Saturday, July 27, 2024

अयोध्येच्या राममंदिरात, मंत्रमुग्ध वातावरणात!

Share

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणकार्यात सहभागी झाले, तेव्हापासून अगदी रोज नाही, पण अधूनमधून काही महत्त्वाच्या नोंदी मी करत होते. त्यावेळी सुचलेले ते विचार, ते अनुभव जमतील तसे मी शब्दांकित केले. प्रभूश्रीरामांचे दर्शन भव्य मंदिरात जाऊन घेतले तो दिवस होता, माघ शुद्ध प्रतिपदा. त्या दिवशी मी जे काही नोंदवले ते असे.

आज माघ शुद्ध प्रतिपदा. कालची माघी अमावस्येची विक्रमी गर्दी. येथे लोटलेला जनसागर आणि सर्वत्र ‘जय श्रीराम’चा गजर…
हे पाहिल्यानंतर कसे काय दर्शन होणार ह्याची खरं तर काळजीच वाटत होती. आमच्या प्रकल्प व्यवस्थापक राधेयने, चला सकाळच्या साडेचारच्या आरतीला जाऊ असे सांगितले आणि आम्ही अतिशय कडाक्याच्या थंडीत शुचिर्भूत होऊन ४ वाजता अंधारातच गाडीत बसलो. भाविकांच्या गर्दीमुळे सगळे रस्ते तेव्हा सुद्धा पोलिसांनी अडवले होते. लांबच्या रस्त्याने साईटच्या मार्गे मंदिरा पर्यंत पोहोचलो. तोवर आरती नुकतीच पार पडली होती आणि पडदा बंद करत होते. पुढच्या आरती पर्यंत थांबणे क्रमप्राप्त होते.

भाविकांना दर्शन सुरू होण्याची वेळ सकाळी ७ वाजताची, त्यामुळे सगळी गर्दी बाहेर जवळपास १ किलोमीटर लांब होती… आम्ही एकदम मंदिराच्या गृह मंडपा जवळ असल्यामुळे मंदिर परिसर शांत होता… आधीच्या आरती नंतर सर्व भाविक परत गेले होते. त्यामुळे पुजारी, आम्ही तिघे आणि सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचारी एवढेच फक्त मंदिरात. शांतपणे आतमध्ये सगळ्या मंडपातून फिरलो. अतिशय सुंदर कोरीवकाम, सुंदर गुलाबी रंगाचा दगड त्यावर केलेली सौम्य प्रकाश योजना. काय सुंदर वातावरण होते ते. शांत,पवित्र आणि प्रसन्न. अजून प्राणप्रतिष्ठेच्या वेळची सजावटही तशीच होती.

थोड्या वेळाने बाहेर प्रार्थना मंडपात आलो. तिथे गेले ४५ दिवस रोज अनुष्ठान चालू आहे. प्रकल्पाच्या सुरवाती पासूनच्या अनेक आठवणी, अनेक पेच आणि प्रसंग, प्राण प्रतिष्ठेच्या आधीची सगळी तयारी, व्यवस्था, आलेली माणसे, त्यांचे अनेक अनुभव, प्रसंग आणि आता पुढचे काम… असे बरेच काही… विषय गप्पांचे… अतिशय बोचरी थंडी, पायाखाली थंडगार मार्बलची फरशी. आजूबाजूला सुरक्षा कर्मचारी… आसपास फिरत असलेली काही माकडे… असे सगळे वातावरण. बघता बघता ६.१५ वाजले आणि पुढच्या आरती करता दरवाजे पुन्हा उघडले. आम्हाला आधीच प्रवेश मिळाला असल्यामुळे सगळ्यांत पुढची जागा मिळवून पटकन बसून घेतले.

पडदा उघडला आणि आतमधली सुंदर मूर्ती दिसू लागली. पांढरा शुभ्र मार्बल, त्यावर सुंदर कोरीवकाम आणि त्या समोर काळ्याभोर रंगातली साक्षात श्रीराम लल्लाची देखणी मूर्ती. ते सुंदर तेजस्वी रूप बघून एकदम डोळेच दिपले… हे रूप डोळ्यांत किती आणि कसे साठवू असे वाटायला लागले. पुजाऱ्यांनी आरती सुरु केली अगदी तालबद्ध आणि साग्रसंगीत. कमळात उभे असलेले चरण कमल, सुंदर गुलाबी रंगाचा वस्त्र शृंगार, शोभून दिसणारे दागिने, भाल तिलक, फुलांच्या सुंदर माळा. रामलल्लाचे मुखकमल क्षणाक्षणाला अजून तेजस्वी होतं आहे असं वाटू लागले, गोड हास्य, गोबरे गाल, सात्विक आणि प्रसन्न भाव, पाणीदार आणि भावपूर्ण डोळे… आरतीच्या तालाशी हृदयाचे ठोके कधी एकरूप झाले ते कळलेच नाही… डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि कुठे बसलो आहोत ह्याचाही एक क्षण विसर पडला. जिथे विचारच संपले तिथे शब्द काय सुचणार…

Ramlalla darshan

कालचक्राचा एक फेरा पूर्ण झाला असे मनोमन वाटून गेले…!! तब्बल २० ते २५ मिनिटे मंत्रमुग्ध वातावरणात रामरायाच्या इतक्या सानिध्यात… किती तेजस्वी मूर्ती.. एकटक बघतच राहावी अशी… आजचा दर्शन योग केवळ त्याने आणि त्यानेच योजिला होता… प्राण प्रतिष्ठेनंतर पाषाणाच्या मूर्तीला ‘देवत्व’ कसे प्राप्त होते अन् बांधकामाचे ‘मंदिर’ कसे बनते ह्याचा हा अक्षरशः साक्षात्कार होता. पुजाऱ्यांनी गंध लावलं, प्रसाद घेतला, साष्टांग नमस्कार केला, रामरायाला जमेल तेवढं डोळ्यात साठवलं आणि मंदिरातून बाहेर आलो. एव्हाना सगळीकडे उजाडू लागलं होतं. पूर्वेकडे परकोट्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कळसावर आकाशात केसरिया रंग दिसू लागला होता. बाहेर भाविकांचा जय श्रीरामाचा गजर सुरू होत होता. नवीन पहाट झाली होती.

Ashwini Kavishwar

अश्विनी कवीश्वर
(लेखिका स्थापत्य अभियंता असून त्या वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर काम करतात)

अन्य लेख

संबंधित लेख