मुंबई : भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी तब्बल दोन वर्षे या ना त्या कारणाने वादात सापडलेली मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर (Mumbai University Senate elections) बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. सिनेटची उद्या होणारी निवडणुक अराजकीय व्हाव्यात, अशी भाजपची इच्छा आहे. जे उमेदवार ठाकरे गटाने दिलेत ते विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत का? सगळ्या निवडणुकीची राजकीय बोळवण केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार मालकाचे हित जोपासणारे, त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासलं जात आहे, असं आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक (Mumbai University Senate elections) उद्या होणार आहे. मंगळवारी शासकीय कामकाजाचा दिवस असल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती उमेदवारांनी व्यक्त केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात आहेत. ३ ऑगस्टच्या अधिसूचनेला अनुसरून येत्या २४ सप्टेंबरला सिनेट निवडणूक घ्या आणि २७ सप्टेंबरला मतमोजणी घेऊन निकाल जाहीर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठाला देऊन निवडणूक स्थगित करणाऱ्या विद्यापीठाच्या परिपत्रकाला स्थगिती दिली. आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला