Sunday, July 14, 2024

रज उत्सव: ओडिशामध्ये साजरा होतो मासिक पाळीचा उत्सव

Share

भुवनेश्वर: ओडिशातील रज उत्सव हा मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्राचा (menstrual cycle) सन्मान करणारा एक अनोखा उत्सव आहे. तीन दिवस चालणारा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. त्या दिवसाला मिथुन संक्रांती असेही म्हणतात.

रज उत्सवादरम्यान, असे मानले जाते की पृथ्वी माता, किंवा भूदेवीला मासिक पाळी येते आणि पावसाच्या आगमनाने येणारया शेतीच्या कामांसाठी धरणीमाता स्वतःला तयार करते हा विश्वास या सणाच्या नावात दिसून येतो. “रज” हा संस्कृत शब्द “रज स्वला” पासून आला आहे, ज्याचा अर्थ “मासिक पाळी आलेली स्त्री” असा आहे.

ओडिशामध्ये रज उत्सव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिलांना त्यात यावेळी विशेष स्थान दिले जाते. उत्सव काळातील चार दिवस त्यांना काम करण्याची गरज नसते तसेच त्यांना घरकामातून विश्रांती घेऊ दिली जाते. या काळात स्त्रिया अनवाणी चालणे, जमीन खरडणे, दळणे, काहीही फाडणे, कापणे किंवा स्वयंपाक करणे यासारख्या काही कामांपासून दूर राहतात.

रज सणादरम्यान स्त्रिया हळदीच्या पेस्टने स्वतःला सजवितात. तसेच नदीमध्ये जाऊन स्नान करतात. पारंपारिक झोपाळे, खेळ आणि विशेष खाद्यपदार्थांचा आनंद घेतला जातो. भगवान जगन्नाथाची पत्नी भूदेवीच्या पूजेने देखील हा सण साजरा केला जातो, देवीला उत्सवाच्या चौथ्या दिवशी विधीवत स्नान घातले जाते.

मासिक पाळीला धार्मिक कार्यात निषिद्ध म्हणून पाहण्यापेक्षा तिला साजरे करून त्याचा सन्मान कसा केला जाऊ शकतो याचे रज उत्सव हे एक सुंदर उदाहरण आहे. मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनाचा एक नैसर्गिक आणि आवश्यक भाग आहे आणि तो सहजपणे स्वीकारला पाहिजे याची आठवण हा उत्सव करून देतो.

अन्य लेख

संबंधित लेख