Saturday, September 7, 2024

ऋतुराज वसंत आणि भारतीय परंपरा भाग – २

Share

अगदी प्राचीन काळापासून वसंतोत्सव, मदनोत्सव, होळी, रंगपंचमी या सर्व उत्सवांची लोकप्रियता बघून या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्यातली उत्स्फूर्त सहजता ठळकपणे दिसून येते. हे सगळे सण म्हणजे भारतीय संस्कृतीचे, तिच्या निसर्गप्रेरीत उत्सवी मानसाचे आरसेच आहेत.

अगदी प्राचीन काळापासून कविमनाच्या सर्वांनाच प्रिय वाटणाऱ्या या वसंताची मोहक वर्णने अगदी वाल्मिकी रामायणापासून, कालिदासाच्या निरनिराळ्या रचनांपासून अगदी आजच्या साहित्यातही दिसतात. त्यापूर्वीच्या शतपथ, तैतरीय अशा ग्रंथात तर या ऋतूमधे औषधी निर्माण होतात, वनस्पतींना फुले, फळे येतात असे उल्लेख आहेत. भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात सर्व ऋतूंमधे मी वसंत आहे (ऋतूनां कुसुमाकरः) आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. नंतरच्या काळात महाकवी कालिदासाचे वसंत ऋतूवरील प्रेम तर सर्वांना माहिती आहेच. कालिदासाच्या जवळ जवळ सर्वच रचनांमध्ये वसंतातील निसर्गाची उधळण आणि वसंत व कामदेव या जोडगोळीने प्रेमीजनांवर पाडलेला प्रभाव या सर्व गोष्टींची वर्णने मोठ्या प्रमाणात येतात. विशेषतः रघुवंश व कुमारसंभवात वसंतामुळे बदलेले निसर्गाचे रूप, सगळीकडे आलेले नवचैतन्य यांचे रसभरीत वर्णन सापडते.

वसंत आणि कामदेव यांचा धागा मात्र प्राचीन काळापासून या उत्सवांमधे दिसतो. ऋतुराज वसंत हा कामदेवाचा सखा. कामदेव हा इच्छा, आकांक्षा यांचा प्रणेता देव ! सर्व ऐहिक सुखे मिळविण्यासाठी प्रेरणा देणारा तसेच यौवन व प्रेम यांचाही देव. आपल्या इक्षुदंडातून फुलांचे बाण मारून प्रेमीजनांना घायाळ करणारा देव म्हणून सर्वांनाच तो माहिती असतो. परंतु या कामदेवाची पूर्वी पूजा होत असे व त्याच्या मूर्ती देवालयांमधे स्थापीत केलेल्या असत. कामदेव प्रसन्न व्हावा म्हणून अनेक व्रते व उपवास देखील केले जात. त्याच्या देवळांत अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जात. या उत्सवांमधे नगरातील सर्व युवक, युवती सहभागी होत. निरनिराळ्या कलांचे प्रदर्शन, भेटी गाठी, जागरणे, वेगवेगळे खेळ, अशा स्वरूपाचे कार्यक्रम असत. वसंतोत्सव, मदनोत्सव यांची वर्णने अनेक संस्कृत व प्राकृत नाटके, कथा, काव्ये यांतून वाचायला मिळतात व तेव्हाच्या समाजात हे उत्सव कशा प्रकारे साजरे केले जात असत याची माहिती समजते.

प्राचीन साहित्यातून दिसणारा कामदेव हा निश्चितपणे मोहक, प्रेमाचा व प्रेमीजनांचा आवडता देव आहे. अनेक प्रसिद्ध काव्य, नाटकांमधे मन्मथ हजेरी लावून जातोच. मृच्छकटीकमध्ये वसंतसेना व चारुदत्त प्रथम भेटतात ते मदनमहोत्सवातच. राजा उदयन केन्द्रस्थानी ठेवून रचलेली अनेक काव्ये आहेत. यांतील उदयन म्हणजे जणू मदनाचाच अवतार असतो. अनेकदा नायक म्हणजे जणु प्रति कामदेव असतो. तसेच मदनबाण नायिकेला व्याकूळ करत असतात. एकंदरीत प्रेमी युगुलाला नेहेमी मदनाची मदत लागतेच व तो सुद्धा त्याचे हे काम चोख बजावत असतो. अविमारक, ऋतुसंहार, रघुवंश, रखावली, मालती- माधव, तिलकमंजरी, नवसाहसांकचरित, नलचम्पु या आणि अशा अगणित संस्कृत व प्राकृत साहित्यात कामदेवाच्या पूजनाचे, मदनोत्सवाचे महत्वाचे उल्लेख दिसतात.

वसंत ऋतूतील सर्वात मोठा व परिचीत उत्सव म्हणजे त्याच्या आगमनाला साजरा होणारा मदनोत्सव. याला वसंतोत्सव असेही म्हणतात, या उत्सवामधे नृत्य, गाणी यांचे सादरीकरण, विविध वाद्यांचे वादन याचे महत्त्व होते असे दिसते. निसर्गात वसंताने केलेली रंगांची उधळण व उत्सवी वातावरण यांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच नगरांत आनंदाचे व उत्साहाचे वारे वाहत असले पाहिजे. या मदनोत्सवातील आणखी एक महत्वाचा उपचार म्हणजे मदनपूजा वा मकरध्वज पूजा, यात मदनाचे चित्र वा मूर्ती तयार करून सर्वांसमवेत त्याचे पूजन होत असे. साधारणतः राणी किंवा तशाच प्रमुख युवतीच्या हस्ते मदनपूजा होत असे. राजपरिवार, सरदार, व्यापारी यांबरोबर सर्वसामान्य लोक सपरिवार या उत्सवात भाग घेत असत. वन-विहार, जलक्रीडा आणि मनोरंजनाचे अनेकविध कार्यक्रम या काळात आयोजित केले जात असत. उत्तर भारतात, विशेषतः राजस्थानात अजूनही हे उत्सव साजरे केले जातात. वसंत पंचमीनंतर लगेचच येते रथसप्तमी. हिला भानु सप्तमी असेही माहले जाते. या दिवशी सूर्याची पूजा होते तसेच उत्तर भारतात अनेक ठिकाणी सुर्याची त्याच्या रथातून मिरवणुकसुद्धा काढतात. हा सुद्धा वसंतोत्सवाचा एक भाग आहे.

याखेरीज याच काळाच्या थोडे नंतर येणारे उत्सव म्हणजे होलिकोत्सव वा होळी, फाल्गुनोत्सव, कुसुमायुध महोत्सव, चैत्रोत्सव अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे उत्सव. वसंतोत्सवाचा जो भाग फाल्गुन महिन्यात येतो, त्याला फाग म्हणतात. उत्तरेकडील फागून तो हाच. प्रांत व कालगणनेनुसार निरनिराळी नावे व दिवस असले तरी या सगळ्या उत्सवांचे मुख्य सूत्र मात्र एकच असल्याचे दिसते. या उत्सवांच्या संदर्भात वेगवेगळे रंग, पाणी, अगदी चिखलसुद्धा एकमेकांवर उडवणे, पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करणे, मोठमोठ्या आवाजात बोलणे, एकमेकांना चिडविणे, गाणी म्हणणे, मिरवणुका काढणे अशा अनेक क्रीडांची वर्णने साहित्यातून केलेली दिसतात. हे अगदी हल्लीच्या होळीची आठवण करून देणारे आहे. रंग, होळीचे खेळ यांचे आणि श्रीकृष्ण व गोपींचे नाते खूप जवळचे. या काळातील कृष्ण आणि गोपिकांच्या रास-लीलांची वर्णने सर्वांनाच परिचयाची. कृष्णावरील प्रेमात आकंठ बुडालेल्या सर्व गोपी याच दिवसांमधे महा-रास आयोजीत करीत असत.

वसंत पंचमीपासून सरस्वती आणि रती-मदनाची पूजा करून सुरू होणारा वसंतोत्सव फाल्गुन पौर्णिमेला संपतो. त्यानंतर सुरू होतो होलिकोत्सव आणि फाल्गुन कृ. पंचमीला म्हणजे रंगपंचमीला रंग खेळून तो पूर्ण होतो. अर्थात फक्त आपल्याकडील प्राचीन साहित्यात या उत्सवांचे संदर्भ सापडतात असे मात्र नाही. अकराव्या शतकातील प्रसिध्द इराणी प्रवासी आप बिरूनी याच्या प्रवास वर्णनातही तत्कालीन भारतीय समाजात होलिकोत्सव किती लोकप्रिय होता याची माहिती मिळते. होळी, रंगपंचमी यांची मुळे आपल्या संस्कृतीमधे अशी खोलवर रुजलेली दिसतात आणि या उत्सवांबरोबर अनेक मिथकेसुद्धा जोडली गेलेली दिसतात.

होळीशी निगडित सर्वात लोकप्रिय कथा
होळीशी निगडित अनेक कथांपैकी सर्वात लोकप्रिय कथा म्हणजे होलिका व प्रल्हादाची ! हिरण्यकश्यपु हा असुर राजा व त्याचा विष्युभक्त पुत्र प्रल्हाद यांची कथा सर्वपरिचित आहे. या कथेप्रमाणे हिरण्यकश्यपुची बहीण होलिका हिला अग्निपासून कुठलीही बाधा होणार नाही असा वर प्राप्त असतो. प्रल्हादाची विष्णुभक्ती सहन न झाल्याने हिरण्यकश्यपु होलिकेला आज्ञा करतो की तिने प्रह्लादाला घेऊन अग्रिप्रवेश करावा, तसे केल्यावर होलिका सुरक्षित राहून प्रल्हाद आगीत भस्म होईल असे सर्वांना वाटते. मात्र होलिकेला मिळालेला हा वर तिने एकटीने आगीत प्रवेश केल्यास खरा ठरणार असतो. दुष्टबुद्धीने त्याचा गैरवापर केल्याची शिक्षा होलिकेला मिळते व ती आगीत जळून जाते, प्रहाद मात्र त्याच्या अपूर्व भक्तीच्या जोरावर या संकटातून वाचतो. ही कथा अशा प्रकारे होळी-दहनाला चांगुलपणा व भक्तीच्या दुष्टतेवरील विजयाशी जोडते.

आणखी एक कथा ढूण्डा या राक्षशीणीची सांगितली जाते. बालकांना त्रास देणारी, त्यांना मारणारी ही राक्षशीण एकदा लोकांच्या तावडीत सापडली व लोकांनी तिला बिभत्स शिव्या व शाप दिले. तिला घाबरवून पळवून लावण्यासाठी तिच्या चहुबाजूंनी आग पेटवली. लोकांच्या भयंकर रागाला बळी पडून ती आगीच्या भक्षस्थानी पडली, अशा आशयाची ही कथा भविष्यपुराणात आहे. या घटनेची आठवण म्हणून होळी पेटवली जाते अशी आख्यायिका आहे.

एकंदरीत हे सगळे उत्सव निसर्ग बहरात येताना त्याच्याबरोबर समरूप होऊन केलेला आनंदोल्हास दाखविणारे आहेत. या अशा दिवसांमधे धार्मिक अनुष्ठान असलेले विधी, उपचार त्या मानाने कमी आहेत. हे उत्सव सामान्य जनतेचे, लौकिक आहेत. होळीसारख्या सणांचे पूर्वापार चालत आलेले रूप आणि त्याचे आजचे स्वरूप यावरून हे स्पष्ट होतेच. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे आताच्या काळातील होळी, धुळवड व रंगपंचमी. काळाच्या ओघात नावे बदलली तरी लौकिक रूप मात्र तेच रहिले आहे. पूर्वी जसे होळीच्या आधी लाकडे, गोवऱ्या उचलून आणाव्या, होळी दहनानंतर गावात वाद्ये वाजवावीत, मोठमोठ्याने गाणी म्हणत गटागटांनी फिरावे, दुसऱ्या दिवशी सकाळी अश्लील बोलून होळीची राख विसर्जीत करावी वा ती राख, चिखल अंगला लावावी असे उपचार होते तसेच आजही दिसतात.

अगदी प्राचीन काळापासून वसंतोत्सव, मदनोत्सव, होळी, रंगपंचमी या सर्व उत्सवांची लोकप्रियता बघून या सगळ्या गोष्टी साजऱ्या करण्यातली उत्स्फूर्त सहजता ठळकपणे दिसून येते. हे सगळे सण म्हणजे भारतीय संस्कृतीचे, तिच्या निसर्गप्रेरीत उत्सवी मानसाचे आरसेच आहेत असे नक्कीच म्हणता येईल !

आरती बि. कुलकर्णी
(लेखिका भारतीय विद्येच्या संशोधक आणि अभ्यासक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख