गेल्या काही वर्षांत एक नवा ट्रेंड सुरू झालाय. डफली-तुणतुणं घेऊन, चेहऱ्यावर करुणा ओतलेला अभिनय करत, काही मंडळी ‘कलाकार’ बनून फिरतात. संतांचे अभंग गातात, पण त्यात भक्तीचा भाव नाही तर, असते जात-विभाजनाची फुटपाडी इच्छा आणि सनातन विरोधी अजेंड्याची विकृती! संतांनी परकीय शक्तींच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाला उत्तर म्हणून, समाजाला एकत्र आणण्यासाठी रचलेल्या अभंगांचाच वापर समाज तोडण्यासाठी, जातीद्वेष पसरवण्यासाठी आणि परंपरेवर कुरघोडी करण्यासाठी केला जाण्यामागे एक कृष्ण-कारस्थान आहे.
भाषा लोकांची, वाद्य पारंपरिक, पण विचार मात्र पूर्णत: फुटीरवादी! या भोंदूंना संतांच्या अध्यात्मातली समता दिसत नाही, पण संत कोणत्या जातीत जन्मले हे सांगताना मात्र त्यांचा चेहरा उजळतो. संतांनी समाज जोडला होता. आज त्याच संतांच्या नावाने हे “अर्बन जंत” समाजात दुही माजवत आहेत. लोकभावनेच्या तालावर नाचतोय असे दाखवत परंपरेच्या मुळावर कुऱ्हाड घालणाऱ्या या नव्या युगाच्या ‘अर्बन जंताच्या” कारवाया आणि कारस्थानांचा आज आपण वेध घेणार आहोत.
अर्बन नक्षल म्हणजे कोण? यांचं काम काय?
“अर्बन नक्षल” ही संज्ञा केवळ बंदुकीसह जंगलात लढणाऱ्या माओवादींची शहरी प्रतिकृती यासाठी अभिप्रेत नाही. ती एक सुसंस्कृत असल्याचे ढोंग करणारी, बौद्धिक मुखवटा घातलेली विघटनवादी विचारधारा आहे. भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक एकतेवर हल्ला हे या विचारधारेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्यासाठी तिचे अनुयायी “भारतीय परंपरेचाच” वापर करते. भारताला छिन्न-विच्छिन्न, खंडित करणे हे या विचारधारेचे ध्येय आहे.
“हे लोक थेट गोळ्या झाडत नाहीत, पण शब्दांतून विष पेरतात. ते सभ्य भाषा वापरून समाजात असंतोष पेरतात, धार्मिक परंपरांवर प्रश्न उपस्थित करतात, आणि भारतीय संस्कृतीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी सतत प्रयत्न करतात. देशात असणाऱ्या वेगवेगळ्या विविधता आणि परंपरा ही भारताची समृद्धता आहे. एकता, राष्ट्रीयतेच्या भावनेने त्यांना बळ मिळते. दुर्दैवाने, त्याच वैविध्य आणि परंपरांचा वापर करून देशात फूट पाडली जात आहे . कधी भाषेच्या आधारावर, कधी परंपरेच्या, तर कधी जातीवादाला खतपाणी घालून.”
संत परंपराच का?
“जाती न पंथा, न वैरि कुणाचा, सर्वांही सम दृष्टी” —
संत तुकारामांची ही वाणी फक्त एक अभंग नाही, तर विघटित भारताला एकत्र आणण्यासाठी दिलेला अध्यात्मिक घोष होता.
परकीय आक्रमणांनी केवळ भूप्रदेश नव्हे, तर भारताच्या आत्म्यालाच जखमी केले. त्यांच्या “फोडा आणि राज्य करा” या कपटी धोरणामुळे “वसुधैव कुटुंबकम्” या ऋषिप्रणित मूल्यांचा पाठ शिकवणारा देश जाती, पंथ, भाषा, वर्ग, प्रदेश अशा अनेक रेषांमध्ये विभागला गेला.
अशा अंधकारमय काळात संतांनी समरसतेचा दीप घेऊन पायवाट दाखवली. त्यांनी धर्माच्या नावावर विभागलेल्या समाजाला, धर्माच्या खऱ्या अर्थाने समतेने, करुणेने, आणि भक्ती-संवेदनेने पुन्हा जोडण्याचे कार्य हाती घेतले. त्यांच्या वाणीतील देव हे केवळ मंदिरात नव्हते, तर प्रत्येकाच्या अंतःकरणात होते.
संत तुकाराम म्हणतात “जाता अस्ति नाही रे, मना तु काय बोलसी”. त्यांनी धर्माला रूढी-परंपरेपुरते मर्यादित ठेवता, तर थेट माणसाच्या दैनंदिन आचारात आणलं. धर्म म्हणजे दान, धर्म म्हणजे करूणा, धर्म म्हणजे “दया, क्षमा, शांती, सेवा”. संतांनी यालाच धर्म मानलं.
संत नामदेवांनी विटेवर मस्तक टेकलं आणि हरी भजनाच्या माध्यमातून प्रभूच्या भेटीचा मार्ग दाखवला. संत चोखोबांनी कीर्तनातून जनलोकांचे आत्मभान जागे करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. एकनाथांनी “ब्राह्मण का महार?” असा प्रश्नच निकाली काढला आणि सांगितलं “ज्या घड्याला गंगाजळ भरली आहे, त्याला कुणाचं नाव लावायचं?”
संतांनी लोकभाषेत ओव्या, अभंग, दोहे रचण्याच्या आणि कीर्तनांच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या मनाशी थेट संवाद साधला. संस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा नाही, हे त्यांना ठाऊक होतं. श्लोकांमधील तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोहोचवायचं असेल, तर तो संदेश बोलीभाषेतूनच द्यावा लागेल, हे ते ओळखून होते. शेवटी ‘भाषा न पाहे जाती, भावना पाहे ईश्वरी’.
संतांनी केवळ विखारी जातिभेदाच्या विरुद्ध आंदोलन केलं नाही, तर त्यांनी भक्तीच्या माध्यमातून प्रेमाचं, समतेचं, सह अस्तित्वाचं आणि समरसतेचं बाळकडू दिलं. परकीय विघटनकारी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी समाजाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बळ दिलं.
पण आज पुन्हा तीच विघटनाची मानसिकता डोकं वर काढते आहे. जातीच्या नावावर मते मागितली जातात, पंथाच्या नावावर द्वेष पेरला जातो. अशा काळात संतांची आठवण केवळ स्मारकांपुरती राहू नये. संतांची शिकवण, त्यांनी दिलेला संदेश आपल्या विचारात भिनवून घेऊन आणि प्रत्यक्ष आचारात अनुसरून त्यांची आठवण आपल्याला जतन करावी लागेल. कारण संत परंपरा हा केवळ इतिहास नाही, ती भविष्याची दिशा आहे.
तुकाराम सांगून गेले “जातीभेदु तुळशीझाड, वाळवंटात गेला; संप्रदाय हे शुद्ध मन, तेचि गंगाजळ झाला.”
धर्म, जात, भाषा यांच्या आधाराने भेदभाव करण्याला संतांनी कायम कडाडून विरोधच केला. त्यांनी तर म्हटलं होतं — “एकाचि दीसूं या विश्वरूपी।” पण हे लोक ‘संतांचेच शब्द वापरून’ त्याच विश्वामध्ये दुही माजवायला निघालेत. त्यांची प्रेरणा भक्तीची नाही. त्यांना क्रांतीच्या नावाखाली द्वेष रुजवायचा आहे. म्हणूनच आज संत विचारांशी छेडछाड करून संत परंपरेबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे, संतांच्या वचनांचा विकृत अर्थ सांगून समाजात फूट पाडण्याचा विघातक खेळ रंगतो आहे.
या मंडळींचा जातीय द्वेष एवढा तीव्र आहे की मध्यंतरी “ज्ञानोबा माऊली तुकाराम” या गजरामधून ज्ञानेश्वरांचे नावचं वगळण्याचा प्रयत्न केला गेला.
कोण आहेत हे अर्बन जंत?
खरं सांगायचं झालं, तर या ‘अर्बन जंतांची’ नाव-रूपे अनेक आहेत. लेखक, पत्रकार, विचारवंत, नेते अशा विविध वेशांमध्ये ही मंडळी आपली भूमिका बजावत असतात. आणि याच व्यवस्थेत खोलवर शिरून काम करणाऱ्या काही प्रमुख ‘वाळवीं’चा आपण आता विस्तृत आढावा घेणार आहोत. त्या यादीत सर्वात वरचं नाव “आ. ह. साळुंखे”.
आ. ह. साळुंखे : विद्वत्तेच्या मुखवट्याआड लपलेलं सांस्कृतिक युद्ध
आ. ह. साळुंखे हे नाव इतिहास अभ्यासकांच्या दुनियेत महत्त्वाचं स्थान मिळवून बसलंय. अनेक जण त्यांना संतसाहित्याचे अभ्यासक मानतात. त्यांनी लिहिलेली पुस्तकं, व्याख्यानं, आणि अभ्यासक्रम अनेक विद्यापीठांमध्ये चर्चिले जातात. पण इथेच एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की साळुंखेंनी घेतलेला अभ्यासाचा मुखवटा अनेकदा एका ठाम वैचारिक अजेंड्याच्या पायाशी झुकतो.
ते स्वतःला संतपरंपरेचे अभ्यासक म्हणवतात, पण त्यांच्या लेखनातून, व्याख्यानांतून आणि पुस्तकांतून सतत दिसतं ते म्हणजे हिंदू धर्माविषयी एक ठाम आणि सतत व्यक्त होणारा द्वेषभाव. त्यांच्या मांडणीत ‘संत’ ही व्यक्ती नाही, तर एक राजकीय साधन बनवले आहे.
आ. ह. साळुंखेंचं लिखाण संतसाहित्याच्या आध्यात्मिक गाभ्यापेक्षा, सामाजिक संघर्षाच्या निवडक चौकटीत अडकलेलं आहे. त्यांनी “तुकाराम आणि बौद्धधम्म”, “संतसाहित्याची पुनर्मूल्यांकन”, “चोखामेळा आणि ब्राह्मणधर्म” अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. या सर्वांत एक समान धागा आहे संतांची वेगळ्या प्रकारे मांडणी करून जातीय संघर्षाला खतपाणी घालणे.
साळुंखे यांनी संतांची मांडणी एका विशिष्ट चौकटीतून. ते संतांना केवळ ब्राह्मणशाहीविरोधी संघर्षाचे प्रतीक म्हणून दाखवतात. त्यांच्या मते, संत हे सनातन धर्मातील तथाकथित “जातीवादी शोषणाला” कंटाळले होते आणि म्हणूनच त्यांनी त्याविरोधात बंड पुकारले. साळुंखेंच्या लिखाणात संत परंपरेतील “समता” ही “समरसते” पासून तोडली गेली आहे, आणि “संघर्ष” हेच एकमेव साधन म्हणून पुढे केलं गेले आहे.
साळुंखे संतांचे अभंग अशा पद्धतीने उद्धृत करतात की, जणू त्या संतांनी आपला सारा जीवनसंघर्ष केवळ ब्राह्मण विरोधासाठीच केला होता. साळुंखेंच्या विश्लेषणात अध्यात्म, भक्ती, उपासना, देवत्व हे सगळं गौण ठरतं.
आपल्या प्रत्येक लेखनात ते “वेद शास्त्रे अपवित्र”, “ब्राह्मण काय जरि वावदंडिया”, यासारख्या अभंगांवर अत्याधिक भर देत, केवळ असे अभंग हेच संतांचे एकमेव घोषवाक्य ठरवण्याचा प्रयत्न करतात. साळुंखेनी जाणीवपूर्वक त्यांच्या लेखनातून संतांचा ‘विठोबाशी असलेला आत्मिक संवाद’, ‘भक्तीतील तळमळ’, आणि ‘आत्माराम दर्शन’ या आध्यात्मिक गाभ्याला पूर्णतः दुर्लक्षित केलं आहे. क्वचितच ते विठ्ठल, प्रभू श्री राम, कृष्ण यांचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात करतात आणि करतात तेव्हा तो उपहासात्मक किंवा दुय्यम स्वरूपात येतो.
“ज्या संतांचा जीव अखंड विठोबा-माउलीच्या भक्तीत हरवलेला होता,
त्या संतांना साळुंखे यांनी त्यांच्या भक्तिभावापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला — आणि का? फक्त जातीवादाचं विष पेरण्यासाठी.”
भालचंद्र नेमाडे आणि संत साहित्याचं खच्चीकरण
भालचंद्र नेमाडे हे आधुनिक मराठी साहित्यातील एक महत्वाचे नाव मानले जाते. त्यांनी हिंदू (2009) या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केला आहे. मात्र, त्यांच्या लेखनशैलीत आणि वैचारिक मांडणीत पारंपरिक हिंदू अध्यात्म, विशेषतः संत साहित्याविषयी अवमान, अविश्वास आणि तिरस्कार यांचा सूर वारंवार आढळतो. विशेषतः संत परंपरेच्या गाभ्याला धर्माच्या पटलावर न पाहता, त्यांनी ती एक ‘सामाजिक प्रतिक्रिया’ म्हणून न्यून ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.
भालचंद्र नेमाडेंनी त्यांच्या ‘देशीवाद’ सिध्दांताच्या अतिरेकातून संतसाहित्याचं अवमूल्यन केलं. त्यांनी संत विचारांतील अध्यात्म, आत्मक्रांती, समरसता आणि लोकशिक्षण यासंदर्भातील संदेश अपुरा, गुलामगिरीचे द्योतक आणि भावनिक ठरवून, संतांचे कार्य ‘क्रांती विरोधी’ ठरवले.
हिंदू या त्यांच्या कादंबरीत ‘कोकणातल्या’ एक अन्वेषक पात्राच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृतीचा पुनर्पाठ मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी ब्राह्मणीकृत परंपरांचा, वेद, उपनिषद, भक्ती परंपरेचा आणि संत वाग्ङ्मयाचा अनेक ठिकाणी उपहास केलेला आढळतो.
कादंबरीत असं सूचित केलं आहे की, भक्ती चळवळ ही केवळ एका सत्ताविहीन समाजाची आत्मसुखी प्रतिक्रिया होती, ज्यामध्ये वास्तव बदलण्याची क्रांतीकारी शक्यता नव्हती. संतांची उपास्यतत्त्वं, त्यांचा आत्मोद्धारावर भर, विठ्ठल, राम, कृष्ण यांच्याशी असलेली एकात्मता हे सगळं अंधश्रद्धा आणि जातिव्यवस्थेच्या अनुकूलतेचं प्रतिक म्हणून मांडलं गेले आहे.
नेमाडे यांचा दृष्टिकोन असा आहे की संतांनी जे काही लिहिलं ते सत्ताधीशांपुढे माने वाकवणाऱ्या वर्गाचा मानसिक दिलासा होता, क्रांती नव्हे. त्यांनी वारंवार असा आग्रह केला आहे की भक्तीने सामाजिक परिवर्तन केलं नाही, तर संस्कार आणि परंपरा यांचं अधिरोपण केलं.
त्यांच्या कादंबरीत एका ठिकाणी पात्र म्हणतं – “भक्ती ही फक्त पाळीव मानसिकता निर्माण करते. संत हे सत्ता टिकवण्यासाठी उपयोगी पडणारे शब्दमजूर होते.”
नेमाडे यांनी एका व्याख्यानात स्पष्टपणे म्हटलं की, “भक्ती परंपरेतील दास्य भाव ही गुलामीची मानसिकता आहे, जी शोषणाला खतपाणी घालते.” त्यांनी संतांचा “मी तुझा दास” हा भाव मानसिक आधीनतेचं प्रतीक मानला आणि त्यामुळे संत साहित्याला क्रांतिकारी म्हणण्यास नकार दिला.
सचिन माळी आणि शीतल साठे
कबीर कला मंच या तथाकथित ‘अर्बन नक्षल’ विचारांचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या संघटनेतील दोन प्रमुख कार्यकर्ते. हे दोघंही स्वतःला संत परंपरेचे आधुनिक वारसदार म्हणून लोकांसमोर मांडतात. त्यांच्या गाण्यांत, कवितांमध्ये आणि वक्तव्यांतून यांचा वारंवार उल्लेख केला जातो की, “तुकाराम जे करत होते, तेच आम्ही आज करत आहोत.”
मात्र यामागचं वास्तव हे एक दिशाभूल करणारा प्रयोग आहे. हातात डफली आणि तुणतुणे घेत, हे संतांच्या अभंगांचा वापर करून ब्राह्मणवाद आणि जातीवाद पसरवतात. वेगवेगळ्या मुद्द्यांवर पोवाडे आणि संतांचे अभंग घेऊन “क्रांतीच्या” नावाखाली फक्त समाजात ‘अराजकता कशी निर्माण’ होईल हे त्यांचे मुख्य काम.
सचिन माळी आणि शीतल साठे हे कबीर, तुकाराम यांच्यासारख्या संतांच्या नावाने सामाजिक न्यायाची भाषा बोलतात, परंतु त्यांच्यामार्फत जनतेला बंडखोर बनवण्याचा प्रयत्न असतो.

ही नावांची जंत्री अजून बरीच मोठी होईल. कधी किरण माने, सुषमा अंधारे, तर कधी ज्ञानेश्वरांना “बंडखोर” ठरवणारे विचारवंत, कधी संभाजी ब्रिगेड या यादीत कोण कुठून येईल, सांगता येत नाही. कारण ही यादी काही व्यक्तींची नाही, ही एका मानसिकतेची रांगोळी आहे जिथे प्रत्येक रंग प्राचीन समृद्ध संस्कृतीवर टीका करतच पुढे जातो.
यांचं बोलणं म्हणजे न संपणारं वैतागाचं झाड. कुठेही मूळ अध्यात्म, भक्ती,
समरसतेचा गंध नाही. संतांच्या ‘अभंगां’ची जागा ‘अपभंगांनी’ घेतली आहे.
शब्द तेच असतात, पण भावना बदललेली असते, हेतू शुद्धतेचा नसतो, तर विखार पसरवण्याचा असतो. संतांचा अभंग जनकल्याणासाठी असतो, तर यांचा आक्रोश समाजात भेद वाढवण्यासाठी असतो.
संतांनी वर्णव्यवस्थेवर टीका केली हे खरे; पण ती धर्माचा नाश करण्यासाठी नव्हे,
तर ती सुधारण्यासाठी.
आजच्या काळात काही विशिष्ट विचारधारेचे गट आणि आंदोलक ठामपणे असा प्रचार करत आहेत की, भक्ती परंपरेतील संतांनी एक स्वतंत्र आणि पूर्णतः वेगळा “संत धर्म” निर्माण केला, जो सनातन धर्माच्या पूर्ण विरोधात होता. अशा मांडणीतून असा आभास निर्माण केला जातो की संतांनी केवळ जातीय शोषणाविरुद्ध नव्हे, तर संपूर्ण सनातन परंपरेच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मुळावरच आघात केला होता. परिणामी, दलित-बहुजन समाज हा हिंदू धर्माचा मुख्य प्रवाहाच्या बाहेरचाच आहे, असा एक समांतर इतिहास आणि धार्मिक ओळख उभी करण्याचा प्रयत्न होतो.
या विचारधारात्मक प्रक्रियेतून निर्माण होतो एक कृत्रिम द्वैतवाद – जिथे ‘संत धर्म’ म्हणजे समानतेचा, लोकशाहीचा आणि आधुनिकतेचा विचार, तर ‘सनातन धर्म’ म्हणजे शोषण, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडांचे जंगल, असा भेद रेखाटला जातो. हा कृत्रिम संघर्ष वास्तविकते वर नव्हे, तर निवडक विधानं, संदर्भ विरहित संतवचनं, आणि सामाजिक भावनांना उद्दीष्ट करून उभा करण्यात येतो.
याचे ठळक उदाहरण म्हणजे “रविदासिया धर्म”. संत रविदास यांची शिकवण उपेक्षित समाजासाठी प्रेरणादायी आहे, हे नक्की. पण त्यांचे नाव वापरून स्वतंत्र धर्मसंस्था, वेगळा धर्मग्रंथ, आणि धार्मिक प्रतीकांची निर्मिती करून जेव्हा रविदासिया समाज स्वतःला हिंदूधर्माच्या कक्षेबाहेर जाहीर करतो, तेव्हा हे सांस्कृतिक विभाजन किती खोलवर घडवलं जात आहे, हे स्पष्ट होतं. या प्रक्रियेत रविदासांची अध्यात्मिक एकात्मतेची शिकवण बाजूला पडते, आणि केवळ ‘विरोध’ हेच तत्व शिल्लक राहतं.अशा कृत्रिम संघर्षातून जातीय ध्रुवीकरण, परकेपणा, आणि द्वेषभावना वाढीस लागतात. सह-अस्तित्वाच्या, एकात्मतेच्या सनातन मूल्यांना छेद दिला जातो. संत परंपरेचा जो मूलगामी गाभा – भक्ती, समरसता, आणि सर्वात्मभाव – तो हरवतो, आणि उरतो तो केवळ संघर्षाच्या आणि तुटवड्याच्या कथा. या प्रकारची विचारसरणी दीर्घकालीन सांस्कृतिक विघटनाचा धोका वाढवते, आणि हेच या कृत्रिम द्वंद्व निर्मितीचे मुख्य संकट आहे.