Wednesday, August 13, 2025

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले

Share

मुंबई: ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडील कृषी खात्याची (Agriculture Department) जबाबदारी काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जे यापूर्वी दत्तात्रय भरणे यांच्याकडे होते.

https://twitter.com/bharanemamaNCP/status/1951104850303090879

शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री (अजित पवार, एकनाथ शिंदे) यांचे आभार मानले. “एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीमंत्री पदाचा मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे दुःख मला कळते

भरणे म्हणाले, “शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.”

शेतकऱ्यांचा सन्मान हेच मुख्य उद्दिष्ट

“शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अन्य लेख

संबंधित लेख