Friday, September 13, 2024

भारतातील पहिल्या महिला एव्हरेस्ट वीर बचेंद्री पाल यांचा चाळीस वर्षांपूर्वीचा प्रेरणादायी पराक्रम

Share

तब्बल ४० वर्षांपूर्वी बचेंद्री पाल यांनी २३ मे या दिवशी आपले पाऊल माउंट एव्हरेस्टवर ठेवले. माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेणाऱ्या जगातील पाचव्या आणि भारतातील त्या पहिल्या महिला ठरल्या. भारतातील एव्हरेस्ट मोहिमांच्या त्या प्रमुख प्रेरणास्त्रोत आहेत.

पृथ्वीवरील सर्वांत उंच शिखर म्हणजे माऊंट एव्हरेस्ट. समुद्र सपाटीपासून ८,८४८ फूट उंचीवर असलेले हे शिखर सर करण्यासाठी जगभरातील अनेक गिर्यारोहकांनी प्राणांची बाजी लावली. अतिशय लहरी वातावरण, सोसाट्याचा वारा, अत्यल्प प्राणवायू आणि हिमस्खलनाची सततची टांगती तलवार अशा अत्यंत प्रतिकूल वातावरणात दुर्गम हिमशिखरावर चढाई करण्याचा प्रयत्न जगभरातील असंख्य धाडसी गिर्यारोहकांनी आतापर्यंत केला आहे. त्यात भारतीय गिर्यारोहकांचेही स्थान आढळ आहे.

माउंट एव्हरेस्ट शिखरावर भारतीयांनी केलेल्या मोहिमांमध्ये २३ मे हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. वेगवेगळ्या वर्षांमधील या एकाच दिवशी गिर्यारोहांना सागरमाथ्यावर तिरंगा फडकवण्यात यश आले. सागरमाथा अर्थात सागर म्हणजे महासागर आणि माथा म्हणजे शिखर. अशा एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला एव्हरेस्टवीर बचेंद्री पाल यांचा समावेश होतो. या उत्तुंग पर्वतावर २३ एप्रिल १९८४ रोजी भारतीय महिलेचे पहिले पाऊल पडले. भारतीय प्रशासकीय सेवेतील रवींद्र कुमार यांनी २३ मे २०१९ रोजी जगातील सर्वांत उंच शिखरावरील मोहीम यशस्वी केली. आशिष सिंग या अभियंत्या गिर्यारोहकाने मध्य प्रदेशातील एका छोट्याशा खेडेगावातून सुरू केलेला प्रवास थेट माउंट एव्हरेस्टवर थांबविला. त्यामुळे २३ मे हा भारतीय गिर्यारोहकांसाठी प्रेरणा दिन ठरतो.

तब्बल ४० वर्षांपूर्वी बचेंद्री पाल यांनी आपले पाऊल ठेवले. माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेणाऱ्या जगातील पाचव्या आणि भारतातील त्या पहिल्या महिला ठरल्या. त्या भारतातील एव्हरेस्ट मोहिमांच्या प्रमुख प्रेरणास्त्रोत ठरल्या आहेत. आपल्या भोवती असलेली चौकट मोडून नवीन मार्ग तयार करणाऱ्यांसाठी पाल या दीपस्तंभ आहेत. देशात १९८० च्या दशकात घर, कुटुंब, संसार, पूर्वापारपासूनची कामे हेच महिलांचे आयुष्य होते. पाल यात अडकल्या नाहीत. ती चौकट त्यांनी मोडली. त्या सुरुवातीला शिक्षिका म्हणून काम करत होत्या. पण, उत्तराखंडातील पर्वतरांगांमध्ये बालपण गेलेल्या पाल यांना हिमशिखरे खुणावत होती. त्यामुळेच त्यांनी गिर्यारोहण यासारख्या धाडसी क्षेत्रात पदार्पण केले आणि पाल यांनी गिर्यारोहणाची सुरुवात केली. गिर्यारोहण हा जसा धाडसी क्रीडा प्रकार आहे. तसेच, ती कला आहे, यावर पाल यांचा दृढ विश्वास होता.

देशात ८०च्या दशकात बदलाचे वारे वहायला सुरुवात झाली होती. पुरुषांच्या बरोबरीने महिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येत होत्या. त्याच काळात माउंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी महिलांची एक तुकडी पाठविण्याचा निर्णय ‘इंडियन माउटेंनिरिंग इन्स्टिट्यूट’ने घेतला. या मोहिमेसाठी निवड प्रक्रिया सुरू झाली. त्यातून पाल यांची निवड या मोहिमेसाठी झाली. जिद्द, चिकाटी, धैर्य, धाडस आणि आत्मविश्वास या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि पावलो-पावली उभ्या असलेल्या प्राणघातक संकटांशी यशस्वी मुकाबला करून पाल यांनी २३ मे १९८४ रोजी माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकविला.

पाल यांच्या सुरुवातीच्या प्रवासात त्यांच्याबरोबर पुण्यातील नामवंत गिर्यारोहक उषःप्रभा पागे होत्या. पाल यांच्या आठवणींना त्यांनी या निमित्ताने उजाळा दिला. त्या म्हणाल्या, “आम्ही १९८२ मध्ये झालेल्या एव्हरेस्ट मोहिमेच्या निवड शिबिरात एकत्र होतो. त्यासाठी सहा हजार ६७२ फूट उंचीवरील ‘गंगोत्री १’ सारख्या हिमशिखरांवर चढाई करण्यासाठी एकत्र होतो. त्यावेळी बचेंद्री या २६ ते २८ वर्षे वयाच्या चपळ तरुणी होत्या. गिर्यारोहणासाठी येताना त्या लसूण आण तांबड्या तिखटाचा गोळा आणत. त्या डोंगराळ भागातून येत असल्याने त्यामागे तेथील काही ठोकताळे होते. त्या निवडीत बचेंद्री यांची निवड झाली.”

पाल यांचे पुण्याशीही अतूट नाते होते. एव्हरेस्टवर १९८४ नंतर झालेल्या मोहिमेत पुण्यातील भरत मांजरे, नंदू पागे, डॉ. नीमू मेहता होते. त्यापैकी डॉ. मेहता आणि पाल यांची चांगली मैत्री झाली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

एव्हरेस्ट मोहिमेनंतर पाल यांनी देशातील मुलींना गिर्यारोहणाचे धडे दिले. त्यामुळे देशातील महिलांना हिमालयातील हिमशिखरांचा मार्ग दाखविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी शेर्पाच्या मुलांना शिक्षण देण्याचे उपक्रमही राबविले. देशातील महिलांना आधुनिक काळात हिमशिखरे खुणावत आहेत. त्यांना हिमशिखरांचा मार्ग दाखवला तो पहिल्या भारतीय एव्हरेस्टवीर महिला बचेंद्री पाल यांनी. त्यानंतर आता हिमालयातील उत्तुंग शिखरे सर करणाऱ्या मोहिमांमध्ये महिलांची संख्या वेगाने वाढली. त्याचा मुख्य प्रेरणास्त्रोत त्या आहेत. त्यांच्या नंतर अनेक महिलांनी धाडसाने एव्हरेस्टच्या मोहिमेत सहभाग घेतला. याचे सर्व श्रेय पाल यांच्याकडेच जाते.

अन्य लेख

संबंधित लेख