छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातले केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते एका नवभारताचे स्वप्न उभे करणारे काळपुरुष होते. तलवार आणि धैर्य यांच्या बरोबरीने त्यांनी नीतिमत्ता, धर्मनिष्ठा आणि दूरदृष्टी यांच्या सहाय्याने ‘हिंदवी स्वराज्य’ हे स्वाभिमानी, धर्माभिमानी आणि जनतेच्या मनात घर करणारे राज्य निर्माण झाले. परकीय आक्रमणांमुळे जबरदस्त छळ सहन करत असलेल्या हिंदू समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. १६३० मध्ये जन्मलेल्या शिवरायांचे बालपण मातोश्री जिजाऊंनी दिलेल्या धर्म, राष्ट्र आणि आत्मसन्मान यांच्याशी निष्ठावान मूल्यांमध्ये घडले. त्यातूनच ‘हिंदवी स्वराज्य’ या महासंकल्पनेचा जन्म झाला.
शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे धर्म, संस्कृती आणि सभ्यतेचा मूलगामी विचार होता. त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करून केवळ स्थापत्य नव्हे तर जनतेच्या श्रद्धेला रक्षिले. गोहत्या बंदी लागू करताना त्यांचा हेतू केवळ धार्मिक नव्हता, तर तो सामाजिक संतुलन आणि अहिंसेचे समर्थन करणारा होता. अफजलखानाचा वध, शायिस्तेखानाची बोटे कापणे आणि औरंगजेबाशी घेतलेला संघर्ष – हे सर्व हिंदू समाजाच्या आत्मगौरवासाठी होते. त्यांनी वेद, उपनिषदे, गुरू आणि साधूजनांना उच्च स्थान दिले. मुस्लिम स्त्रियांनादेखील त्यांनी सन्मानाने घरी पोहोचवले. जे त्यांच्या हिंदू धर्मनिष्ठ संस्कारांचे उदाहरण आहे.
शिवरायांचे राजकारण ही धर्माच्या प्रेरणेने वाहणारी पण व्यवहार्य आणि न्याय्य यंत्रणा होती. अष्टप्रधान मंडळ ही त्यांची काळाला पुढे जाऊ पाहणारी संस्था होती. महसूल, न्याय, संरक्षण, गुप्तचर व्यवस्था – सर्व काही पारदर्शक, शिस्तबद्ध आणि लोकाभिमुख होते. ‘राजा हा प्रजेचा सेवक असतो.’ ही भूमिका त्यांनी आपलीच नाही, तर पुढच्या राजकारण्यांसाठी एक मूल्ये बनवली. ते राजवाड्याच्या सावलीत बसून राज्य चालवणारे नव्हते; ते रणभूमीत घोड्यावरून लढणारे, आपल्या मावळ्यांच्या सोबत रक्त सांडणारे, त्यांच्यासोबत प्राणपणाने लढणारे होते.
शिवाजी महाराज हे आधुनिक भारताचे पहिले समुद्रसामर्थ्य उभारणारे राजा ठरले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग अशा जलदुर्गांच्या स्थापनेतून त्यांनी सागरी सुरक्षा आणि स्वतंत्र नौदल निर्माण केले. त्यांचे आरमार हे केवळ संरक्षण म्हणून नव्हते, तर ते एका जागृत हिंदू सत्तेचे प्रतीक होते. त्यांचा सागरी धोरण इंग्रज, पोर्तुगीज आणि डच यांच्यासारख्या साम्राज्यशक्तींना आव्हान देणारे ठरले. त्यांच्या किल्ल्यांच्या साखळ्या, त्यांच्या चपळ गनिमी युद्धनीती, आणि गुप्तचर व्यवस्थेने स्वराज्य केवळ राखलेच नाही, तर सतत विस्तारले.
त्यांनी तलवारीला धर्माचे कवच दिले, सत्ता ही सेवेची साधना मानली. ‘हिंदवी स्वराज्य’ ही संकल्पना म्हणजे फक्त राजकीय व्यवस्था नव्हे, तर भारतीय मूल्यांची पुनःस्थापना होती. त्यांनी केवळ भौतिक गुलामगिरी नाही, तर मानसिक आणि सांस्कृतिक गुलामीतून समाजाला मुक्त केले. धर्म आणि देश हे त्यांच्या जीवनाचे दोन काठ होते. त्यात वाहणारा प्रवाह होता सेवा, त्याग आणि राष्ट्रभक्ती.
आजही जेव्हा धर्म, संस्कृती आणि अस्मिता धोक्यात येते, तेव्हा शिवरायांचे नाव मनात घुमते. त्यांच्या धाडसाची, दूरदृष्टीची आणि नीतिपूर्ण नेतृत्वाची आवश्यकता आजच्या काळात अधिक भासते. स्वराज्य म्हणजे केवळ सत्तेचा ताबा नव्हे, तर आत्मसन्मान, सांस्कृतिक अभिमान आणि श्रद्धेचे स्वातंत्र्य हे त्यांनी शिकवले. म्हणूनच शिवाजी महाराज हे केवळ इतिहासातील पान नसून, ते भारताच्या भविष्याचा आधारस्तंभ आहेत.
संदर्भ: https://vayuveg.com/Encyc/2025/3/25/Architect-of-Hindu-Swarajya.php