पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापौरपदाचा बहुमान मिळाला आहे. नागपुरे यांचा राजकीय आलेख उल्लेखनीय आहे. त्या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी माणिक बाग) मधून त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या.
पुणे शहराचे सुपुत्र आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यात अद्याप दुखवटा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने एक मोठा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. महापौर निवडीनंतर फटाके फोडणे, गुलाल उधळणे किंवा ढोल-ताशे वाजवण्यावर भाजपने बंदी घातली आहे. शहरात कुठेही विजयाचे बॅनर्स लावू नयेत, अशा कडक सूचना शहराध्यक्ष धीरज घाटे आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादीने पाळला ‘दादां’चा शब्द
निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) या निवडणुकीत आपला उमेदवार उभा केला नाही. “दादांनी दिलेला शब्द आम्ही पाळत आहोत,” असे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिका पक्षीय बलाबल (१६५ जागा):
भाजप: ११९
राष्ट्रवादी (अजित पवार): २७
काँग्रेस: १५
राष्ट्रवादी शरद पवार -३
ऊबाठा-१