Friday, November 8, 2024

राष्ट्र सेविका समिती, संभाजी भाग, पुणे यांचे विजयादशमी उत्सवानिमित्त सघोष पथसंचलन

Share

रविवार, दि. 6 ऑक्टोबर रोजी कर्वेनगर परिसरात आयोजित केले होते. सर्वप्रथम महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये, महर्षी कर्वे व आदरणीय बाया कर्वे यांच्या पुतळ्यास राष्ट्र सेविका समितीच्या पदाधिकार्यांनी अभिवादन केले. त्यानंतर विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन, ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झाले.

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांनी भगव्या ध्वजाचे औक्षण केले आणि त्यानंतर अग्रभागी दंडगण, त्यामागून ओपन जीपमध्ये भगवा ध्वज, घोषगण आणि त्यामागून गणवेशातील सेविकाअसा पथसंचलनास प्रारंभ झाला.
कर्वे नगरातील नागरी वस्त्यांमधून जाणार्या या संचलनात साडपाचशे संपूर्ण गणवेशधारी सेविकांनी सहभाग घेतला. यात सर्व वयोगटातील महिला असून बाल आणि तरुणींची संख्या लक्षणीय होती. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींचा संचलनात, घोषवादनात आणि संचलन पाहण्यासाठीही मोठ्या संख्याने असलेला सहभाग लक्षणीय होता. महिलांचे एकंदरीत तीन घोष होते. यामध्ये वंशी / वेणु दल (बासरी), आनकदल (साईडड्रम)आणि तालवाद्य म्हणजे झल्लरी (सिंबल), त्रिभुज (ट्रॅन्गल) आणि पणव (बेस ड्रम) यांचा समावेश होता.

शिस्तबद्ध आणि अतिशय सुंदर अशा या पथसंचलनाचे नागरिकांनी खूप उत्साहाने मोठ्या संख्येने चौकाचौकात उपस्थित राहून स्वागत केले. विविध मंडळांतर्फे रांगोळ्यांच्या पायघड्या घालून, ध्वजाचे औक्षण करुन, फुलांची उधळण करुन, देशभक्तीपर गाणी गाऊन आणि घोषणा देऊन नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
पुन्हा कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर संचलनाचा समारोप झाला. समारोपाच्या वेळी गणवेशातील एकूण साडेसहाशे सेविका आणि दोनशे नागरिक मैदानावर उपस्थित होते.

राष्ट्र सेविका समिती, संभाजीभाग, पुणे, कार्यवाहिका मा.अनघाताई जोशी यांनी कार्यक्रमास सहाय्य करणाऱ्या सर्वांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.

या उत्सवास राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्क प्रमुख मा. पूनम ताई शर्मा, प. महा. प्रांत कार्यवाहिका मा. शैलाताई देशपांडे,अर्चनाताई चांदोरकर पुणे महानगर शारीरिक शिक्षण प्रमुख व संभाजी भाग कार्यकारिणी, यांची उपस्थिती लाभली.

तसेच पुण्याचे माननीय मंत्री आणि अनेक माजी नगरसेवकांनी आवर्जून उपस्थित राहून समितीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

अन्य लेख

संबंधित लेख