विधानसभा निवडणुका काहीशा लांबणीवर पडल्या आहेत. जागा वाटपांचा तिढा सोडण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आपपाल्या मित्रपक्षांमध्ये बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीत मुंबईतील जागा वाटपाचा घोळ मिटला असल्याचा दावा होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेसाठी नवी मुंबईतील दोन्ही जागांवर मागणी करू, असे म्हटले आहे. नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या बैठक झाली. यात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी नवी मुंबईतील विधानसभा जागासंदर्भात चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या बैठकीला उपस्थित होते. या दोन्ही मतदारसंघावर कार्यकर्त्यांनी दावा केला. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद आहे. म्हणून त्यांचा विजया निश्चित आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीत या जागा काँग्रेसकडेच हव्यात अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीत लावून धरली. नाना पटोले यांनी त्याला दुजोरा दिला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विधिज्ञ अनिल कौशिक यांनी नवी मुंबईतील दोन जागांपैकी किमान एक जागा तरी काँग्रेस पक्षाला लढवण्याची संधी मिळावी अशी मागणी केली. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत नवी मुंबईच्या दोन्ही जागा काँग्रेससाठी मागण्याचं आश्वासन दिलं. येत्या 27 तारखेपासून महाविकास आघाडीच्या जागावाटबाबत वाटाघाटीसाठी बैठका सुरू होणार असून या बैठकीत नवी मुंबईच्या दोन्ही जागा मागू आणि त्या जागांसाठी आपली क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न करू आश्वास असं आश्वासन पटोले यांनी कार्यकर्त्यांना दिलं.
पृथ्वीराज चव्हाण यांचा आग्रह
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील नवी मुंबईतील कार्यकत्यांच्या मागणीवर आग्रही सूर लावत दोन्ही जागा मिळाल्यास दोन्ही जागा जिंकून
दाखवू, असा विश्वास नवी मुंबईतील कार्यकर्त्यांवर दाखवला. तसेच, आघाडीच्या राजकारणात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन पक्षाची भूमिका आग्रहाने मांडू, असे आश्वासन दिले.
आम्ही जास्त देऊ
लाडकी बहीण योजना ही काँग्रेसच्या नारी सन्मान योजनेवरून घेतली असून मध्यप्रदेश आणि तेलंगणामध्ये आम्ही या नारी सन्मान आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येकी 2000 रुपये देत आहोत. येत्या निवडणुकीत निवडून आल्यावर ही योजना महाराष्ट्रातही राबवू, अशी ग्वाही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.