मागील बरेच दिवस कांदा, सोयाबीन, तूर, कापूस, उडीद, यांच्या भाव चढ उताराच्या बातम्या बघताना त्यात एक विशिष्ट पॅटर्न बघायला मिळतो आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करण्याची सबब देत ज्या पद्धतीने बातम्या पेरल्या जात आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचेच जास्त नुकसान झालेले दिसून येत आहे. आणि यासाठी या उथळ पत्रकारितेला कुणीतरी जाब विचारण्याची वेळ आलेली आहे.
आज कांदा या विषयावर बोलू. कांदा मार्केट संपूर्णतः मार्केट सेंटीमेंट वरच चालते. कुठे खट्ट झाले कि भाव पडतात. त्या आगीत वारंवार तेल ओतण्याचे काम काही वृत्तपत्रे आणि माध्यमे करतात, असे दिसून येते.
घटना क्र १. जेव्हा जुलै मध्ये अफगाणिस्तान हुन पाकिस्तान मार्गे कांदा आयातीची मार्ग व्यवहार्यता (Route Feasibility) तपासण्यासाठी ४ कंटेनर म्हणजे जवळपास १०० टन कांदा आयात केला गेला. एवढा कांदा दिल्लीच्या एका कोपऱ्यात दिवसभरात संपतो. तरीही देशभर कांदा आयातीच्या बातम्या फिरवून व्यापारी-वृत्तपत्रे यांच्या अभद्र युतीने भाव पडले. आठवडाभर पडल्या भावाने शेतकऱ्यांनी कांदा विकल्यानंतर ही अफवा हवेत विरली आणि व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे झाले.
घटना क्र. २ कांदा निर्यात बंदी.. जानेवारी ते मार्च दरम्यान देशातील मागणी वाढलेली असल्याने कांदा निर्यात बंदी लावली गेली. वास्तविक देशाच्या एकूण उत्पादनाच्या ३ ते ५ टक्के कांदा निर्यात होतो. मात्र मार्केट सेंटीमेंट्स अशा प्रकारे खेळविल्या जातात की निर्यात बंदीच्या बातमीने भाव गडगडायला सुरुवात होते आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हि माध्यमे आणि वृत्तपत्रे आहेत. तोच प्रकार निर्यात शुल्क आणि न्यूनतम निर्यात मूल्य याबाबत देखील आहे. किमान ४५ रुपये किलोने निर्यात आवश्यक आहे आणि त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क म्हणजे १९ (जो की आयात करणारा व्यापारी देतो ) रुपये असा एकूण निर्यात दर ६५ रुपयांपर्यंत जातो. वाहतूक आणि इतर खर्चासह ७५ रुपये जरी झाले तरी सद्य स्थितीत आखाती आणि पूर्वोत्तर देशातील दर पाहता कमीत कमी याच्या दुप्पट दर तेथील किरकोळ बाजारात आहेत. उदा. दुबईतील दर अंदाजे १७० ते २५० रुपये प्रति किलो. मग हे निर्यात मूल्य देशांतर्गत व्यापारी शेतकऱ्यांचा माथी का मारतात? हा प्रश्न कोणीही उपस्थित करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना निर्यातीचे अर्थशास्त्र माहिती नाही किंवा निर्यातीच्या पूर्ण प्रक्रियेची माहिती नाही. त्यांच्या या अज्ञानाचा फायदा घेऊन ठराविक व्यापारी ठराविक वृत्तपत्रांना आणि माध्यमांना हाताशी धरून अशा प्रकारचे खेळ मांडतात.
घटना क्र. ३: नाफेड ५ लाख टन कांद्याचा राखीव साठा बाजारात उतरवणार, अशा स्वरूपाच्या गुप्त सूत्रांच्या नावाने वृत्त मिळाल्याच्या वावड्या उठवत बातम्या पसरवून कांद्याला मागील आठवड्यात मिळालेला सोन्याचा भाव पाडण्यात काही वृत्तपत्रे आणि काही व्यापारी यांच्या अभद्र युतीला यश आले. ४५ रुपयांपर्यंत गेलेले भाव ३३ ते ३५ पर्यंत खाली आले. शेतकरी यातही समाधानी असला तरी वास्तविकता काय होती?
उत्तर भारतातील किरकोळ बाजारात भाव साठ, ऐंशी आणि शंभरी गाठत होते. व्यापाऱ्यांच्या नफेखोरीला आळा घालण्यासाठी नाफेडने एक सोपी पद्धत अवलंबली. आपल्याकडील साठा व्यापाऱ्यांना ठोक विक्री न करता किरकोळ बाजारात ३५ रुपये किलोने शे – दोनशे टेम्पो च्या माध्यमातून बिहार आणि दिल्ली च्या मार्केटमध्ये विक्री सुरु केली. वास्तविक हे प्रमाण मार्केटच्या ०.०१ टक्के देखील नसतांना वृत्तपत्रांनी नाफेडने ५ लाख टन कांदा मार्केटमध्ये उतारवल्याची बोंब ठोकली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला.
यामुळे शेतकऱ्यांनी वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या आणि विशेषता काही ठराविक वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्या या खोडसाळपणे पसरवलेल्या अफवा तर नाहीत ना? याची खातरजमा करूनच आपल्या शेतमालाच्या विक्रीचे व्यवस्थापन आणि नियोजन केले पाहिजे.
शेतकऱ्यांसाठी रात्र नेहमीच वैऱ्याची आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नेहमीच जागे राहणे गरजेचे आहे. विशेषतः शेतकऱ्यांची जी मुले शिक्षित झाली, त्यांनी आपल्या कुटुंबातील शेतमालाच्या विक्रीचे नियोजन करण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्यांना बळी न पडता, सत्य परिस्थिती पडताळून पाहणे आवश्यक आहे.