Thursday, October 22, 2026

रामायण: अखंड भारताची अस्मिता

Share

प्रस्तावना

मनोरंजन विश्वात सध्या क्रेझ निर्माण करणारा चित्रपट आला आहे: रामायण. नितेश तिवारी दिग्दर्शित आगामी या चित्रपटाची केवळ घोषणा आणि आगाऊ नोंदणीची चाहूल लागताच देशभरातील मल्टिप्लेक्स खिडक्यांवर अभूतपूर्व झुंबड उडाली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये प्रीमियम आयमॅक्स तसेच रिक्लायनर जागांचे दर आसमंताला पोहोचले असतानाही अवघ्या काही तासांत लाखो रुपयांची तिकिटे हातोहात विकली गेली आहेत.
आता ज्या महाकाव्याचा आरंभ, मध्य आणि क्ल्यामॅक्स या देशातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला मुखोद्गत आहे, ज्या कथानकात कोणताही अनपेक्षित ‘ट्विस्ट’ शिल्लक राहिलेला नाही, तीच कथा रूपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी सामान्य भारतीय नागरिक महागडी तिकिटे काढून रांगेत का उभा राहतो? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटसृष्टीच्या व्यावसायिक गणितांमध्ये नाही, तर हजारो वर्षांच्या परंपरेतून भारतीय अंतःकरणात खोलवर रुजलेल्या अस्मितेमध्ये, सांस्कृतिक स्मृतीमध्ये आणि श्रीरामांवर असलेल्या अढळ श्रद्धेमध्ये दडलेले आहे.

कल्पित मिथक की वैज्ञानिक इतिहास?

गेल्या काही दशकांत आपल्या देशातील काही बुद्धिजीवी इतिहासकारांनी आणि पुरोगामी विचारवंतांनी रामायणाला केवळ ‘काल्पनिक महाकाव्य’ किंवा ‘कविकल्पना’ ठरवून बाद करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एवढ्या विस्ताराने तत्कालीन आकाशातील नक्षत्रे, ग्रहांचे अंशात्मक स्थान आणि ग्रहणांची अचूक काल क्रमवारी नोंदवणे केवळ कवी कल्पनेतून जर केली असेल तर एवढी गणितीय अचूकता जन्माला येत नाही. इतक्या अचूक खगोलीय नोंदी केवळ प्रत्यक्ष पाहिलेल्या ऐतिहासिक वास्तवातूनच नोंदवल्या जाऊ शकतात.
वाल्मिकींच्या बालकांडात नमूद केल्याप्रमाणे, प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला, पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क लग्नात झाला. त्या क्षणी सूर्य मेष राशीत, शनी तूळ राशीत, गुरू कर्क राशीत, शुक्र मीन राशीत आणि मंगळ मकर राशीत—असे पाचही प्रमुख ग्रह आपापल्या उच्च राशीत विराजमान होते. आधुनिक काळातील संशोधक पुष्कर भटनागर आणि सरोज बाला यांनी ‘प्लॅनेटेरियम गोल्ड’ या अत्याधुनिक सॉफ्टवेअरमध्ये वाल्मिकींनी नोंदवलेली ही खगोलीय सूत्रे प्रविष्ट केली, तेव्हा अचूक १० जानेवारी ५११४ ईसापूर्व ही तारीख समोर आली. विचार करा—आजपासून साधारण ७,१०० ते ८,००० वर्षांपूर्वी अयोध्येच्या अक्षांश-रेखांशावरून पाहिले असता आकाशात नेमका हाच ग्रहांचा मेळा भरला होता.

चिरंतन जीवनमूल्ये

कथा तोंडपाठ असूनही प्रत्येक पिढी रामायणापुढे नतमस्तक का होते, याचे मूळ या महाकाव्याने दिलेल्या जीवनमूल्यांमध्ये दडलेले आहे. अधर्मावर नेहमीच धर्माचाच विजय होतो. रावणाकडे सोन्याची लंका होती, अपार सैन्यबळ होते, चारही वेदांचे पांडित्य होते आणि त्रिलोकाला थरकाप उडवणारे वरदान होते. त्या मानाने प्रभू श्रीरामांकडे ना अयोध्येचे राजवैभव नव्हते, की शिस्तबद्ध सैन्याचा पाठिंबा होता; जोडीला होती अरण्यवासी वानर टोळी आणि आत्मीयतेने एकत्र आलेले तुटपुंजे आप्तगण. तरीही अहंकाराने माजलेल्या त्या महासत्तेचा पाडाव श्रीरामांनी केला. हनुमंताने जर सीतेला पूर्वीच लंकेतून उड्डाण करून परत आणले असते तर तो अधर्मावर धर्माचा विजय झाला नसता. त्यामुळे लढाई श्रीराम आणि रावणामध्ये असल्याने श्रीरामांनीच रावणाला हरवणे गरजेचे होते.
रामायणाचा संपूर्ण महासंग्राम हा एका पतिव्रता स्त्रीच्या अपमानातून आणि अपहरणातून उफाळला होता. रावणाने जेव्हा सीतेला उचलून लंकेत नेले, तेव्हाच लंकेचा विनाश निश्चित झाला होता. मंदोदरी आणि विभीषणाने वारंवार समजावून देखील रावण अहंकाराने होरपळतच राहिला. एखाद्या सती-साध्वीच्या, पतिव्रता स्त्रीच्या अब्रूवर घाला घालणाऱ्या अधर्माचा अंत केवळ मृत्युदंडच असू शकतो, हा नैतिक दंडक रामायणाने सहस्र वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीला घालून दिला. हा केवळ कौटुंबिक आदर्श नाही, तर कोणत्याही सभ्य समाजाच्या अस्तित्वाची ती मूलभूत पूर्वअट आहे, हेच रामायण वारंवार अधोरेखित करते.

रामाचे राजकारण

भारतातील प्रादेशिक आणि फुटीरतावादी राजकारणाचा इतिहास पाहिला तर तथाकथित द्रविडी अस्मितेने रामायणाचा वापर उत्तर-दक्षिण संघर्षाची आग पेटवण्यासाठी कसा केला, हे स्पष्ट दिसते. तामिळनाडूच्या राजकारणात स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी रामाला ‘उत्तर भारतीय आक्रमक’ आणि रावणाला ‘द्रविडी नायक’ ठरवण्याचा केविलवाणा खटाटोप केला. परंतु, या राजकारणातील सर्वात मोठी उपरोधिक शोकांतिका अशी की, ज्या ई. व्ही. रामसामी ‘पेरियार’ यांनी आयुष्यभर रामायणाचा जाहीर धिक्कार केला, रामाच्या मूर्तींचा अवमान केला, त्या पेरियारांच्या स्वतःच्या अधिकृत नावातून नियतीने ‘राम’ कधी पुसू दिला नाही.
द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांनी तर २००७ च्या रामसेतू वादाच्या वेळी जाहीर सभेत विचारले होते, “कोण होता हा राम? तो कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीघेऊन आला होता? त्याने सेतू कधी बांधला होता?”. हिंदू आस्थेची अशी उघड खिल्ली उडवणारे हे नेते जेव्हा सत्तेच्या सारीपाटावर पत्ते पिसत होते, तेव्हा त्याच तमिळ भूमीत महाकवी कंबन यांचे ‘कंब रामायण’ घराघरांत भक्तीभावाने गायले जात होते.


रामनामाचा महिमा

ज्या कथेने सहस्र वर्षांची परकीय आक्रमणे पचवून, सांस्कृतिक आघात सहन करून आणि निधर्मी आख्यानांचे विषारी हल्ले झेलूनही या राष्ट्राची चेतना जिवंत ठेवली, त्या कथेतील विशाल आत्मतत्त्वाला पुन्हा एकदा डोळे भरून अनुभवण्याची ही सामान्य भारतीयांची आर्त ओढ आहे.
राजकीय पक्ष तात्कालिक सत्तेसाठी या देशाचे तुकडे पाडू पाहतील; पण जेव्हा जेव्हा या देशाच्या सामूहिक अंतःकरणाचा ठाव घेतला जातो, तेव्हा कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि कामाख्यापासून ते द्वारकेपर्यंत हा संपूर्ण देश एकाच रामायणाच्या सूत्रात एकवटलेला दिसतो. त्यामुळे, जन्मभर रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेल्या प्रत्येकाला मृत्यूच्या शय्येवर देखील रामनाम ऐकू येणार आहे. असे हे रामायण केवळ पुराणातला अध्याय नसून भारताचा वर्तमान, भूतकाळ आणि भविष्य घडवणारा अक्षय्य सांस्कृतिक कणा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख