Wednesday, December 4, 2024

राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा अविनाश धर्माधिकारी; संविधानाच्या सरनाम्यात भारताचा राष्ट्र म्हणून उल्लेख

Share

पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे परखड मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. .

पूर्व पुण्यातील मंगळवार पेठेत ६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन मंच, श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, सजग रहो अभियान द्वारे आयोजित ‘संविधान आणि राजकीय हिंदुत्व’ या मतदार जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.

धर्माधिकारी म्हणाले, “शेख हसिना यांना बांग्लादेशातुन‌ पळुन यावे लागले आहे. हा भारतासाठी एक धडा आहे. पाकिस्तान व बांग्लादेश दोन्ही देशाची राज्यघटना इस्लामिक आहे. तेथील अनेक कायदे मानवता विरोधी आहेत. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात 10 टक्के हिंदू होते.आता तिथे हिंदू जवळपास संपले आहे. फाळणीच्या वेळी बांग्लादेशात 30 टक्के हिंदू होते. आज 8 टक्के राहिले आहेत. भारतात मात्र फाळणीवेळी मुस्लिम 9 टक्के होते ते आता 14 टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. काही राजकीय पक्ष मुस्लिमांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहेत. हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे हिंदूंनी गाफील राहू नये. मुस्लिमांनी मुस्लिम म्हणून एकगठ्ठा मतदान केले तर संवैधानिक अधिकार आणि हिंदुनी हिंदु म्हणुन मतदान केले तर त्याला बहुसंख्याकवाद म्हणायचे हा ढोंगीपणा आहे.”

” समान नागरी कायदा तातडीने लागू करण्याची गरज आहे. समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेबा आंबेडकरांना हवा होता. घटना तयार करताना डॉ.आंबेडकरांचे जिथे जिथे ऐकले तिथे तिथे भारताला फायदा झाला आहे. कलम 370 ला डॉ. आंबेडकरांचा तीव्र विरोध होता. कलम 370 रद्द करणारे सरकार खरे संविधानवादी आहे. देशात १९७५ साली आणीबाणी लागु केली तेव्हा संविधान धोक्यात आले होते,” असे धर्माधिकारी म्हणाले.

माजी खासदार प्रदीप रावत यावेळी बोलताना म्हणाले, “अरबांनी भारतावर अनेक आक्रमणे केली आणि आपली हजारो वर्षाची समृध्द संस्कृती नष्ट केली. आपली संस्कृती वाचवण्यासाठी हिंदूंच्या पूर्वजांनी संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर हा हजारो वर्षांचा संघर्ष वाया गेला असता. शिवरायांनी त्यांचे शस्त्र वापरले. आज संविधानाने आपल्याला एक शस्त्र दिले आहे ते म्हणजे आपले मत. राजकीय हिंदुत्वासाठी आपण शंभर टक्के मतदान केले पाहिजे.”

“भारतात जे प्रबोधन युग घडले त्यामुळे हिंदू समाजाने स्वतःच्या आत बघायला सुरुवात केली. हिंदु समाजाचे दोष लक्षात आले. प्रबोधन युगात झालेल्या महापुरुषांचे एक म्हणणे होते कि ह्या हिंदु समाजाची गावकी एक आहे‌, पण भावकी एक झाली पाहिजे. डॉ. आंबेडकर म्हणायचे हिंदु समाज एक बहुमजली इमारत आहे, पण या इमारतीत खाली व वर जाण्यासाठी जिनाच नाही. हा जिना प्रबोधन युगात मिळाला. त्याच प्रबोधन युगाचे अपत्य म्हणजे भारतीय संविधान होय. संविधान भारतात टिकले कारण इथे बहुसंख्य हिंदु समाज आहे. म्हणून आज अस्तित्वात असलेला हिंदुस्थान राखायचा असेल, सहिष्णु संस्कृती जिवंत ठेवायची असेल तर राजकीय हिंदुत्व प्रबळ राहिले पाहिजे. राजकीय हिंदुत्व दुबळे झाले की सांस्कृतिक हिंदुत्वाचा संकोच होतो,” असे रावत म्हणाले.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या ऍड वैशाली चांदणे मंचावर उपस्थित होते. सायली काणे यांच्या कलाश्री नृत्यशाळेच्या कलाकारांनी मतदार जागृती नृत्य सादर केले. सूत्रसंचालन रोहित धायरकर यांनी केले. सुमित डोळे यांनी प्रास्ताविक केले. विजय दरेकर यांनी संविधान सरनाम्याचे वाचन केले. श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टचे बाळासाहेब पटोळे यांनी आभार मानले. प्रबोधन मंचाचे स्वप्नील कत्तूर यांनी संयोजन केले.

अन्य लेख

संबंधित लेख