नाशिक : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधुग्राम, गोदावरी नदीवरील घाट आणि डीपी रस्ता आणि त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज दिले. सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत साधुग्राम व पायाभूत सोयी सुविधांची पाहणी व आढावा बैठक त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले की, नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील पायाभूत सोयीसुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आगामी काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन करून आराखडा तयार करावा. गोदावरी, अहिल्या, गौतमी नदीच्या स्वच्छतेबरोबर बारमाही प्रवाहित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे नियोजन करावे.याबरोबर विकास कामांना गती द्यावी. त्र्यंबकेश्वर परिसरातील सर्व नद्या, तलाव यांची स्वच्छता करून सौंदर्यीकरण करावे. तलावांमधील गाळ काढण्यासाठी आराखडा तयार करावा. ठिकठिकाणी वृक्षारोपण करून परिसर हरित करण्यासाठी नगरपरिषदेने कार्यवाही करावी. विकास कामे गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.