Friday, November 8, 2024

आदिवासींचा पिता असलेल्या महादेवाने रावणाची केलेली फजिती

Share

या संपूर्ण विश्वाचे परमपिता आहेत भगवान शंकर म्हणजेच महादेव किंवा बडादेव, त्यांनीच संपूर्ण विश्व निर्माण केले. परंतु त्यांनीच निर्माण केलेल्या देव, दानव आणि मानवांपैकी कोणीतरी त्यांची खोडी काढते आणि स्वतःची फजिती करून घेते. आजच्या गोष्टीत ज्याची फजिती मी सांगत आहे तो आहे लंकेचा असुर राजा दशानन. 

या विश्वामध्ये देव, दानव आणि मानवांची वस्ती आहे. आदिवासी, ग्रामवासी, नगरवासी, शेतकरी, व्यापारी, राज्यकर्ते हे सर्व मानव आहेत. ते धान्य पिकवतात, व्यापार करतात, नगरे वसवतात, धरणे बांधतात, विविध वस्तू बनवतात, विकतात, खरेदी करतात. दुसऱ्याकडून काही घेत‌ले तर मानव त्याचा मोबदला देतात. ते कुटुंब व्यवस्था मानतात. दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणे, दुसऱ्याची पत्नी पळवणे दुसऱ्यांच्या घरी भांडणे लावणे अशी कामे ते करीत नाहीत. ते देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या उत्पन्नाचा काही भाग त्यांना अर्पण करतात.

 देव कायम तरुण असतात, कधीच म्हातारे होत नाहीत. मानवाने अर्पण केलेल्या गोष्टी ते स्वीकारतात, मानवाला प्रगतीत मदत करतात. ते नेहमी आनंद घेतात. मानवासारखी कुटुंब व्यवस्था त्यांच्याकडे नाही. त्यांना मृत्यू नाही. ते काही चूक झाली तर काही काळासाठी मानव होतात. शिक्षा पूर्ण झाल्यावर पुन्हा देव बनतात.

राक्षस हा तिसरा प्रकार आहे. दशानन हा एक राक्षस आहे. राक्षस कुटुंब व्यवस्थेत कायम रमत नाहीत. ते अनेक विवाह करतात. दुसऱ्यांच्या पत्नी, बहिणी, मुली त्यांना आवडल्या तर भीती दाखवून किंवा मायावी स्वरूप दाखवून, फसवून त्यांना पळवून नेतात. इतरांनी चालवलेल्या चांगल्या कामात अडचणी निर्माण करतात. इतरांच्या अन्नात मांस, दूषित रक्त, विष्ठा, मूत्र, थुंकी मिसळतात आणि त्यांना भ्रष्ट करतात. इतरांच्या उपासनांमध्ये विघ्न निर्माण करतात आणि त्यांना आपल्या देवतेचीच उपासना करण्याची जबरदस्ती करतात, राक्षस स्वत: कोणतीही चांगली निर्मिती करीत नाहीत. ते इतरांनी पिकवलेले धान्य, जमा केलेली संपत्ती पळवतात. मानवांनी निर्माण केलेल्या कलाकृती, ग्रंथ ते नष्ट करतात. राक्षस दिसताना मानवासारखेच दिसतात परंतु त्यांच्या सवयी वाईट असल्याने क्रूर दिसतात. प्रत्येक काळात राक्षस वेगवेगळ्या नावांनी प्रकट होतात.

मानव आपल्या गुणांनी देवासारखा होतो तर दुर्गुणांनी राक्षसासारखा होतो. जिथे राक्षस राहू लागतात त्या क्षेत्रात अत्याचार, अस्वच्छता, दुर्गंधी वाढू लागते आणि मानव ती जागा सोडून अन्य ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. हळूहळू ते क्षेत्र दानव ताब्यात घेतात.

दशानन हा राक्षस ऋषी विश्रवा आणि माता कैकसी यांच्या पोटी जन्माला आला. त्याने खूप तपस्या करून ब्र‌ह्माला प्रसन्न करून घेतले. त्याने ब्र‌ह्माला वर मागीतला की त्याला अमरत्व मिळावे, असे अमरत्व मानवाला देता येत नाही. त्यामुळे मग त्याने असा वर मागितला की मानव सोडून कोणाकडूनही त्याला मृत्यू येऊ नये. मानवाला तो गवताच्या काडीप्र‌माणे तुच्छ समजत असे. त्यामुळे त्याने मानवापासून संरक्षणाचा वर मागीतला नाही. हा वर मिळाल्यावर तो उन्मत्त झाला. त्याने मानव आणि देवांवर अत्याचार करायला सुरवात केली. त्याचे मानवातून असुरात, राक्षसात रुपांतर झाले. दशाननाचा भाऊ लंकेचा राजा कुबेर हा चांगल्या स्वभावाचा होता. त्याचे राज्य संपन्न होते, प्रजा सुखी होती. दशाननाने कुबेराशी भांडण उकरून काढले, त्याचे सौख्य नष्ट केले. ऋषी विश्रवा यांच्याशी चर्चा करून कुबेराने राक्षसांच्या त्रासाला कंटाळून लंका सोडली आणि तो कैलास पर्वताजवळ जाऊन राहिला.

रावणाने देव आणि मानवांच्या पत्नी, बहिणी, कन्या पळवून न्यायला सुरवात केली. आपल्या पतीपासून आणि छोट्‌या मुलांपासून दूर केल्या गेलेल्या या स्त्रियांच्या आकांताने लंकेचा राजमहाल शापित झाला. सोन्याने मढलेला तो राजवाडा महिलांच्या शापाने कमकुवत होऊ लागला. वेदवती नावाची एक पवित्र कन्या रावणाला  आवडली. विनंती करून, भीती दाखवून सुद्धा वेदवती दशाननाच्या  अधीन झाली नाही. रावणाने तिचे केस पकडले. तिने स्वत:चे केस कापून स्वतःला सोडवून घेतले. तिने अग्नी पेटवून त्यामध्ये स्वतःच्या शरीराची आहुती दिली. तिने असा निश्चय जाहीर केला की ती पुन्हा जन्म घेईल आणि पुढील जन्मात दशाननाच्या  मृत्यूचे कारण बनेल. तिने  जानकी म्हणजे सीतेच्या रुपात स्वतःला जनकपुरीमध्ये प्रकट केले.  

रावणाने एकदा  रंभा नावाच्या सुंदर स्त्रीला अडवले आणि शरीरसुखाची मागणी केली. रंभेने  त्याला विनंती केली की ती त्याचा भाऊ कुबेर याची सून आणि नलकुबेराची पत्नी आहे. सून मुलीप्रमाणे असते, तिच्याकडे शरीरसुख मागू नये. परंतु राक्षस  कुटुंब व्यवस्था मानीत  नाहीत. ते आई व्यतिरिक्त कोणत्याही स्त्रीशी संभोग करतात. बहीण, मुलीशी सुद्धा संभोग करतात त्यामुळे दशाननाने तिची विनंती मानली नाही. दशाननाने रंभेवर बलात्कार केला. शरीर आणि मनाने त्रासलेली रंभा नलकुबेराकडे गेली आणि तिने  सर्व वृत्त त्याला सांगीत‌ले. नलकुबेराने दशाननाला शाप दिला की यानंतर दशाननाने कोणाही स्त्रीची  तिची इच्छा नसताना संभोग केला तर त्याच्या मस्तका‌चे सात तुकडे होतील. या शापामुळे दशानन घाबरला. त्याने देव आणि मानवांच्या स्त्रिया पकडून आणणे चालूच ठेव‌ले परंतु त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करणे बंद केले. पळवून आणलेल्या स्त्रियांना आमिषे दाखवून, वश करून त्यानंतरच तो शारीरिक सुख घेऊ लागला. अशा क्रूर दशाननाने भाऊ कुबेराचे विमान जबरदस्ती ताब्यात घेत‌ले. आता तो स्त्रियांना विमानातून लंकेला आणू लागला. एकदा त्याचे विमान एका उंच पर्वताला अडकले. त्याचा  क्रोध अनावर झाला. तो पर्वत नष्ट करायचा असे त्याने ठरविले .  नंदीश्वराने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु द‌‌शाननाने त्याचे ऐकले नाही. दशाननाने पर्वताला उचलण्यासाठी दोन्ही हात पर्वताखाली घातले. तो साधा पर्वत नव्हता. तो पवित्र कैलास पर्वत होता. आदिवासींचे पिता आणि माता असलेले प्रत्यक्ष भगवान शंकर  आणि माता पार्वती  पर्वतावर क्रीडा करत होते.  पर्वत हालू लागला. माता पार्वती महादेवांना बिलगली. महादेवांनी तिला आश्वस्त केले,  सांभाळले आणि पायाच्या अंगठ्‌‌याने पर्वताला खाली दाबले. दशाननाचे दोन्ही हात पर्वताखाली दाबले गेले. स्वतःच्या ताकदीचा गर्व असणाऱ्या दशानना‌ने पूर्ण ताकद लावली परंतु महादेवाने अंगठ्‌याने दाबलेला पर्वत त्याच्याने हलेना. पर्वताच्या  वजनाने त्याच्या हाताला कळा लागल्या. तो वेदनेने किंचाळू लागला. त्याचा आर्तनाद परिसरात घुमू लागला. दशाननाने या वेदनेतून सुटण्यासाठी महादेवाची प्रार्थना, याचना, गयावया सुरु केली. शेवटी भोळे महादेव प्रसन्न झाले. महादेवांनी द‌शाननाची सुटका केली. त्याने वेदनेने व्याकूळ होऊन भरपूर ‘राव’ म्हणजे आवाज केला म्हणून महादेवांनी  त्याचे नाव रावण ठेवले. रावण असा धडा मिळूनही  सुधारला नाहीच. त्याने राजा जनकाची कन्या आणि  अयोध्येची सून सीतामाईला कपटाने पळवले. नलकुबेराने दिलेल्या शापामुळे तो सीतामाईवर शारीरिक अत्याचार करू शकला नाही. परंतु सीतामाईला वाश करण्यासाठी त्याने भीती, आमिष, कपट अशा सर्व मार्गांचा अवलंब केला. शेवटी श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतामाईला त्याच्या कैदेतून सोडवले.

पूर्वीपासून रावण त्याच्या वाईट वर्तनामुळे दुष्ट राक्षस म्हणून ओळखला गेला. आपला मुलगा रावणासारखा व्हावा असे कोणत्याही आईला वाटत नाही. परंतु आता कलियुग आले आहे. त्यामुळे दुसऱ्याची संपत्ती लुटणाऱ्या, स्त्रीलंपट रावणाला आदर्श समजणारे लोक जन्माला येत आहेत. लेखक रावण किती चांगला होता याचे वर्णन करणारी पुस्तके लिहीत आहेत. वाचक अशा पुस्तकातील बलात्काराची वर्णने मिटक्या मारीत वाचत आहेत.अनेक लोक आम्ही रावणाचे भक्त आहोत असे सांगत आहेत. आपल्या जनजाती समाजात सुद्धा असा प्रचार होत आहे की ब्राह्मण वडिलांच्या पोटी जन्माला आलेला, संस्कृत मध्ये स्तोत्रे रचणारा, स्त्रियांवर अत्याचार करणारा, स्वतःच्या सूनेवर बलात्कार करणारा रावण आपला पूर्वज होता. आपण सर्वांचे तोंड बंद करू शकत नाही कारण आपण संविधान आणि कायदा मानणारे आहोत.  परंतु आपण आदिवासी  रावणासारखे दुर्गुणी आहोत का याचा विचार आपण करायला पाहिजे .  मानवांच्या या शत्रूला  आदर्श न मानता आपण या खलनायकाचे दहन विजयादशमीला करूया.  कोणीही मानव त्याच्यासारखा स्त्रीलंपट दानव, असुर होऊ नये यासाठी  प्रयत्न करूया. 

भगवान बिरसा मुंडा की जय!
क्रांतीवीर राघोजी भांगरे की जय !
पार्वती माता की जय!
हर हर महादेव! 

अन्य लेख

संबंधित लेख