Friday, November 22, 2024

मुरलीधर मोहोळ: कोल्हापूरच्या तालमीतला कुस्तीगीर ते केंद्रीय मंत्री

Share

नवी दिल्ली: पुण्यातून पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काल ९ जून २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात शपथविधी समारंभ झाला, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांना शपथ दिली.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकिटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवलेल्या मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा सुमारे ५० हजर मतांच्या फरकाने पराभव केला. त्यांच्या विजयाने भाजपला महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आणि देशातील प्रमुख औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या पुण्याची जागा सलग तिसऱ्यांदा राखण्यात यश आले.

४९ वर्षांचे असलेले मुरलीधर मोहोळ हे मोदी सरकारमधील तरुण सदस्यांपैकी एक आहेत. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा चेहरा केंद्रीय मंत्रीमंडळात सामील करून भाजपने दूर गेलेल्या मराठा समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. कुस्तीपटू ते पुण्याचे महापौर आणि आता केंद्रीय मंत्री होण्याचा मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास त्यांच्या मेहनती आणि समर्पित स्वभावाचा दाखला आहे.

पुण्याचे महापौर असताना मोहोळ यांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या कामाचे राज्यभरात कौतुक झाले. त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि युवकांमधील लोकप्रिय प्रतिमा आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढवण्याच्या योजनांना हातभार लावेल अशी अपेक्षा आहे.

कोल्हापुरच्या कुस्ती आखाड्यात तालीम केलेले मोहोळ १९९३ च्या सुमारास पुण्याच्या राजकीय आखाड्यात उतरले. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे.

शपथविधी सोहळ्याला मोहोळ यांच्या आईसह कुटुंबीय उपस्थित होते, त्यांनी आपल्या मुलाला मंत्री म्हणून शपथ घेताना पाहून अभिमान आणि आनंद व्यक्त केला. मोहोळ यांचा मोदी सरकारमध्ये समावेश हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या मिनित्तने पुणे शहराला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख