Saturday, October 12, 2024

गणेशोत्सवात पुणे महामेट्रो कडून आनंदाची बातमी; आता मेट्रोच्या वेळा अन् फेऱ्याही वाढवल्या

Share

आज घरोघरी गणरायाचं आगमन होत आहे, गणेशोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मोठमोठ्या संख्येने पुणे शहरात येत असतात. अशातच पुण्यातील गणेशोत्सवात मेट्रोदेखील गणेशभक्तांच्या सेवेत तैनात असणार आहे. महामेट्रोने या गणेशोत्सव कालावधीत मेट्रोच्या फेऱ्या व वेळेतही वाढ केली असल्याची माहिती आहे. तर गणेश विसर्जनाच्या दिवशी मेट्रो दिवस-रात्र धावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महामेट्रो प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहराच्या बाहेरून अनेक नागरिक देखावे पाहण्यासाठी पुण्यात येत असतात. त्यांच्या सेवेकरिता तसेच पुणेकरांच्या सेवेसाठी मेट्रोने हा निर्णय घेतला आहे. इतर दिवशी मेट्रो सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेमध्ये धावते. मात्र आता गणेशोत्सव काळात पहिल्या 3 दिवसांमध्ये मेट्रो (7 ते 9 सप्टेंबर) मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे.

त्यानंतर उत्सवाचे पुढचे 3 दिवस मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत धावणार आहे. त्याचबरोबर विसर्जनाच्या दिवशी (17 सप्टेंबर) सकाळी 6 वाजता सुरू होणारी मेट्रो (Pune Metro) दुसऱ्या दिवशी (दि. 18) सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे सलग 24 तास धावणार आहे. 18 सप्टेंबरला पुन्हा ती नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत धावणार आहे.

या वर्षी गणेशोत्सवात मेट्रो सलग 40 तास धावणार आहे. प्रवाशांच्या गरजेनुसार मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो (Pune Metro) प्रशासनाने दिली आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी वेळेत व फेऱ्यांमध्ये वाढ केली असली तरी मेट्रो प्रशासनाने दर ‘जैसे थे’च ठेवले आहेत, त्यात कोणतीही वाढ केलेली नाही, त्यामुळे पुण्यात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख