Tuesday, January 14, 2025

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई; मांजा वापर टाळण्यासाठी जनजागृती करा – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Share

मुंबई : नायलॉन मांजाच्या (Nylons Manja) वापरामुळे राज्यातील काही भागांत नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, आणि काही प्रकरणांत तर जीवितहानीही झाली आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr.Neelam Gorhe) यांनी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजाची विक्री केली जात आहे, अशा ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे आणि मांजाच्या उपयोग टाळण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे पुणे, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका क्षेत्रातील नायलॉन मांजा उपयोगावरील प्रतिबंधात्मक कारवाईबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीला पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, पेालीस उपायुक्त (उपक्रम) श्री. पठाण, छ. संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, ठाणे पोलीस आयुक्त प्रशांत परबकर, नाशिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, धुळे अतिरिक्त पोलीस अधिक्षक किशोर काळे, पुणे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार, जळगांवचे अति. पोलीस अधिक्षक अशोक नकाते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

महानगरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, पोस्टर्स आदींद्वारे जनजागृती करावी. मात्र यामुळे नागरिकांचा उत्साह कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी चांगल्या संकल्पना राबविलेल्या आहेत. त्याचा अन्य महापालिका, पोलीस आयुक्त यांनी अवलंब करावा. दुचाकीला यु कमान लावण्यातबाबत तपासून घेण्यात यावे. तसेच मांजा विक्री, उत्पादन किंवा मांजामुळे घडणाऱ्या घटनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात यावा.

वाहतूक पोलीसांनी नायलॉन मांजावरील कारवाईबाबत अलर्ट असावे. रस्त्यांवर आपत्कालीन पथकांची नेमणूक करावी. वेगात वाहन असताना मांजा गळ्याला लागून दुर्घटना झाल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी यंत्रणा निर्माण करावी. जेणेकरून जखमी व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, अशा सूचनाही यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची आणि प्रतिबंधात्मक उपायोजनांची माहिती दिली.

अन्य लेख

संबंधित लेख