Tuesday, December 3, 2024

समाज माध्यमांवर फूड शोजची वाढती लोकप्रियता

Share

साधारण १९७० च्या सुमारास तेव्हाच्या प्रसिद्ध पाकतज्ज्ञ कमलाबाई ओगले यांचे ‘रुचिरा’ हे पाककृतींचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यांचे निधन होऊन २५ वर्षे (२० एप्रिल १९९९) होऊन गेली, तरी अजूनही या पुस्तकाला प्रतिसाद मिळत आहे. त्याआधीपासून प्रामुख्याने पुण्या-मुंबईत वेगवेगळ्या मंडळांमार्फत-संस्थांतर्फ पाककृतींच्या स्पर्धा होत. पुढे तर साप्ताहिक सकाळसारखी नियतकालिकेही ‘रिडर कनेक्ट’साठी अशा स्पर्धा घेऊ लागली.

मुळात खाणे हा आपल्या माणसांचा फार जिव्हाळ्याचा विषय आहे. एकत्र जमणे आणि खादाडी करणे, हा आवडीचा उद्योग आहे. नवनवीन पदार्थ करण्याची, खाण्या-खिलवण्याची ही सवय आताच्या काळापर्यंत झिरपत आली आहे. काही प्रमाणात स्वतःपुरत्या मर्यादित असलेल्या या सवयीने आता सार्वत्रिक रूप घेतले आहे. कमलाबाई ओगले, सिंधूताई साठे, उषाताई पुरोहित, संपदाताई कोपर्डेकर, निशा गणपुले लिमये, सुजाता नेरुरकर अशी कितीतरी जुन्या नवीन लेखिकांनी पुस्तके, नियतकालिकातील सदरांत लेखन करून पाककलेविषयीच्या लेखनाला पुढे नेले आहे. आता जमाना त्यापुढे गेला आहे. क्लासेस वगैरे घेणाऱ्या अनेकजणी व त्यात सहभागी झालेल्या असंख्य महिला आता सोशल मीडियावर दिसू लागल्या आहेत. अर्थात केवळ महिलाच नाहीत, पुरुषही असे कार्यक्रम हिरीरीने करू लागले आहेत.

टीव्हीवरील फूड शोची सुरुवात

टीव्हीवर फूड शो करण्याची सुरुवात शेफ संजीव कपूर यांनी केली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. त्यांचे हे हिंदी शो प्रचंड लोकप्रिय झाले. साहजिकच त्याची लाट इतर भाषांतही आली. मराठी टीव्हीवरही असे शोज दिसू लागले. विष्णू मनोहर वगैरेंचे शोज मराठीत दिसू लागले. समाज माध्यमाच्या उदयानंतर हे लोण तिथपर्यंत पोचले. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे शोज झळकू लागले. काही स्वतंत्र काही ग्रुपचे.. यातून अनेक नवनवीन नावे पुढे आली. अर्चना अर्ते, नीलेश लिमये, विकास खन्ना, वरुण इनामदार, शेफ तुषार प्रीती देशमुख, स्मिता देव अशी किती नावे सांगावीत…

समाज माध्यमाचा वेगळा फायदा म्हणजे, प्रसिद्ध पाककृती तज्ज्ञांबरोबरच हौसे-नवशे लोकही आपापल्या पाककृती दाखवू लागले. नानानानी की रसोई, आजीबाईचा बटवा, बबिताज किचन, कोकणमेवा अशा कल्पक नावांना खेड्यापाड्यांतूनही प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. इतका प्रतिसाद असल्यावर थोडे डावे-उजवे होणारच, पण करणाऱ्यांची आणि त्या रेसिपीज बघणाऱ्यांची संख्या बघता त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे. पदार्थ तरी किती असावेत.. वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, काही कोणी स्वतः प्रयोग करून केलेले, काही नेहमीचे अशी विविधता दिसते. त्यातही विदर्भातील पोपट पोहे, मराठवाड्याची सुशिला, खानदेशातले हिरव्या वांग्याचे भरीत अशा प्रादेशिक अस्मिताही इथे जागृत होताना दिसतात.

समाज माध्यमावर मराठीत सध्या मधुरा बाचल यांचे वर्चस्व दिसते. लक्षावधींच्या संख्येत त्यांचे फॉलोअर्स आहेत. ते बघून झी टीव्ही वगैरेही त्यांना प्रमोशनसाठी बोलावतात. त्यांनी आपल्या कार्यक्रमाची खूप छान, नेटकी मांडणी केली आहे. नवीन पदार्थांबरोबरच पारंपरिक पदार्थही त्या करून दाखवतात. शिवाय वाचक/प्रेक्षकांनाही त्यांच्या पाककृतीसह सहभागी करून घेतात. बोलण्याची शैलीही छान आहे. हिंदीत असेच स्थान बबिता यांनी मिळवले आहेत. अर्थात त्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत. त्यांचा कार्यक्रम खूप बघितला जातो. त्यांच्या बोलण्याची अनेकजण कॉपी करतात, इतका त्यांचा प्रभाव आहे.

खाण्याशी संबंधित एक कार्यक्रम अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाला आहे. कामिया जानी या फूड व्लॉगरचा ‘कर्ली टेल्स.’ घाटकोपरमधील या मुलीने आपला हा व्लॉग सुरू केला. त्यात ती मुंबईतील ठिकठिकाणच्या खाऊगल्ल्या दाखवायची. बरोबर एखादा सेलिब्रिटी असायचा/ची. त्यांच्याबरोबर गप्पा, खाणे.. असे कार्यक्रमाचे साधारण स्वरूप आहे. हळूहळू या सेलिब्रिटींचा दर्जा वाढत गेला, इतका की ते थेट राहुल गांधी, स्मृती इराणी, सचिन तेंडुलकर, विराट कोहली वगैरेंनाच आपल्या शोसाठी तिने गाठले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच काही इन्फ्लूएन्सर्सचा गौरव केला, त्यात ही कुरळ्या केसांची कामिया जानीही होती.

सध्या समाज माध्यमांवर सर्विधिक लोकप्रिय फूडविषयक शोजच असतीत. ते पदार्थ पाहून कितीजण ते करतात याची कल्पना नाही, पण त्यांना मागणी खूप आहे हे निर्विवाद !

अन्य लेख

संबंधित लेख