Saturday, July 27, 2024

विकसित भारताचे प्रतीक : मुंबईचा ‘कोस्टल रोड’!

Share

मुंबई ‘कोस्टल रोड’ हा मुंबईच्या विकासाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प होय. मुंबईची प्रगती, पर्यावरण रक्षण आणि संवर्धन तसेच आर्थिक-सामाजिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प होणे काळाची गरज होती. काँग्रेसप्रणित आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेला हा प्रकल्प त्यांच्याच सत्ताकाळात खूप रखडला. परंतु भारतीय जनता पक्षप्रणित महायुतीच्या सरकारच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताची दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प गतिमान करण्यात आला. या प्रकल्पाचा पहिला टप्पा जून २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्या विषयी…

मुंबई ‘कोस्टल रोड’ प्रकल्प हा भौतिक व्याप्ती आणि सामाजिक-आर्थिक परिणामांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. मुंबईतील गर्दी, प्रदूषण आणि शहरीकरणाच्या सतत वाढणाऱ्या समस्या-आव्हानांवरील महत्त्वाच्या उपायांपैकी एक उपाय म्हणूनही या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबईची ही जणू एक सळसळती धमनीच ठरणार आहे. हा प्रकल्प मुंबईची सर्वांगीण प्रगती, पर्यावरणाचे संवर्धन आणि सामाजिक गरजांच्या अभिसरणाचे प्रतीक आहे. या भागातील नागरिकांच्या दळणवळणाचे एक अत्यंत उपयोगी-सुलभ साधन ठरणार आहे.

‘धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. हा मुंबईच्या दक्षिण भागातील मरीन लाईन्स ते उत्तरेकडील कांदिवलीला जोडणारा मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीसह अंशतः कार्यान्वित झालेला २९.८० किलोमीटर लांबीचा आठ पदरी द्रुतगती मार्ग (ग्रेड सेपरेटेड एक्सप्रेस हायवे) आहे. हा पूर्ण झाल्यानंतर याचा दैनंदिन वापर सुमारे एक लाख ३० हजार वाहने करतील असा अंदाज आहे.

या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांवरून अवघ्या ४० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत १३ हजार ६० कोटी (१.६ अब्ज डॉलर आहे. त्याच्या पहिला टप्प्याचे उद्घाटन ११ मार्च २०२४ रोजी झाले आहे. ‘प्रिन्सेस स्ट्रीट्री फ्लायओव्हर’पासून ‘वांद्रे-वरळी सी लिंक’च्या टोकापर्यंतच्या १०.५८ किलोमीटरचा हा टप्पा सध्या कार्यान्वित झाला आहे.

बोगदा खणण्याचा जागतिक विक्रम !
दोन टप्प्यांत विभागलेल्या या प्रकल्पात भराव टाकून बांधलेले रस्ते, ‘स्टिल्ट’वरील पूल, उन्नत रस्ते, ‘मलबार हिल’खालील बोगदे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध आंतरबदलांचा समावेश आहे. महानगरपालिका आणि खाजगी कंत्राटदारांच्या सहाय्याने या प्रकल्पामध्ये बोगदे, पूल आणि रस्ते बांधणीच्या विविध अभियांत्रिकी कामांचा समावेश आहे. प्रियदर्शनी पार्क आणि गिरगाव चौपाटीला जोडणारे २.०७ किलोमीटरचे दुहेरी बोगदे ‘सिंगल शील्ड अर्थ प्रेशर बॅलन्स’ (ईपीबी) आणि ‘टनेल बोअरिंग मशिन’ (टीबीएम) वापरून खोदण्यात आले होते. ‘एंट्री/एक्झिट पोर्टल’वरील ‘रॅम्प’ ‘कट-अँड-कव्हर’ पद्धती वापरून बांधले गेले.

बोगद्यासाठी अरबी समुद्राखाली ब्रेसिया, बेसाल्ट खडकाचे कवच खोदणे आवश्यक होते. या बोगद्याचे काम ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्कपासून सुरू झाले आणि गिरगाव चौपाटीच्या टोकाला पहिले यश १० जानेवारी २०२२ रोजी झाले. २६ एप्रिल २०२२ रोजी गिरगाव चौपाटीच्या टोकापासून दुसरा बोगदा खोदण्यास सुरुवात झाली. ३ ऑगस्ट २०२२ रोजी, हे काम करणाऱ्या ‘एल अँड टी’ने जाहीर केले की, ‘ईपीबी’ आणि ‘टीबीएम’द्वारे एका महिन्यात सर्वांत लांब अंतरासाठी बोगदा खणण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५६.७२ मीटर खोदून मागील ४५५.४ मीटरचा जागतिक विक्रम मोडीत काढला. करोना महासाथीचा अडथळा, तांत्रिक बिघाडाच्या आव्हानांना तोंड देत दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे २०२३ रोजी पूर्ण झाले. मुंबई महापालिकेने सांगितले, की, दुहेरी बोगदे खोदताना सात लाख मेट्रिक टन किंवा ३८ हजार ७०० ट्रक भरलेला गाळ काढण्यात आला. यापैकी काही गाळ प्रकल्पाच्या जमीन सुधारणेच्या कामासाठी वापरण्यात आला होता, तर उर्वरित भाग अयोग्य असल्याने त्याची विल्हेवाट लावण्यात आली ३० अभियंत्यांसह १६० जणांच्या चमूने जुळ्या बोगद्यांचे बांधकाम केले.

सोयीची अखंड संपर्कव्यवस्था
या प्रकल्पामुळे वाहतुकीतील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय भर पडणार आहे. ‘मुंबई कोस्टल रोड प्रकल्पा’मुळे केवळ शहरातील रहदारीची स्थिती सुधारेल असे नाही, तर स्थावर मालमत्ता-बांधकाम व्यवसायाच्या बाजारपेठेवरही त्याचा लक्षणीय परिणाम होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काही भागाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले, की ‘कोस्टल रोड’च्या माध्यमातून आम्ही १७५ एकर हिरवीगार जागा तयार करू शकलो आहोत. ही जागा ‘महालक्ष्मी रेसकोर्स’शी जोडून, तीनशे एकरांवर पसरलेले ‘मुंबई सेंट्रल पार्क’ तयार केले जाईल, जेणेकरून सर्व मुंबईकरांना त्याचा फायदा होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, की मुंबईसाठी येत्या काळात वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) तयार केला जाईल जो उपनगरीय मुंबईला ‘आयलंड सिटी’ आणि ‘सॅटेलाइट’ जिल्ह्यांशी जोडेल. या मुंबईच्या सळसळत्या धमन्याच ठरतील. ‘कोस्टल रोड’मुळे मुंबईचे जीवन बदलणार आहे. पुढील टप्प्यात ‘वर्सोवा-विरार मार्गिके’वर (कॉरिडॉर) काम सुरू आहे. यामुळे मुंबईच्या या महत्त्वाच्या भागात अखंड आणि अल्पावधीची सोयीची संपर्कव्यवस्था निर्माण होईल.

या प्रकल्पाच्या वाटचालीतील महत्वाचे टप्पे :
१९६० : हा प्रकल्प ‘विल्बर स्मिथ आणि असोसिएट्स’ यांनी प्रथम प्रस्तावित केला होता
२०११ : तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम द्रुतगती मार्गाला (वेस्टर्न फ्रीवे) पर्याय म्हणून ‘कोस्टल रोड’चा प्रस्ताव मांडला.
२०१२ : एका संयुक्त तांत्रिक समितीने ३५.६ किलोमीटरचा ‘कोस्टल फ्रीवे’ बांधण्याची शिफारस केली.
२०१३ : महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीटने प्रकल्पासाठी पुनर्वसन परवानगी देण्यासाठी कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) या नियमांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केंद्राला केली.‘नॅशनल कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ने आपल्या अजेंड्यामध्ये योजना समाविष्ट न करण्याचा निर्णय घेतला.
२०१४ : भाजपने निवडून आल्यानंतर प्रकल्प राबविण्याचे आश्वासन जनतेला दिले.
२०१५ : भाजप सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पात बदल करून जलद गतीने काम करण्यात आले. राज्य सरकारने तांत्रिक सहकार्यासाठी डच सरकारसोबत सामंजस्य करार केला. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
२०१६ : बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अहवाल आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली.
२०१७ : या प्रकल्पाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाली.
२०१८ : प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.
२०२३ : मच्छिमारांनी पूर्वीच्या प्रस्तावित रचनेला विरोध केल्यानंतर महापालिकेने ‘वरळी इंटरचेंज’साठी नवीन ‘डिझाइन’ तयार केले. ‘कोस्टल रोड’ला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले.
मार्च २०२४ : पहिल्या टप्प्यात १०.५ किलोमीटर लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

अन्य लेख

संबंधित लेख