Tuesday, March 17, 2026

संघ शताब्दी वर्षात पश्चिम महाराष्ट्रात ३ हजार ‘सकल हिंदू संमेलने’; १२ लाख नागरिक सहभागी होणार

Share

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रात संघकार्याचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज व्हावे, या उद्देशाने राबविलेल्या ‘गृहसंवाद’ अभियानात पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १० लाख ८५ हजार कुटुंबांपर्यंत स्वयंसेवक पोहोचले आहेत. तसेच, एप्रिलअखेरपर्यंत या प्रांतात ३ हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे’ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी दिली.

पुणे महानगरात ५०० हून अधिक वस्त्यांमध्ये संवाद
सोमवारी (१६ मार्च) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, एकट्या पुणे महानगरातील ५१२ वस्त्यांमधील ३ लाख ४९ हजार घरांपर्यंत १० हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष पोहोचून संवाद साधला आहे. या अभियानांतर्गत कुटुंबातील सदस्यांशी ‘पंचपरिवर्तना’च्या (स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, नागरिक कर्तव्य आणि सामाजिक समरसता) मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

३ हजार सकल हिंदू संमेलने
समाज आणि संघ यांतील दुवा अधिक घट्ट करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील ७ शासकीय जिल्ह्यांमध्ये विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने ३ हजार सकल हिंदू संमेलने घेतली जात आहेत. यामध्ये अंदाजे १२ लाख नागरिक सहभागी होत असून, पुणे महानगरातच ४५० संमेलनांचे नियोजन आहे.

अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आढावा
हरियाणा येथे १३ ते १५ मार्च २०२६ दरम्यान पार पडलेल्या संघाच्या ‘अखिल भारतीय प्रतिनिधी सभे’चा संदर्भ देत प्रा. जाधव यांनी सांगितले की, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेतील निर्णयानुसार, पुढील काळात समाज परिवर्तनाचे कार्य अधिक गतीने राबविले जाईल.

या पत्रकार परिषदेला पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख