही इच्छाशक्ती किंवा ‘विल पॉवर’ प्राप्त कशी करायची, हा एक गहन प्रश्नच असतो.

शरीरातले स्नायू सशक्त करायचे असतील, तर त्यासाठी वेटलिफ्टिंग किंवा तत्सम व्यायाम करावे लागतात. पण असा व्यायाम दिवसातला एखादा तासच करायचा असतो. दिवसभर वजने उचलत बसलात, तर नक्कीच शक्तिपात होईल आणि पुढे कित्येक दिवस हलता-चालतासुद्धा येणार नाही. इच्छाशक्तीचे असेच असते. ती सदैव सतत वापरायची नसते. आजच्या दुनियेत प्रत्येक गोष्ट सबुरीनेच घ्यावी लागते. कुठलेही काम असो, वेळेवर आणि हवे तसे होईल असे कधीच होत नाही. अगदी सकाळी कामावर जाताना रस्त्यावरच्या तुडुंब गर्दीचा सामना करत उशीर होतोच आणि कुठलेही काम करायचे म्हटले की त्यात अडथळे येतातच. त्यामुळे या बाबतीत, ‘मला जे वाटते, तसेच प्रत्येक ठिकाणी व्हायला हवे’ हा आग्रह कामाचा नसतो.

सकारात्मक कल्पनाशक्ती – काही मनोवैज्ञानिकांनी एक प्रयोग केला. सुमारे १०० तरुणांना एकत्र आणले. त्यांचे तीन गट करून त्यांना एक सिनेमा दाखवला. त्यावेळी त्यांच्यासमोर चॉकोलेट्सच्या डिशेस ठेवल्या.

पहिल्या गटाला सांगितले की तुम्ही हवी तेवढी चॉकोलेट्स खा.
दुसऱ्या गटाला सांगितले की अजिबात चॉकोलेट खायचे नाही.
तिसऱ्या गटाला सांगितले की खा, पण सिनेमा संपल्यावर, मग हवी तेवढी खा.

प्रयोगाच्या शेवटी लक्षात आले की ज्यांना भरपूर खा म्हणून सांगितले त्यांनी ती खाल्लीच, पण ज्यांना खाऊ नका म्हणून सांगितले होते, त्यांनीही चोरून खाल्ली. तिसऱ्या गटाने मात्र सांगितले, की आधी खावीशी वाटत होती, पण सिनेमा संपल्यावर जेव्हा खा म्हणून सांगितले, तेव्हा ती विशेष करून खाल्ली गेली नाहीत.

आपल्या दैनंदिन जीवनात ज्या सकारात्मक आणि चांगल्या गोष्टी आपल्याला तीव्रतेने कराव्यात असे वाटत असते, त्या त्वरित कार्यान्वित केल्या, तर नक्की होतात. पण पुढे ढकलल्या तर त्या होत नाहीत. म्हणजे तुम्हाला व्यायाम सुरू करायचा असेल, गाणे शिकायचे असेल, तर विचार पुढे ढकलू नका. निर्णयाचा ऊहापोह करण्यात वेळ घालवू नका.

ज्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आहेत, टाळायच्या आहेत, त्या जेव्हा तीव्रतेने कराव्याशा वाटतात, त्याला ‘क्रेव्हिंग’ म्हणतात. असे क्रेव्हिंग आले, की त्या गोष्टी थोड्या वेळाने करू असे स्वतःला ठासून सांगा. मग पाहा, थोडा वेळ गेल्यावर ही तीव्रता नक्की कमी होते. धूम्रपान, क्रोध व्यक्त करणे, मद्यपान करणे याकरिता तो क्षण पुढे ढकलण्यासाठी लागणारी ही वेळ ३ ते ७ मिनिटे असते.

इच्छाशक्ती वाढवण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्सचा वापर करता येतो. मन एकाग्र करून पूर्ण रिलॅक्सेशन झाल्यावर, आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी करावयाच्या आहेत, त्या घटना क्रमवारीने मन:पटलावर आणाव्यात. यासाठी आपल्या कल्पनाशक्तीचा आधार घ्यावा. अशाच पद्धतीने ज्या टाळायच्या गोष्टी आहेत, त्याबाबतदेखील करावे. वरचेवर हे केल्यास त्या नक्की घडतात असा मनोशास्त्रवैज्ञानिकांचा दावा आहे.

काही पथ्ये
इच्छाशक्ती वाढण्यासाठी काही व्यवधानेही पाळावी लागतात. उदाहरणार्थ, मनात नको ती गोष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाल्यास, प्रचंड तणाव निर्माण होतो. या तणावाला सामोरे जाण्यासाठी मन शांत करणारे संगीत, एखादा छंद, घरातल्या लहानग्यांशी खेळणे, पाळीव प्राण्यांना फिरायला नेणे अशा गोष्टींनी हा तणाव सुकर करता येतो.

कुठलीही उद्दिष्टे पार पाडायची असतील तर एकावेळी एकच गोष्ट पूर्ण करावी. म्हणजे सिगारेट सोडेन, कामावर वेळेवर जाईन, क्रोधाचा स्फोट होऊ देणार नाही, अशा असंख्य गोष्टी एकाच वेळी साध्य करण्याऐवजी क्रमाक्रमाने हे एकेक इप्सित पूर्ण करावे.

दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतः काही गोष्टी करणे टाळावे. अशामुळे आपल्या इच्छाशक्तीचा ऱ्हास होतो. तुम्हाला स्वतःला जे करावेसे वाटते, तुम्हाला जे मनापासून आवडते अशीच गोष्ट साध्य करा. ती गोष्ट यशस्वीपणे पार पडल्याचा आनंद तुमच्या अंतर्मनाला व्हायला हवा.

आपल्या जीवनशैलीत बदल आणि आरोग्यात सुधारणा करण्यासाठी स्वयंशिस्तीचा प्लॅन आखावाच लागतो. दुर्बळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्तींना, नकोशा सवयींपासून मुक्तता मिळवण्यासाठी इच्छाशक्तीच्या प्राबल्याची गरज असते, कारण ‘सामर्थ्य आहे इच्छाशक्तीचे, जो जे करील तयाचे….’

डॉ. अविनाश भोंडवे
(लेखक ज्येष्ठ आरोग्य विश्लेषक आणि पुण्यातील फॅमिली डॉक्टर आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेचे ते माजी अध्यक्ष आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख