Monday, November 25, 2024

काश्मीरसाठी वेगळा झेंडा, 370 कलम पुन्हा लागू करू आश्वासनावर शेलारांचा उबाठा आणि काँग्रेसला सवाल

Share

मुंबई : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी वेगळा झेंडा निर्माण करू, 370, 35 (अ) कलम पुन्हा लागू करू आदी आश्वासने दिली आहेत. या आश्वासनांशी काँग्रेस, उबाठा सहमत आहेत का? असा सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संपूर्ण देश तिरंगा झेंड्याखाली एकत्र असताना काश्मीरसाठी स्वतंत्र झेंडा तयार करण्याचे आश्‍वासन देणे म्हणजे तुकडे-तुकडे गँग पुन्हा कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे, असा घणाघाती हल्ला शेलार यांनी चढविला.

आमदार आशीष शेलार म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सने काश्मीरसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्र झेंडा तयार करू, असे आश्‍वासन दिले आहे. ‘एक देश में दो विधान, दो निशान, दो प्रधान नही चलेंगे’, ही भाजपाची, जनसंघापासूनची भूमिका आहे. काँग्रेस नेतृत्वाने, उद्धव ठाकरे यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या या आश्‍वासनाशी आपण सहमत आहोत का, हे स्पष्ट करावे. नॅशनल कॉन्फरन्सने विधानसभा निवडणुकीत मते मिळवण्यासाठी ही देशविघातक भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर 370 आणि 35(अ) ही घटनेतील कलमे पूर्ववत करू, असे आश्‍वासनही नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. याचा अर्थ 370 आणि 35 (अ) रद्द करण्यापूर्वी राज्यात जी स्थिती होती ती पुन्हा आणणे असा होतो. या आश्‍वासनाला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थन आहे का, असा प्रश्‍नही आशीष शेलार यांनी यावेळी उपस्थित केला.

आमदार आशीष शेलार पुढे म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सने जाहीरनाम्यात शंकराचार्य पर्वताचे ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक महत्व विसरून त्याचे तख्त-ए-सुलेमान असे नामांतर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्याचबरोबर हरी पर्वताचे कोह-ए-मारन असे नामांतर करण्याचे आश्‍वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी अलिकडेच एका शंकराचार्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. त्यांचे या नामांतराला समर्थन आहे का, काँग्रेसची या नामांतराबाबत भूमिका काय, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करू, असे आश्‍वासन दिले आहे. 370 वे कलम रद्द झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील दलित समाजाला, गुज्जर, बाकरवाल या समाजाला भारतीय संविधानानुसार आरक्षण मिळू लागले आहे. नॅशनल कॉन्फरन्सने याच आरक्षणाचा पुनर्विचार करण्याचे आश्‍वासन दिले आहे. याविषयी काँग्रेसची भूमिका काय, उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. तुकडे-तुकडे गँगच्या या कार्यक्रमाला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थन आहे का, हे महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचे आहे, असेही आ. शेलार म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख