Wednesday, December 4, 2024

काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे

Share

महाराष्ट्राच्या राजकारणात काका व त्यांच्या पुतण्यांचेही राजकारण जोरात चालते. बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे, शरद पवार ते अजित पवार तसेच गोपीनाथ मुंडे ते धनंजय मुंडे यांचे राजकीय किस्से अन् सत्तासंघर्ष सर्वश्रुत आहे. सोलापुरातील काही पुतणे मंडळी त्यांच्या काकांच्या बरोबरीने यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे पुतणे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सुभाष सावंत हे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून तसेच माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पुतणे अनिल सावंत हे यंदा पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात त्यांना तुतारी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून तिकीट मिळाले आहे. या ठिकाणी त्यांचा सामना भाजपचे उमेदवार समाधान आवताडे तसेच काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासोबत आहे.

तानाजी सावंत हे एकूण पाच भावंडे असून तानाजी हे सर्वात धाकटे. त्यांचे दुसरे बंधू सुभाष सावंत यांचे चिरंजीव अनिल सावंत. ते भैरवनाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. आरोग्याच्या कारणास्तव यंदा आमदार बबनराव शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. माढा विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. बबनराव शिंदे यांचे बंधू संजयमामा शिंदे हे करमाळ्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. काकांच्या बरोबरीने यंदा रणजितसिंह शिंदे हे देखील माढ्यातून नशीब आजमावत आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे. त्यांचे काका मात्र यापूर्वी आमदार राहिले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख