महाराष्ट्र : महाविकास आघाडीच्या (MVA) मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठी तिसरी आघाडी तयार करण्यात येत आहे असा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी संजय राऊतांवर जळजळीत टीका केली. ते म्हणाले, जेव्हा देशात काँग्रेस आणि भाजप लढत होती त्यावेळी शिवसेना तिसरीच होती ना? मग तेव्हा ती पैशासाठी लढत होती का? असा सवाल करत जीभ सांभाळून बोला, बावळट पोरासारखं बोलू नका अशा शब्दात बच्चू कडू यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.
बच्चू कडू म्हणाले की, “संजय राऊतांना नेहमीच अभ्यास न करता वक्तव्य करण्याची सवय पडलेली आहे. ज्यावेळी देशात काँग्रेस आणि भाजप लढत होती त्यावेळी शिवसेना तिसरीच होती. मग तेव्हा ती पैशांसाठी लढत होती का? समजा महाराष्ट्रात यांची सत्ता असेल आणि मग उद्या मी लढलो तर पैशांसाठी लढलो असा अर्थ होईल का? मी चार वेळा निवडून आलोय. संजय राऊतांना निवडून कसं येतात ते माहिती नाही. अभ्यास न करता एखाद्या बावळट मुलासारखं बोलणं संजय राऊतांना शोभत नाही,” असे ते म्हणाले.
संजय राऊत याना तिसऱ्या आघाडीबाबत सवाल करण्यात आला होता, त्यावेळी ते म्हणाले, “बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी मिळून राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबद्दल संजय राऊत म्हणाले की, “तिसरी आघाडी ही कायम सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवलेली असते. केंद्रात किंवा राज्यात जे सत्तेत असतात त्यांचे काही अडचणीचे विषय असतात. मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो. पण महाविकास आघाडीची काही मते कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या आघाड्या स्थापन करायच्या, पैशाचा वापर करायचा असं धोरण मला दिसत आहे.” असे ते म्हणाले .